मी तर शाहरुख खानसमोर हात जोडले! अभिनेता कैलास वाघमारेने सांगितला 'गाभ' चित्रपटाचा प्रवास
शब्दांकन : मयूरी महेंद्र गावडे
आजवर लव्हस्टोरी असलेल्या सिनेमांत हिरो-हिरोईनचं प्रेम जुळवण्यासाठी अनेक युक्त्याही लढवल्या गेल्याचं पाहायला मिळालं. आता चक्क एक रेडा दोन प्रेमी युगुलांची लव्हस्टोरी पूर्ण करताना दिसणार आहे. 'गाभ' असं त्या चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटाची संकल्पना, लेखन आणि दिग्दर्शन अनुप जत्राटकर यांचे आहे. टाईमलॅप्स प्रोडक्शन आणि एजे मल्टिमीडिया प्रोडक्शनची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे निर्माते सुमन नारायण गोटुरे आणि मंगेश नारायण गोटुरे आहेत. सहनिर्माते अनुप जत्राटकर आहेत. या सिनेमात अभिनेता कैलास वाघमारे आणि अभिनेत्री सायली बांदकर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. यानिमित्त कैलासशी केलेली खास बातचीत...
गाभ चित्रपटाच्या कथानकाविषयी काय सांगाल?
गाभ म्हणजे गर्भ. जेव्हा रेडा आणि म्हैस यांचे मिलन झाल्यावर म्हैस गर्भधारणा करते. तेव्हा जो गाभ तयार होतो, त्यावर हा सिनेमा बोलतो. परंतु तेवढेच नसून त्यासोबत या चित्रपटातील नायक दादू जे पात्र मी साकारत आहे. तर त्या दादूमध्ये एक माणूस म्हणून होणारे बदल देखील तेवढेच महत्त्वाचे आहेत. दादूच्या मनात देखील एक गाभ आहे. आपल्याला आयुष्यात खूप काही करायचं असतं. पण आपल्या इच्छा पूर्ण नाही झाल्या तर त्याच खापर आपण इतरांवर टाकतो. पण स्वतः काय केले आहे, याचा विचार आपण नाही करत. तर हा चित्रपट आपण स्वतः काय आहोत, याविषयी विचार करायला भाग पाडणारा आहे.
तुम्ही साकारत असलेल्या पात्राविषयी काय विशेष तयारी केली?
या चित्रपटात मी दादू हे पात्र साकारीत आहे. जो या कथेचा नायक आहे. तसेच तयारीविषयी जर सांगायचं झालं तर मी मराठवाड्याचा आहे आणि दादू हा कोल्हापुरातील गडहिंग्लजमधील एक छोट्या गावातील रहिवासी आहे. त्यामुळे मला भाषेवर थोडी मेहनत घ्यावी लागली. भाषेचा लहेजा त्यानुसार ठेवावा लागला. आपल्याला माहिती आहेच की, मराठवाड्यासारख्या भागात पाण्याच्या अनेक समस्या आहेत. पण मी जास्त एन्जॉय हे केले की ज्यावेळी आम्ही चित्रीकरण करत होतो त्यावेळी मी कोल्हापूर भागात होतो जिथे अक्षरशः नद्या वाहत होत्या. दुसरी गोष्ट माझ्या घरी गुरे आहेत. त्यामुळे मला ऑफस्क्रीन त्यांना कसं हाताळायचं याविषयी माहिती होतीच. तरीसुद्धा ऑनस्क्रीन ते मला अवघड वाटलं होतं. पण त्या रेड्याने आणि म्हशीने अगदी आपले सहकलाकार जसे साथ देतात तशीच साथ दिली.
या आधी केलेल्या कामात आणि या कामात काय वेगळेपणा जाणवला?
आतापर्यंत केलेल्या कामापेक्षा हे काम खूपच वेगळं होतं. मुख्य म्हणजे मी या आधी कधीच रोमॅंटिक चित्रपट नव्हते केले. हा माझा पहिला रोमॅंटिक सिनेमा होता. जो करताना मी बरीच तारेवरची कसरत केली. मला पहिलं वाटलं होतं की, मी करीन हे सगळं. पण ऑनस्क्रीन रोमान्स हा खूप अवघड प्रकार आहे. जेव्हा हे मी केलं तेव्हा शाहरुख खान यांना मी हात जोडले. हिरोईन सोबत डान्स करणं असो किंवा रोमान्स करणं असो, हे सर्व मी पहिल्यांदाच या चित्रपटात केलं. यासाठी मी माझी सहकलाकार सायलीचे आभार मानेन. तिने यामध्ये मला बरीच मदत केली आहे. प्रत्येक सिनेमा आपल्याला नवीन काही तरी शिकवत असतो. ह्या सिनेमाने देखील मला अनेक नवीन गोष्टी शिकवल्या असं मी नक्कीच म्हणू शकतो.
एकूणच तुमच्या अभिनय प्रवासात झालेला मोठा बदल काय आहे?
सिनेमा मिळवणं हा खूप मोठा बदल झाला आहे, असं मला वाटतं. पण आता मी याच्या दोन पावलं पुढे आलो आहे. मी आतापर्यंत जे काम केलं आहे, जी मेहनत घेतली आहे, त्याचंच हे फळ आहे की आता माझं काम बघून समोरून मला चित्रपटाच्या ऑफर्स येतात. पण त्यात बऱ्याचदा असं होतं की तोच तोच सारखेपणा येण्याचे चान्सेस असतात. म्हणून मी सिनेमा निवडताना काही तरी नवीन कथांना प्राधान्य देतो. एक अभिनेता म्हणून स्वतःला चॅलेंज करतो. आता हा चित्रपट देखील मला तसाच मिळाला. दिग्दर्शकांनी माझी एक शॉर्ट फिल्म बघितली, ज्यामध्ये मला नऊ बेस्ट अॅक्टरचे अवॉर्ड मिळाले होते. माझं ते काम बघूनच मला या चित्रपटाच्या नायकासाठी अप्रोच करण्यात आलं.
दादू या पात्राकडून तुम्हाला कोणत्या नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या?
दादूकडून मी शिकलेली मुख्य गोष्ट म्हणजे माणूस म्हणून स्वतःशी कसं डील करावं. आपल्या प्रत्येकाचं स्वतःचं एक विश्व असतं आणि आपण त्याच्या बाहेर कधी पडतचं नाही. तर ते बाहेर पडणं गरजेचं असतं. आणि ते का? हे सिनेमा बघून तुमच्या लक्षात येईलच. आपल्या निसर्गाकडून काही तरी अपेक्षा असतात. पण निसर्ग ते पूर्ण करत नाही. तरी आपण अट्टाहास करत राहतो आणि स्वतःला त्यामध्ये गुरफटवून घेतो. पण निसर्ग ते देत नाहीये याचा अर्थ तो आपल्या अपेक्षांपेक्षा काही तरी भारी देवू पाहतोय, हे आपण जाणूनच घेत नाही. तर हेच मी शिकलो आहे की, स्वतःच्या अपेक्षांमध्ये बांधून न घेता स्वतःला मोकळ ठेवावं. हा खूप मोठा धडा मिळाला.
सायली बांदकरसोबत काम करताना कसे वाटले?
सायली अतिशय नम्र आणि हुशार अभिनेत्री आहे. ती या क्षेत्रात नवीन असली, तरी तिला कामविषयीचे खूप चांगले नॉलेज आहे. मला तिच्यातला आवडलेला गुण म्हणजे तिला इतरांना श्रेय देता येतं. जो प्रामाणिक काम करतो, त्याला त्याचं श्रेय मिळायला हवं, हे तिला खूप चांगलं समजतं. एकूणच सगळी जबाबदारी तिने खूप छान सांभाळली आहे. आणि एक अभिनेत्री म्हणून तर ती हुशार आहेच. पण एक माणूस म्हणून देखील ती खूप चांगली आहे. ती आयुष्यात खूप पुढे जाईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.