Ashok Saraf : अशोक सराफ यांनी पहिली एकांकिका गाजवली ; सेट, म्युझिक काही नाही फक्त अभिनयातून साकारली एकांकिका

अभिनेते अशोक सराफ यांनी फक्त अभिनयाने त्यांची पहिली एकांकिका गाजवली. जाणून घेऊया ही रंजक कहाणी.
Ashok Saraf
Ashok SarafEsakal
Updated on

मराठी इंडस्ट्रीमधील एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणजे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ. उत्तम अभिनेते आणि तितकाच भन्नाट कॉमेडी सेन्स लाभलेल्या अशोक यांनी आजवर मराठीसोबत हिंदी इंडस्ट्रीमध्येही काम करत स्वतःचा एक ठसा प्रेक्षकांच्या मनावर उमटवला आहे.

सोशल मीडियावर नुकतीच अशो यांच्या बद्दलची एक पोस्ट चर्चेत आहे. सोशल मीडियावर विविध विषयांवर लिहिणाऱ्या एका गृहस्थांनी अशोक यांच्या एका गाजलेल्या एकांकिकेची आठवण शेअर केली.

'या' एकांकिकेमुळे मिळाली अशोक यांना प्रसिद्धी

फेसबुकवर मकरंद करंदीकर या गृहस्थांनी अशोक मामांची एक आठवण त्यांच्या वॉलवर पोस्ट केली. अशोक मामा यांनी बँकेत काम करत असताना त्यावेळी होणाऱ्या एकांकिका स्पर्धेत भाग घेतला. त्यावेळी ते अगदी नवखे कलाकार होते. पण पाहिल्याच एकांकिकेत त्यांनी स्वतःच्या अभिनयाचा दबदबा तयार केला. त्यांच्या कामाची चर्चा त्यानंतर बराच काळ सुरु होती.

मकरंद त्यांच्या पोस्टमध्ये लिहितात,"अशोक सराफची विनोदी फटाक्यांची आतषबाजी !

अशोक सराफ या अभिनेत्याबद्दल मराठी माणसांना नव्याने सांगण्यासारखे काही नाही.उत्तम आणि उत्स्फूर्त अभिनय करणारा अशोक सराफ हा अनेक नवीन अभिनेत्यांसाठी एक आदर्श ठरला आहे. शाब्दिक, कायिक आणि मुद्रा अभिनय हे अशोकचे महत्त्वाचे गुण आहेत. एखाद्या संवादावर थोडे थांबून आपल्याला तो संवाद कळलाच नाही असे दाखवून, मग त्यावर जबरदस्त प्रतिक्रिया देणे हा अशोकचा एक खास गुण आहे.

असा एखादा माणूस खूप मोठा झाला की त्याच्या पूर्वींच्या काही खास आठवणींमुळे, आपल्याला आपणच मोठे झाल्यासारखे वाटते. हा एक आनंद वेगळाच असतो. तोच मी आज तुमच्याबरोबर शेअर करतोय.

अशोक सराफला एकेरी संबोधण्याचे कारण म्हणजे एक तर तो समवयस्क आहे. दुसरे म्हणजे त्या वेळेला सर, मॅडम म्हणायची पद्धत नव्हती.

अशोक सराफ स्टेट बँकेमध्ये नोकरीला होता. त्या वेळेला विविध बँकांमध्ये क्रिकेट, नाटक, गायन, फुटबॉल इत्यादींच्या विशेष टीम असत. त्यांच्यामध्ये होणारी स्पर्धा हा एक महोत्सव असायचा. आंतर बँक एकांकिका स्पर्धा ही रिझर्व बँकेच्या स्पोर्ट्स क्लबतर्फे आयोजित केली जायची. त्यावेळी रिझर्व बँक, बँक ऑफ बरोडा, स्टेट बँक, बँक ऑफ इंडिया अशा बँकांमध्ये खूप मातब्बर असे कलाकार लेखक, दिग्दर्शक होते त्यामुळे या स्पर्धेमध्ये खूप दर्जेदार एकांकिका पाहायला मिळत असत. हा उत्सव मी सहसा चुकवत नसे.

१९७५ च्या या स्पर्धेत एक अभूतपूर्व चमत्कार घडला. स्टेट बँकेतर्फे लेखक, दिग्दर्शक, अभिनेता रमेश पवार याची म्हॅ ss या नावाची एकांकिका सादर झाली. या एकांकिकेत दोनच पात्रे. एक स्वतः रमेश पवार आणि दुसरा एक नवीन आलेला अशोक सराफ ! दोघांचा आकाशी निळ्या रंगाचे टी शर्टस् आणि पांढऱ्या पँटस् हा पोशाख होता. काही बँकांचा आधीच दबदबा निर्माण झालेला असायचा. या एकांकिकेबद्दलही खूप अपेक्षा होत्या.

साहित्य संघाचा पडदा उघडला आणि रंगमंचावर अक्षरशः काहीही नव्हते. लेखक, अभिनेता रमेश पवार आणि दिग्दर्शक शंभू दामणीवाला यांचे खूप नाव होते. पण आता रंगमंचावर कसलेही नेपथ्य नाही, प्रकाश योजना नाही. आणि रमेश सोबत अशोक सराफ नावाचा नवखा नट. काय होणार ?

एकांकिकेला सुरुवात झाली. यामध्ये सगळी पात्रे, वस्तू, वास्तु, ठिकाणे हे सर्व काही पेंटामाईम म्हणजे केवळ अभिनयातून दाखविले जात होते. त्यातील रमेशचे संवाद आणि त्याचा अभिनय, त्यावर अशोक सराफची प्रतिक्रिया व त्याचा स्वतःचा अभिनय हे सगळं मिश्रण जबरदस्त जमले होते. या दोघांनी पूर्ण रिकाम्या रंगमंचावरून, गच्च भरलेले सभागृह अक्षरशः डोक्यावर घेतले होते. अशावेळी अन्य बँकांच्या एकांकिकांचे समर्थक, दुसऱ्या एकांकिकेला पाडण्यासाठी, काही उपदव्याप करीत असत.पण या एकांकिकेला इतका प्रचंड आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला की असले काही विसरून प्रत्येक जण या हास्यस्फोटांमध्ये सहभागी झाला होता. त्यानंतर कित्येक दिवस अशोकच्या अभिनयाचीच चर्चा होत राहिली. हीच एकांकिका नंतर अनेक स्पर्धांमधून अनेक संस्थांनी सादर केली आणि पारितोषिकेही मिळवली.

आज अशोकला मिळणारी पारितोषिके, मानसन्मान पाहिले की असे वाटते की हे सगळे त्याला मिळायलाच हवे होते ! तो त्याचा हक्कच आहे.

सोबतचे रमेश पवार व अशोक सराफ यांचे त्यावेळचे छायाचित्र मॅजेस्टिक बुक स्टॉलने प्रसिद्ध केलेल्या पुस्तकाच्या कव्हरवरून घेतले आहे."

सोशल मीडियावर शेअर केलेल्या या पोस्टला अनेकांनी उत्तम प्रतिसाद दिला असून अशोक सराफ यांची ही आठवण शेअर केल्याबद्दल मकरंद यांचे अनेकांनी आभार मानले आहेत. या आधीही मकरंद यांनी अनेक कलाकारांबद्दलच्या आठवणी शेअर केल्या आहेत.

पण अशोक मामांच्या या एकांकिकेविषयी फार कमी जणांना माहित आहे. म्हॅ ss या एकांकिकेतील अशोक यांच्या जबरदस्त अभिनयामुळेच रंगभूमीवर त्यांना ओळख मिळाली आणि पुढे त्यांना अनेक संधी उपलब्ध झाल्या.

Ashok Saraf
Ashok SarafEsakal

अशोक यांच्या कारकिर्दीची सुरुवात

लहान असल्यापासूनच अशोक यांनी नाटकांमध्ये काम करायला सुरुवात केली. सुरुवातील गिरगावच्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्या अशोक यांनी पुढे स्टेट बँकेत नोकरी केली आणि नोकरी सुरु असतानाच ते एकांकिका आणि व्यावसायिक नाटकांमध्ये काम करायचे.

त्यांचं रंगभूमीवरील काम पाहूनच त्यांना सिनेमात संधी मिळाली. 'आयलंय तुफान दर्याला' हा त्यांचा पहिला मराठी सिनेमा. पण त्यांना ओळख मिळाली ती दादा कोंडके यांच्या 'पांडू हवालदार' या सिनेमामुळे. या सिनेमातील त्यांची भूमिका खूप गाजली. या भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहकलाकार म्हणून पुरस्कार मिळाला आणि या सिनेमामुळेच त्यांची यशस्वी घोडदौड सुरु झाली.

Ashok Saraf
Ashok Saraf: "असामान्य कुटूंबाच्या आणि नटाच्या उपस्थितीत पुरस्कार मिळणं..."; दीनानाथ मंगेशकर पुरस्कार मिळाल्यानंतर अशोक सराफ यांचं भावनिक भाषण

नुकतंच अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना मराठी नाट्यपरिषदेच्या जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला. त्यांचं सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

Ashok Saraf
Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हट्टंगडी यांना जाहीर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.