अभिनेत्री मृणाल दुसानिस चार वर्षांनी भारतात कायमची परतली. मृणाल लवकरच पुन्हा एकदा मराठी इंडस्ट्रीमध्ये काम सुरु करणार आहे. सध्या मृणाल तिचा नवरा आणि मुलीसोबत क्वालिटी टाईम एन्जॉय करतेय. नुकतंच मृणालने दिलेल्या एका मुलाखतीत ती तिच्या पहिल्या मालिकेच्या शूटिंगवेळी खूप रडल्याचा किस्सा शेअर केला.
मृणालने नुकतीच सुलेखा तळवलकर यांच्या 'दिल के करीब' या कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी मृणालला सुलेखा यांनी पहिल्यांदा कॅमेरासमोर उभी राहिलीस तेव्हा मनात काय विचार होते ? पहिला दिवस कसा होता? असा प्रश्न विचारला.
त्यावेळी मृणाल म्हणाली,"हो, मला आठवतोय पहिला दिवस. एकतर ज्यादिवशी माझं शूट होणार होतं त्यादिवशी माझी आई नाशिकला परत जाणार होती. त्याच्या आधी तीन दिवस ती माझ्याबरोबर मुंबईत राहत होती आणि मग ती नाशिकला जाणार होती. मला आधी खूप आत्मविश्वास होता की आपण करू शकतो एवढं काय अवघड नाहीये. एकटं वगैरे राहू शकतो. माझी आई त्या एका शॉटनंतर जाणार होती.माझ्या मनात ते होतं की आता मी काय करू. तो पहिलाच शॉट होता माझा. माझ्या बहिणीने आत्महत्या केली असते आणि तिची आठवण येऊन मला रडायला येत असतं. खिडकीकडे बघतानाचा माझा लूक होता आणि माझी आई तिकडे लांब खिडकीपाशीच उभी होती. मला त्या खिडकीत लूक देऊन मला रडायचं होतं. मी इतकी ढसाढसा रडले असेन की आई जाणार आहे आता.पण ते त्या शॉटसाठी एकदम चपखल बसलं. असा तो शॉट माझ्या लक्षात आहे आणि त्यानंतर आईपण गेली माझी. तो एक दिवस माझ्या लक्षात आहे. बालाजीची माझी पहिलीच मालिका होती ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’. आम्ही सगळेच नवखे होते मी अभिजीत वगैरे. तेव्हा प्रोफेशनली कॅमेरासमोर मी पहिल्यांदाच अभिनय करत होते. त्यामुळे धाकधूक तर होतीच."
'माझिया प्रियाला प्रीत कळेना' या झी मराठीवरील मालिकेतून मृणालने अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. तिची ही मालिका खूप गाजली. या मालिकेत तिने साकारलेली शमिका सगळ्यांना खूप आवडली तर अभिजीत आणि तिची जोडी सगळ्यांच्या लक्षात राहीली. मृणाल आता कोणत्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत.