Amhi Jarange: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या जीवनावर आधारित 'आम्ही जरांगे - गरजवंत मराठ्यांचा लढा' हा चित्रपट येत्या 14 जूनला सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे. मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे सामाजिक कार्यकर्ता मनोज जरांगे पाटील यांच्या ज्वलंत चळवळीला मोठ्या पडद्यावर चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
''आम्ही जरांगे - गरजवंत मराठ्यांचा लढा'' या चित्रपटात मराठमोळा अभिनेता अजय पूरकर अण्णासाहेब पाटील यांची भूमिका साकारणार आहे. अण्णासाहेब पाटील हे मराठ्यांचे पहिले नेते होते. त्यासोबतच माथाडी कामगारांचे प्रश्न आणि त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी माथाडी कामगारांच्या हक्कासाठी लढा दिला. अवघ्या मराठा समाजाचे नेतृत्व करण्यासाठी त्यांनी कंबर कसली. त्यामुळेच मराठा समाजाचे पहिले नेते म्हणून अण्णासाहेब पाटील यांच नाव घेतलं जातं. त्यांच्यासारखं भारदस्त व्यक्तिमत्त्व पडद्यावर साकारण्याची संधी या चित्रपटाद्वारे अभिनेता अजय पुरकरांना मिळाली.
याविषयी बोलताना अजय पुरकर म्हणाले, जेव्हा दिग्दर्शकांनी पहिल्यांदा मला या चित्रपटाविषयी सांगितले तेव्हा मी अण्णासाहेब पाटील यांचा फोटो पाहिला. त्यांची परदंड शरीरयष्टी आणि भारदस्त व्यक्तिमत्त्व पाहून मला असं वाटलं, की मी हे पात्र साकारू शकतो. कारण मी प्रत्येक भूमिकेचा विचार करताना आधी आपण शारीरिक दृष्ट्या तसे दिसतोय का, याचा विचार करतो. त्यानंतर मग बाकीच्या गोष्टींकडे लक्ष देतो. अण्णासाहेबांची विशिष्ट प्रकारची मिशी होती, जे मला थोडं इंटरेस्टिंग वाटलं. आणि त्यांनी ती मिशी कायम राखली होती. ते एक उमदे व्यक्तिमत्त्व होते. आणि म्हणूनच ती बॉडी लेंग्वेज, तसा आवाज वापरण्याचा मी प्रयत्न केला आहे. त्यासोबतच भाषेचा लहेजादेखील ग्रामीण ठेवून मी हे पात्र रंगवले आहे.ते पुढे म्हणाले, ज्यावेळी पहिल्यांदा आम्ही प्रत्यक्ष माथाडी कामगारांचे काही सीन चित्रित करत होतो, तेव्हा खरंच मी ५० किलो कांद्यांच पोते उचलून तो सीन केला. आणि हा खरंच खूप निराळा अनुभव मी त्यावेळी घेतला. माथाडी कामगारांची जी आकडी असते ज्याने ते पोत कसं उचललं जातं हे मी त्यांच्याकडून शिकून घेतले. ही काम करायला काय ताकद लागते, ते मला यावेळी समजलं. या पात्राचा क्लायमॅक्स मला एक माणूस म्हणून भावला. कारण स्वतःचा शब्द प्रमाण मानून तो जर पाळला गेला नाही तर स्वतःचा जीव देण्याची धमक असलेला नेता म्हणजे अण्णासाहेब पाटील होय. शेवटी ते म्हणाले, चित्रपटाच्या सुरुवातीलाच अण्णासाहेब पाटील यांची ही कथा दाखवण्यात आली आहे, त्यामुळे माझ्यावर ही मोठी जबाबदारी होती की मला अपेक्षित रंग तिथे द्यायचा होता. एकूणच या सगळ्याचा मेळ खूप छान बसला आहे. त्यामुळे मी अशी अपेक्षा करतो की लोकांना माझी ही एक वेगळी भूमिका म्हणून नक्की आवडेल.
नारायणा प्रोडक्शन निर्मिती केलेल्या 'आम्ही जरांगे - गरजवंत मराठयांचा लढा' ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन योगेश पांडुरंग भोसले यांनी केले आहे. या चित्रपटाचे सह निर्माते उत्तमराव नारायणराव मगर, डॉ. मधुसूदन उत्तमराव मगर, विक्रम विठ्ठलराव पाटील, दमयंती विठ्ठलराव पाटील,डॉ. दत्ता यशवंतराव मोरे, योगेश पांडुरंग भोसले हे आहेत. या भन्नाट क्रांतिकारी चित्रपटाची कथा - पटकथा सुरेश पंडित यांनी लिहिली आहे. चित्रपटाचे संवाद सुरेश पंडित, संजय नवगिरे व किशोर गरड यांनी लिहिले असून, या चित्रपटाचे छायाचित्रकार विकास सिंह हे आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.