Eknath Shinde: सोनसाखळी चोरणाऱ्या सराईत टोळीतील गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्याच्या ठाणे पोलिसांच्या धडक कारवाईने ठाणेकरांनी सुटकेचा निःश्वास सोडला होता; मात्र मागील तीन महिन्यांपासून ठाण्यात पुन्हा सोनसाखळी चोरांचा सुळसुळाट वाढला आहे. आता सणासुदीचे दिवस आहेत.
महिला भरभरून दागिने घालून घराबाहेर पडताच सोनसाखळी चोरट्यांना ते निमंत्रण ठरणार आहे. त्यामुळे ठाणेकरांनो सावधान! सोन्याचे दागिने घालणे जीवावर बेतण्याची शक्यता आहे. म्हणून दागिने परिधान केल्यास सतर्क राहावे, असे आवाहन पोलिस सूत्रांनी आणि सामाजिक कार्यकर्ती प्रियांका शाद यांनी महिलांना केले आहे.
ठाण्यात सोनसाखळी चोरट्यांचा बोलबाला पुन्हा एकदा सुरू झालेला आहे. रस्त्याने, रिक्षातून जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील स्त्रीधन आणि पर्स, मोबाईलही धावत्या रिक्षात सुरक्षित नसल्याचे दर्शवणाऱ्या अनेक घटना घडलेल्या आहेत.
मागच्या काही महिन्यांपासून अनेक वेळा सोनसाखळी चोरीच्या घटना पुन्हा जोर धरू लागलेल्या आहेत. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात सोनसाखळी चोरीच्या आणि मोबाईल चोरीच्या घटनांनी वेग धरला आहे. त्यामुळे ठाण्यात पुन्हा सोनसाखळी चोरटे हे सक्रिय झाल्याचे स्पष्ट चित्र पाहायला मिळत आहे.
चोरांची मजल घरापर्यंत
ठाण्यात सध्याच्या स्थितीला सोनसाखळी चोरटे हे सावधगिरीने चोरी करून स्थानिकांना आणि पोलिसांनाही गुंगारा देत पोबारा करण्यात यशस्वी ठरत आहेत. चरईतील ६० वर्षीय वृद्धा आणि वागळे इस्टेट परिसरातील ८५ वर्षीय वृद्धाच्या सोनसाखळी चोरीच्या घटनांवरून हे स्पष्ट होत आहे. कालपर्यंत रस्त्यावर सावज टिपणारे चोरटे हे आता गल्लीबोळात दुचाकीवरून ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करीत आहेत; तर एकटेदुकटे राहणाऱ्या वृद्धांना चक्क घरात घुसून अंगावरील दागिने खेचून चोर फरार होत असल्याच्या घटनाही घडलेल्या आहेत.
दोन महिन्यातील चोरीच्या घटना -
१८ आक्टोबर : रस्त्याने चालणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून पळण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघा आरोपींना स्थानिक युवकांनी जेरबंद केले. त्याच्याकडे एक सोनसाखळी आणि एक स्त्रीधन असा मुद्देमाल सापडला. -
१ नोव्हेंबर : ठाण्याच्या चरई परिसरात रस्त्याने घरी निघालेल्या ६० वर्षीय वृद्धेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून चोरांनी पोबारा केला. सोनसाखळी चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले. मात्र, त्यांनी हेल्मेट घातलेले असल्याने त्यांची ओळख पटलेली नाही. -
१ नोव्हेंबर : पोलिस दलातून सेवानिवृत्त झालेल्या महिला पोलिस कर्मचारी प्रभावती प्रभाकर भोसले (७०) या रिक्षा पकडण्यासाठी रस्ता ओलांडताना मागून आलेल्या दुचाकीवरील दोघांनी त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून पोबारा केला. सोनसाखळी खेचल्याने त्यांच्या गळ्याला जखम झाली. -
२ नोव्हेंबर : वागले इस्टेट परिसरात पाळत ठेवून एकटेच राहणाऱ्या ८५ वर्षीय वृद्धाच्या घरात घुसून त्याच्या तोंडात टॉवेल कोंबून मारहाण आणि चाकूने वार करीत चोरांनी सोनसाखळी खेचून पोबारा केला. -
माजिवडा ठाणे येथून दोन दुचाकीवरील चोरांनी महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी आणि इतर दागिने असा १८ ग्रॅम सोन्याचा ऐवज घेऊन पोबारा केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.