सध्या मराठी टेलिव्हिजन विश्वात नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये प्रत्येक मराठी वाहिनीवर अनेक नव्या मराठी मालिकांची घोषणा करण्यात आली आणि आता सगळीकडे चर्चा आहे ती झी मराठीवर लवकरच सुरू होणा-या लाखात एक आमचा दादा या मालिकेची.
नितीश चव्हाणची मुख्य भुमिका असलेल्या या मालिकेचा नवा प्रोमो नुकताच सोशल मिडियावर शेअर करण्यात आला.
झी मराठीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या या प्रोमोमध्ये भाऊ आणि त्याच्या चार बहिणींची गोष्ट पाहायला मिळत आहेत. कष्ट करून बहिणींना सांभाळणाऱ्या, त्यांच्यावर आईप्रमाणे प्रेम करणाऱ्या आणि भावावर तितकंच जीव तोडून प्रेम करणाऱ्या बहिणींची गोष्ट या मालिकेत पाहायला मिळणार आहे हे या मालिकेच्या प्रोमोमध्ये दिसत आहे.
नितीश मोठ्या भावाची भूमिका साकारत असून त्याच्या चार बहिणींची प्रगती व्हावी, त्यांचं लग्न व्हावं म्हणून प्रयत्न करताना तो दिसतोय. त्याच्या मागच्या बहिणीचं लग्न त्याचे वडील दारुडे आणि आई पळून गेल्यामुळे जमत नाहीये त्याचं दुःख त्याला आहे असं या प्रोमोमध्ये दाखवण्यात आलंय.
पहा प्रोमो:
ही मालिका झी तामिळवरील 'अण्णा' या मालिकेचा रिमेक आहे. दाक्षिणात्य मालिकाविश्वातील ही आघाडीची मालिका आहे.
अनेकांनी मालिकेचा प्रोमो बघून हा रक्षाबंधन सिनेमाचा रिमेक आहे अश्या कमेंट्स केल्या. पण मालिकेची कथा पूर्णपणे वेगळी असल्याचं निर्मात्यांचं म्हणणं आहे. अनेकांनी कमेंट्समधून नितीशच्या लूकचं कौतुक केलं आहे.
आता या मालिकेत नितीशच्या नायिकेच्या भूमिकेत कोण दिसणार याबद्दल चर्चाही सोशल मीडियावर रंगलीय. अभिनेत्री श्वेता खरात या मालिकेत काम करणार असल्याची चर्चा आहे. पण याबाबत अजून मालिकेच्या निर्मात्यांकडून किंवा स्वतः श्वेताकडून कोणताही खुलासा करण्यात आला नाहीये.
श्वेता सध्या सन मराठीवरील 'सुंदरी' या मालिकेत काम केलं आहे. तर या आधी तिच्या 'मन झालं बाजींद','राजा रानीची गं जोडी' या मालिका खूप गाजल्या होत्या.
नितीशसोबत या मालिकेत बाळूमामा फेम कोमल मोरे, ईशा संजय, समृद्धी साळवी आणि जुई तालपुरे यांच्या मुख्य भूमिका आहेत. ही मालिका कधी प्रदर्शित होणार हे अजून जाहीर करण्यात आलं नाहीये.