Anil Kapoor : "सूत्रसंचालक म्हणून ही माझी नवी इनिंग" ; बिग बॉस ओटीटी सीजन 3 आणि बॉलिवूडमधील प्रवासावर अनिल यांची दिलखुलास मुलाखत

Anil Kapoor Interview : अभिनेते अनिल कपूर बिग बॉस ओटीटी सीजन 3 चं सूत्रसंचालन करून नवीन इनिंग सुरू करत आहेत. वाचा त्यांची ही खास मुलाखत
Anil Kapoor
Anil KapoorEsakal

Bigg Boss OTT season 3 : गेल्या चार दशकांहून अधिक काळ चित्रपटसृष्टीत कार्यरत असणारा अभिनेता म्हणजे अनिल कपूर. हिंदी चित्रपटांबरोबरच ओटीटीवर त्याने आपले अभिनयकौशल्य सिद्ध केले आहे. आजही तो तितक्याच उत्साहाने आणि दमाने काम करीत आहे. तो आता जिओ सिनेमावरील बिग बॉस ओटीटीच्या तिसऱ्या सीझनचे सूत्रसंचालन करीत आहे. सूत्रसंचालक म्हणून त्याची ही नवीन इनिंग आहे. त्याबाबतीत त्याच्याशी साधलेला संवाद...

:ओटीटी बिग बाॅस हा कार्यक्रम खूप लोकप्रिय आहे आणि अशा कार्यक्रमाचे तुम्ही होस्ट आहात. हिंदी चित्रपट, हाॅलीवूड चित्रपट आणि ओटीटी असा प्रवास करीत आहात. आता तुमच्या मनामध्ये नेमक्या काय भावना आहेत?

- जेव्हा आपल्याला एखादी नवीन गोष्ट करण्याची वा अनुभवण्याची संधी मिळते तेव्हा नक्कीच आनंद होतो. कारण ते काम आपण पहिल्यांदा केलेले नसते. त्यामुळे एक प्रकारचा उत्साह मनामध्ये असतो.

 तसेच त्यात एक वेगळीच मजा असते.  सूत्रसंचालन करणे ही माझ्यासाठी खूपच नवीन गोष्ट आहे आणि यासाठी मी फार उत्सुक आहे. ही संधी मला अभिनयापलीकडे जाऊन आणखी काही नवीन शिकविणार आहे.

: हा शो होस्ट करण्यासाठी तुम्हाला काही वेगळी तयारी करावी लागली का ?

- हो अगदीच ! मी माझ्या पूर्ण करिअर मध्ये केवळ अभिनयच केला आहे आणि सूत्रसंचालन ही माझ्यासाठी एक नवीन गोष्ट असल्यामुळे मला त्यातील खूप गोष्टी शिकाव्या लागल्या. सूत्रसंचालन करताना त्यातील नियमांचा अभ्यास करावा लागला. एक सूत्रसंचालक कसा असावा याबाबतीतही बरीच तयारी करावी लागली.

आपलं आयुष्यही एक चित्रपट आहे. ज्याप्रमाणे आयुष्यात चांगल्या व वाईट परिस्थिती येते आणि आपण त्यांना सामोरे जातो. काही जवळची-लांबची नाती असतात, रुसवे-फुगवे असतात, प्रेमही असते. या सगळ्यांना मी माझ्या सामान्य जीवनात कशा प्रकारे हाताळतो ते महत्त्वाचे आहे तसेच माझ्या ४५ वर्षांच्या करिअरमधून मी ज्या काही गोष्टी शिकलो, अनुभव घेतला त्यामुळेच मी आज यशाच्या पायरीवर उभा आहे. लहानपणापासून ते आत्तापर्यंत माझ्या सामान्य जीवनातल्या या सगळ्या अनुभवाचा मी या कार्यक्रमात उपयोग करेन.

: अभिनय करणे वेगळे आणि एखाद्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणे वेगळे असते. सूत्रसंचालन करताना किती जबाबदारी असते. असे तुम्हाला वाटते?

- प्रत्येक कामाची एक जबाबदारी असतेच आणि कोणतेही काम जबाबदारीने केल्याशिवाय ते योग्यपणे पार पडत नाही. मी जेव्हा चित्रपटात काम करतो तेव्हा मी एक काल्पनिक भूमिका निभावात असतो. आणि पडद्यावर मी प्रेक्षकांसमोर त्या काल्पनिक भूमिकेच्या स्वरूपात येत असतो. पण सूत्रसंचालन ही काही काल्पनिक भूमिका नसून मी एक सूत्रसंचालक म्हणून स्वतः प्रेक्षकांसमोर येणार आहे. मला वेळोवेळी माझ्या उच्चारांवर, शब्दरचनेवर, वाक्यरचनेवर लक्ष ठेवावे लागेल. शिवाय एक उत्तम व्यक्तिमत्त्व लोकांसमोर आणायचे आहे.  त्यामुळे मी स्वतःला त्यांच्यासमोर कशाप्रकारे सादर करतो ही खूप मोठी जबाबदारी आहे.

:  तुम्ही एक उत्तम कलाकार आहात. आतापर्यंत नायक-खलनायक ते चरित्र अभिनेता असा प्रवास तुम्ही केला आहे. आता सूत्रसंचालन करताना तुम्ही प्रेक्षकांना काय नवीन देणार आहात?

- मी नेहमीच एक कलाकार म्हणून माझ्या अभिनयातून प्रेक्षकांच्या समोर आलो आहे. आता एक सूत्रसंचालक म्हणून त्यांना भेटणार आहे. शिवाय एक कलाकार नाही तर केवळ एक व्यक्तिमत्त्व म्हणून या कार्यक्रमाद्वारे मी स्वतःला सादर करणार आहे. त्यामुळे कदाचित प्रेक्षकांना चित्रपटातील हिरो याव्यतिरिक्त माझ्या आणखीन काही नवीन बाजू पाहायला मिळतील. त्यांना माझी नव्याने ओळख होईल असे मला वाटते.

बऱ्याचदा माझ्या काही चित्रपटातील चाहत्यांच्या आवडत्या भूमिका जसे की, 'वेलकम मधील मजनू भाई' , ' नायक मधील शिवाजीराव' अशी अनेक रुपे दिसतील.

: बिग बॉस करण्याचा विचार केल्यावर काही अडचणी आल्या का?

- मला कोणत्याच अडचणींना सामोरे जावे लागले नाही. कारण प्रत्येक अडचण ही खूप काही शिकवणारी असते. मी माझ्या कामामध्ये आलेल्या सर्व अडचणींना सकारात्मकतेने बघतो आणि तितक्याच उत्साहाने तसेच आनंदाने त्यांना सामोरे जातो आणि पुढे सरकतो.

: या कार्यक्रमातून तुम्हाला काय नवीन शिकायला मिळेल असं तुम्हला वाटते ?

- कार्यक्रम सुरु व्हायच्या आधीच बऱ्याच नवीन लोकांशी माझी भेट झाली. जिओ ओटीटी वाहिनीच्या संपूर्ण टीमला मी भेट दिली. त्यांच्याकडून मला खूप नवीन आणि अनोख्या गोष्टी शिकायला मिळाल्या.

शिवाय पुढे या कार्यक्रमाच्या सर्व स्पर्धकांना मी भेटेन. त्यांच्याकडून देखील खूप काही शिकायला मिळेल. एवढ्या सगळ्या लोकांना एकत्र एकाच वेळी भेटणे, त्यांचे कुटुंब, त्यांच्याशी असलेली प्रेमळ नाती, त्यांचे विचार, त्यांचे स्वभाव, जीवनाबाबतीत असलेले त्यांचे मत मला जाणून घ्यायला मिळणार आहे. अभिनयापलीकडे जाऊन काही तरी वेगळा आणि अनोखा अनुभव मला मिळेल. माझ्या यशात आणखीन वाढ होईल. आणखीन उत्तम संधी मला प्राप्त होतील.

: मनोरंजन क्षेत्रात तुमची सर्वात मोठी प्रेरणा कोणती आहे?

- असे बरेच कलाकार आहेत ह्यांची प्रेरणा घेऊन मी इथपर्यंत आलो आहे. जसे की, दिलीप कुमार, राज कपूर, देव आनंद, अमिताभ बच्चन, नसिरुद्दीन शाह शिवाय काही साऊथ कलाकार कमल हसन जे आत्ता तमिळ बिग बॉस होस्ट करत आहेत तसेच मोहनलाल जे मल्ल्याळम मध्ये बिग बॉस होस्ट करत आहेत.

:  आजही तुमची  ‘झकास’ इनिंग सुरू आहे. हे तुम्हाला कसे काय जमले कारण कित्येक कलाकार आले आणि गेले. परंतु तुमचा प्रवास आजही सुरू आहे. याबाबतीत तुम्ही काय सांगाल.

- मी प्रेक्षकांचा तसेच माझ्या चाहत्यांचा खुप आभारी आहे. आजवर त्यांनी मला जे प्रेम दिलं त्यामुळेच मी इतका यशस्वी होऊ शकलो आहे. शिवाय माझे सर्वस्व म्हणजेच माझे आई-बाबा त्यांचे आशीर्वाद आणि प्रेम या पूर्ण प्रवासात माझ्यासोबत होतं आणि पुढेही राहील.

मी स्वतःला खूपच भाग्यशाली समजतो की, मी इतके वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन करू शकलो आणि पुढेही शेवटच्या श्वासापर्यंत मी तितकंच प्रेम आणि मनोरंजन देण्याचा प्रयत्न करत राहीन.

-मनाली सागवेकर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com