अवयवदान ही सध्या काळाची गरज झाली आहे. मृत्यूनंतर कुणाच्या तरी जीवनात आनंद फुलवण्यासाठी अवयव दान करणे आवश्यक आहे. त्याबाबतीत अधिक जनजागृती करणे आवश्यक आहे. दिग्दर्शक साहिल शिरवईकरचा 'लाईफ लाईन' हा चित्रपट समाजातील याच गंभीर विषयावर भाष्य करणारा आहे. जुने पारंपरिक रितीरिवाज आणि आधुनिक विज्ञान याची ही कथा आहे आणि दिग्दर्शकाने कलाकारांची चांगली फळी घेऊन ती मांडण्याचा प्रयत्न केला आहे. किरवंत ब्राह्मण केदारनाथ अग्निहोत्री (माधव अभ्यंकर) आणि डॉ. विक्रम देसाई (अशोक सराफ) यांच्यातील संघर्षाची ही कहाणी आहे.
केदारनाथ अग्निहोत्री हे त्यांची पत्नी व मुलासह राहात असतात. स्वभावाने ते हट्टी, घमेंडी आणि कमालीचे अहंकारी असतात. भगवंतानंतर किरवंत अशा प्रकारचा शब्दप्रयोग वारंवार करून ते आपली अहंकारी वृत्ती प्रदर्शित करीत असतात. एके दिवशी एका मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी केदारनाथ स्मशानभूमीत गेलेले असतात. त्याच वेळी तेथे डॉ. विक्रम देसाई आपल्या काही सहकाऱ्यांना घेऊन पोहोचतात. डॉ. विक्रम देसाई हे एक निष्णात आणि प्रसिद्ध डॉक्टर असतात. अवयव दानाबाबत ते जनजागृती करीत असतात आणि त्याचसाठी ते तेथे आलेले असतात. तेथील मंडळींना ते अवयवदानाबाबत माहिती देत असतात.
केदारनाथांना ही बाब समजताच ते कमालीचे संतप्त होतात कारण असे केल्याने त्याचा आपल्या व्यवसायावर परिणाम होईल.. अशी त्यांना भीती असते. त्यामुळे केदारनाथ आणि डॉ. विक्रम देसाई यांच्यामध्ये शाब्दिक संघर्ष उडतो. दोघेही आपापले म्हणणे नेटाने मांडतात. मग हा संघर्ष कोणत्या थराला जातो आणि पुढे काय घडते. त्यासाठी हा चित्रपट पाहावा लागेल. दिग्दर्शक साहिल शिरवईकरने एक चांगला सामाजिक विषय या चित्रपटामध्ये मांडलेला आहे. मानवाचे शरीर हे देवाने दिलेली देणगी आहे आणि आपल्या मृत्यूनंतर ते कुणाला दान केल्यास वावगे ठरू नये हेच या चित्रपटातून सांगण्यात आले आहे.
अवयव दानासारख्या गंभीर विषयाचे महत्त्व आणि जनजागृती या चित्रपटात करण्यात आली आहे. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी समंजस व समजूतदार डॉ. विक्रम देसाई ही भूमिका छान साकारली आहे. माधव अभ्यंकर यांनी केदारनाथ अग्निहोत्री ही किरवंत ब्राह्मणाची भूमिका सुरेख उभी केली आहे. त्यांच्या या भूमिकेला वेगवेगळ्या छटा आहेत. एकीकडे अहंकारी आणि कर्मठ असा किरवंत ब्राह्णण तर दुसरीकडे आपल्या मुलाच्या उपचारासाठी धडपड करणारा हतबल पिता असे या भूमिकेचे बेअरिंग त्यांनी नेमकेपणाने उत्तम पडद्यावर मांडलेले आहे. या दोन्ही ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कलाकारांबरोबरच संध्या कुटे, हेमांगी कवी, जयवंत वाडकर, भरत दाभोळकर, शर्मिला शिंदे, शुश्रुत मंकणी या कलाकारांनीदेखील उत्तम साथ दिली आहे.
केदारनाथ अग्निहोत्री यांची पत्नी आणि एका मुलाची आई ही भूमिका अभिनेत्री संध्या कुटे यांनी उत्तम साकारली आहे. हेमांगी कवीनेदेखील तिच्या वाट्याला आलेली भूमिका उत्तम वठविली आहे. छोट्याशा भूमिकेत समीरा गुजरने आपली छाप पाडली आहे. चित्रपटाचे संगीत छान झाले आहे. चित्रपटातील काही संवाद दमदार आहेत. त्याबाबतीत राजेश शिरवईकर यांचे कौतुक करावे लागेल. परंतु पटकथेवर म्हणावे तसे काम झालेले दिसत नाही. त्यामुळे चित्रपट सुरुवातीला काहीसा रेंगाळतो. कथा म्हणावी तशी पुढे सरकत नाही. तरीही समाजातील एका महत्त्वाच्या विषयावर या चित्रपटामध्ये प्रभावी भाष्य करण्यात आले आहे. अवयव दान ही काळाची गरज आहे आणि हाच मुद्दा या चित्रपटामध्ये अधोरेखित करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.