पुणे - "देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात निवडणूका होऊ नयेत, ते भाजपला परवडणार नाही. त्यांना केंद्रात पाठवा, अशा प्रकारे फडणवीस यांच्याबद्दलच्या नाराजीचा मुद्दा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकीत आला आहे. दुसरीकडे, भाजपच्या वरिष्ठांकडूनच पंकजा मुंडे यांच्या यात्रेला अप्रत्यक्षपणे बळ देऊन फडणवीस यांच्याविरुद्ध सक्षम नेतृत्व उभे करण्याचा प्रयत्न केला जात आहे, '' असा गौप्यस्फोट शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शनिवारी केला.
अंधारे शनिवारी पुणे दौऱ्यावर असताना त्यांनी डेक्कन येथील शिवसेना भवनामध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पक्षाचे शहराध्यक्ष गजानन थरकुडे, महिला शहराअध्यक्षा पल्लवी सातपुते - जावळे, महेश मोगरे व निषाद पाटील उपस्थित होते.
अंधारे म्हणाल्या, ""छगन भुजबळ यांच्यासंबंधीचे जुने प्रकरण "इडी'कडे आहेत, मात्र भुजबळ सरकारमध्ये गेल्यानंतर आता मात्र "इडी'ला हे प्रकरण आठवत नाही, सरकारमध्ये सहभागी झाले की, भाजपच्या स्वायत्त संस्था लगेच "क्लीन चीट' देतात. राज्य सरकारच्या "आनंदाचा शिधा', आरोग्य शिबिरे यामध्ये मोठा गोंधळ आहे. आरोग्य विभागातील घोटाळा लवकरच उघडकीस आणून आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे पितळ उघड करणार आहे.''डॉ.नीलम गोऱ्हेंना एकही कार्यकर्ता नाही.
डॉ.नीलम गोऱ्हे यांना एक ही कार्यकर्ता तयार करता आला नाही, त्यांनी सेनेची एक शाखा देखील उघडली नाही. असे असतानाही उद्धव ठाकरे यांनी डॉ.गोऱ्हे यांना ४ वेळा महत्त्वाची पदे दिली. त्यानंतरही त्यांनी शिवसेना सोडून शिंदे गटात प्रवेश केला. आता त्याच उद्धव ठाकरे यांच्यावर चिखलफेक करत आहेत. हा प्रकार शिवसैनिक खपवून घेणार नाहीत, अशा शब्दात त्यांनी डॉ.गोऱ्हे यांच्यावर टीका केली.
शीतल म्हात्रे व त्यांच्या पतीकडून ३५० कोटींचा घोटाळा
बोरिवली पश्चिम येथील लक्ष्मण म्हात्रे यांना कुमार, शरयू, कीर्ती यांच्यासह आठ मुले होते. कुमार यांच्या मृत्यूनंतर त्यांची मुले अशोक व मुकेश यांनी मालमत्तेच्या वारसदार असणाऱ्या त्यांच्या आत्या शरयू मोगरे व कीर्ती पाटील यांच्या परस्पर साडे नऊ हजार चौरस फुटांची मालमत्ता बळकावली. बनावट दस्त तयार करून ३५० कोटी रुपयांची मालमत्ता विकसकाला विकली. मुकेश हा शीतल म्हात्रे यांचा पती असून शीतल म्हात्रे यांनी राजकीय बळ वापरून हा आर्थिक घोटाळा दडपला. तर कारवाई टाळण्यासाठी शिंदे गटात प्रवेश केल्याचा आरोप ही अंधारे यांनी केला.
अंधारे म्हणाल्या,
महाराष्ट्रात भाजपबद्दल नकारात्मक वातावरण
वादग्रस्त संभाजी भिडेला मराठा आरक्षण आंदोलनात मध्यस्थीसाठी पाठविले
आरोग्यमंत्री तानाजी सावंत अपयशी ठरले, त्यांचा आर्थिक घोटाळा उघडकीस आणणार
लाठीहल्ल्यानंतर "डॅमेज कंट्रोल' करण्यासाठी मराठवाड्यात बैठक
22 जिल्ह्यातील दुष्काळावर सरकार बोलत नाही, हे गंभीर
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.