जगप्रसिद्ध कान्स फिल्म फेस्टिव्हलला दणक्यात सुरुवात झालीये. फ्रान्समध्ये पार पडणाऱ्या या फिल्म फेस्टिव्हलमध्ये जगभरातील काही निवडक सिनेमांचं, डॉक्युमेंट्रीचं स्क्रीनिंग केलं जातं. यंदा कान्स फिल्म फेस्टिव्हलचं ७७ वं वर्ष सुरु आहे आणि जगभरातील अनेक सेलिब्रिटीजनी या फेस्टिव्हलला हजेरी लावली आहे. सुप्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री मेरील स्ट्रीप यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
एकेकाळी हॉलिवूड गाजवणाऱ्या सुप्रसिद्ध अभिनेत्री मेरील स्ट्रीप यांनी स्टायलिश अंदाजात कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर हजेरी लावली. पांढरा गाऊन आणि स्टायलिश चष्म्यामध्ये त्या सुंदर दिसत होत्या. कान्स फिल्म फेस्टिव्हलचा पहिला दिवस मेरील स्ट्रीप यांना समर्पित करण्यात आला होता. या फिल्म फेस्टिव्हलच्या उद्घाटन समारंभाला त्यांचा प्रतिष्ठित पाल्मे डी'ओ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
हा पुरस्कार मिळाल्यामुळे मेरील खूप खुश होत्या. हा पुरस्कार त्यांनी त्यांच्या आईला समर्पित केला. त्यांच्या सन्मानार्थ सगळ्यांनी जागेवर उभं राहून त्यांना अभिवादन केलं.
कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या पहिल्या दिवशी ग्रेटा गेरविग, एब्रू सीलोन, लिली ग्लैडस्टोन, ईवा ग्रीन, नादीन लाबाकी, जुआन एंटोनियो बायोना या कलाकारांनी हजेरी लावली. तर रेड कार्पेटवर मेस्सी नावाच्या कुत्र्यानेही हजेरी लावत सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. या डॉगनेही कॅमेऱ्यासमोर पोझ दिल्या. सोशल मीडियावर त्याचे फोटो व्हायरल झाले आहेत.
21 ऑस्कर पुरस्कार जिंकणाऱ्या आणि 8 वेळा गोल्डन ग्लोब पुरस्काराने सन्मानित असलेल्या मेरील स्ट्रीप या हॉलिवूडमधील विख्यात अभिनेत्री आहेत. 1977 साली 'ज्युलिया' या सिनेमातून त्यांनी सिनेविश्वात पदार्पण केलं.
'क्रेमर व्हर्सेस क्रेमर', 'हॉलोकास्ट', 'सोफीज चॉईस', 'आउट ऑफ आफ्रिका', 'लिट्ल वुमन'असे त्यांचे अनेक सिनेमे गाजले. द आर्यन लेडी या सिनेमात त्यांनी साकारलेली 'मार्गारेट थॅचर' यांची भूमिका विशेष गाजली. या भूमिकेने त्यांना त्यांच्या आयुष्यातील तिसरा ऑस्कर मिळवून दिला. 'क्रेमर व्हर्सेस क्रेमर' सिनेमातील भूमिकेसाठी त्यांना पहिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता तर 'सोफीज चॉईस' या सिनेमासाठी त्यांनी मुख्य अभिनेत्री म्हणून पुरस्कार जिंकला होता.