मराठी इंडस्ट्रीत अनेक कलाकार काम करतात. उत्तम अभिनयामुळे प्रेक्षकांचं मनोरंजन करतात, त्यांना प्रसिद्धीही मिळते आणि नंतर अचानक ते सिनेइंडस्ट्रीमधून गायब होतात. ते नक्की कुठे गेले? ते आता काय करतायत याची उत्तरं बऱ्याचदा मिळत नाहीत. इंडस्ट्रीतून बराच काळ दूर राहिलेला असाच एक अभिनेता म्हणजे भूषण कडू.
अनेक नाटकं, मालिका आणि सिनेमा यांमध्ये काम करून भूषणने सगळ्यांची मनं जिंकली पण गेला बराच काळ तो इंडस्ट्रीपासून दूर आहे. पण बऱ्याच वर्षांनी भूषणने कॅमेऱ्यासमोर येऊन मुलाखत दिली आणि इतक्या वर्षांत त्याने काढलेल्या हलाखीच्या परिस्थितीचा खुलासा त्याने केला.
नुकतंच भूषणने लोकमत फिल्मी या युट्युब चॅनेलला मुलाखत दिली. त्यावेळी त्याने त्याची सगळी परिस्थिती सांगितली. लॉकडाऊनच्या काळात सगळ्यांप्रमाणेच भूषणची आर्थिक परिस्थिती कोलमडली होती. त्यातच त्याच्या पत्नीचं कादंबरीचं निधन झालं आणि याचा खूप मोठा परिणाम भूषणच्या आयुष्यावर झाला. त्याचं सगळं काम कादंबरी मॅनेज करत होती. तिच्या जाण्याने त्याच संपूर्ण आर्थिक गणित कोलमडलं. त्याच्यात मुलाची संपूर्ण जबाबदारी पूर्णपणे त्याच्यावर येऊन पडली. त्यात काम नसल्यामुळे भूषण अजून डिप्रेशनमध्ये गेला.
यातच त्याला काही कारणांमुळे हास्यजत्रेचं काम त्याला सोडावं लागलं. त्यामुळे त्याची परिस्थिती खूप हलाखीची झाली आणि इथून त्याचं आयुष्य बदललं.
भूषण म्हणाला,"मला सगळीकडे लोक विचारायचे तुझं सध्या काय सुरू आहे, काय काम करतोयस तू? लोकांना समजलं होतं माझ्या पत्नीच्या निधनाबद्दल. कारण बिग बॉसमध्ये त्यांनी माझी फॅमिली पाहिली होती. काही तर असं जाहीर करून मोकळे झाले होते की मी या जगात नाहीये. मला पण करोना झाला आणि मी गेलो. अन या काळाने मला लोकांचे खरे चेहरे दाखवले. माझ्याकडे थोडे पैसे होते साठवलेले पण पत्नीच्या आजारपणात आणि करोना काळात ते सगळे संपले. एक वेळ अशी आली की माझ्याकडे पैसेच नव्हते."
"मला त्या काळात थोडंसं दारूचं व्यसन लागलं होतं पण अनेकांनी माझ्याविषयी अनेकांनी अफवा पसरल्या होत्या. माझं अफेअर सुरु आहे, मी खूप दारू पितो किंवा मी हे काम करणार नाही असं अनेकांनी पसरवलं होतं पण तसं काहीच नव्हतं आणि त्यामुळे माझ्या हातातील बरंच काम गेलं. माझे आणि माझ्या मुलाचे खूप हाल झाले. मी माझ्या मुलाच्या गरजा, स्वप्नं पूर्ण करू शकलो नाही. "
"लोकांसाठी आम्ही कलाकार म्हणजे खूप पैसे असलेले असतो पण आमची खरी परिस्थिती लोकांना कळत नाही. चांगले कपडे, गाडी, आता अशी परिस्थिती होती की गाडी तर आहे पण डिझेल टाकायला पैसेच नाहीत. काम मागायला जायलादेखील हातात पैसे नाहीत. मी एका मित्राला फोन केला आणि सांगितलं मला ८५० रुपयांची गरज आहे तर त्याला खरंच वाटेना. म्हणाला, तू जे जोक करतोस ते टीव्हीवर कर माझ्याबरोबर गंमत करू नको. जेव्हा आर्थिक चणचण वाढत गेली. तेव्हा मुलालाही त्याला हवं ते देऊ शकत नव्हतो. जुने दिवस असते तर त्याला खूप काही मिळालं असतं पण..." असंही भूषणने सांगितलं.
"या सगळ्या परिस्थितीने मी पूर्ण खचलो आणि मी ठरवलं कि सुसाईड करायचं. मी सुसाईड नोट लिहायला घेतली. माझ्या मनात इतकं साठलं होतं कि रोज मी त्या नोटमध्ये सगळं लिहायचो. हे असंच सुरु असताना एकदा घरातील खरेदीला गेलो होतो. काही माणसं भेटली त्यात ठाण्यातील स्वामींच्या मठाचं कामकाज बघणारे पाटील दादाही भेटले. त्यांनी माझी परिस्थिती बघितली. माझी दाढी वाढली होती, कपडे ठीक नव्हते. त्यांनी मला म्हंटल कि, 'तुम्ही असं वागू नका तुम्ही उदयपासून स्वामींच्या मठात या.' त्यांचं म्हणणं मी ऐकलं आणि मी स्वामींच्या मठात जायला लागलो आणि तिथल्या सगळ्या माणसांनी माझं आयुष्य बदललं. माझ्या डोक्यातील आत्महत्येचे विचार गेले. मी पुन्हा कामाला सुरुवात केली. त्यांनी मला आर्थिक मदतही केली आणि त्यांच्यासाठीच मी पुन्हा उभा राहिलो. " हे सांगताना भूषण भावूक झाला.
"त्या दिवसांनी मला आपलं कोण परके कोण हे शिकवलं. माझ्या सासूबाई, मेहुणा यांनी मला आधार दिला. त्या आहेत त्यामुळे मी मुलाला घरी ठेऊन कामासाठी बाहेर पडू शकतो. मी पुन्हा एकदा कामाला आता सुरुवात केली आहे. " असं म्हणत त्याने त्याच्या मुलासाठी काहीतरी करण्याचा निर्धार व्यक्त केला.