Chakan News : काळ्या टोप्या, जॅकेटधारी व्यक्ती... चाकण फाट्यावरील ‘झिरो पोलिस’ आहेत कोण ?

Chakan News : अवजड वाहतुकीला पूर्ण बंदी नसतानाही पैसे उकळण्याचे प्रकार; वाहनचालक त्रस्त, ओळख पटत नाही
Chakan News
Chakan Newssakal
Updated on

तळेगाव दाभाडे - अवजड वाहतुकीला पूर्णपणे बंदी नसतानाही जुन्या फलकाचा गैरवापर करून वडगाव-चाकण फाट्यावर काही व्यक्ती रात्री परप्रांतीय वाहनचालकांकडून पैसे उकळत आहेत. त्यामुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. मात्र, हे ‘झिरो पोलिस’ कोण आहेत? हे मात्र अजूनपर्यंत उघडकीस आलेले नाही.

वडगाव-चाकण फाट्यावर वडगाव मावळ ग्रामीण पोलिस व तळेगाव दाभाडे (पोलिस आयुक्तालय पिंपरी-चिंचवड) अशी हद्द येते. याठिकाणी ग्रामीण पोलिसांनी सकाळी सात ते संध्याकाळी सातपर्यंत अवजड वाहनांना प्रवेश बंदी केली होती. पुणे ग्रामीण पोलिसांनी बंदीचा तसा फलक त्यावेळी लावला होता. पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाने जानेवारी २०२३ ला अवजड वाहनांची बंदी उठवली.

मात्र, आयुक्तलयाच्यावतीने त्याठिकाणी अवजड वाहनांवरील बंदी उठवल्याचा फलक अद्याप लावण्यात आलेला नाही. त्यामुळे, दोन पोलिस क्षेत्रांच्या हद्दीमध्ये अवजड वाहन चालकांना अडवून वाहने तपासणीच्या नावाखाली दुसराच उद्योग चालू आहे.

सध्या अवजड वाहनांना सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत प्रवेशबंदी आहे. सकाळी ११ ते सायंकाळी पाचपर्यंत सूट आहे. पुन्हा सायंकाळी ५ ते ७.३० वाजेपर्यंत प्रवेश बंदी करण्यात आली आहे. तर सायंकाळी ७.३० पासून दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजेपर्यंत सूट आहे.

काळ्या टोप्या, जॅकेटधारी व्यक्ती...

या फाट्यावरील ग्रामीण पोलिसांचा चौदा वर्षांपूर्वी लावलेला अवजड वाहनांना बंदी असलेला फलक अद्याप तसाच असल्याने वाहनचालकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. त्याचा गैरफायदा घेऊन काळ्या टोप्या आणि जॅकेट घातलेल्या व्यक्तींकडून वाहनचालकांकडून पैशाची लूट केली जात आहे.

वडगाव-चाकण फाटा चौकात ग्रामीण पोलिसांचा जुना फलक आहे. तो काढून पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने नवीन फलक लावला पाहिजे. कुठलेही ओळखपत्र आणि पोलिस गणवेश नसताना काळी टोपी व जॅकेट घातलेल्या व्यक्ती शिट्टी मारून वाहने थांबवून पैसे गोळा करत आहेत.  

- दिलीप डोळस, सामाजिक कार्यकर्ते, तळेगाव दाभाडे

अवजड वाहनांच्या बंदीचा फलक कधी  आणि कुणी लावला? त्याची कागदपत्रे पाहून शहानिशा करण्यात येईल. खासगी लोक वाहनचालकांकडून पैसे गोळा करत असतील तर त्यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात येईल. मात्र, आमच्या हद्दीत असे प्रकार होत नाहीत.  

- कुमार कदम, पोलिस निरीक्षक, वडगाव मावळ 

तळेगाव हद्दीत पेडिंग चलन भरून अवजड व इतर वाहनांवर पोलिसांमार्फत  कारवाई केली जाते. जर खासगी लोक वाहनचालकांकडून पैसे घेत असतील तर आम्हाला कळवा. आम्ही त्वरित कारवाई करू. 

- विशाल गजरमल,  सहाय्यक पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा, तळेगाव दाभाडे

Chakan News
Ration Distribution : बाहेरच्यांना धान्‍य वाटप; स्‍थानिक मात्र वंचित

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.