Pune : ‘न्यूड’, ‘गंगूबाई काठियावाडी’, ‘लापता लेडीज’ या चित्रपटांनी मला माणूस म्हणून घडविले. त्यापूर्वी माझे काहीसे बुरसटलेले विचार होते; पण या चित्रपटांमुळे माझे विचार बदलले, मला समृद्ध केले,’’ अशी भावना अभिनेत्री छाया कदम यांनी व्यक्त केली.
बालगंधर्व रंगमंदिराच्या ५६व्या वर्धापन दिनानिमित्त बालगंधर्व परिवारातर्फे आयोजित तीन दिवसीय सोहळ्यात बुधवारी (ता. २६) छाया कदम यांची मुलाखत रंगली, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी त्यांना ‘उंच फडकली मराठी ध्वजा’ या विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राज काझी यांनी कदम यांच्याशी संवाद साधला. बालगंधर्व परिवाराचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले उपस्थित होते.
कदम म्हणाल्या, ‘‘राज्यस्तरीय कबड्डीपटू असूनही मी ‘फिल्मी’ पद्धतीने या क्षेत्रात आले. ज्येष्ठ दिग्दर्शक वामन केंद्रे यांनी माझ्यावर अभिनयाचे संस्कार केले. सुरुवातीला अनेक वर्षे माझ्याकडे काम नव्हते; पण ‘फँड्री’ने मला खरी ओळख दिली.
सुदैवाने माझ्या वाट्याला वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका आल्या. ज्यावेळी माझ्या मनात नकारात्मक विचार येतात, त्यावेळी या व्यक्तिरेखाच मला ताकद देतात. मी रस्त्यावर उतरून समाजसेवा करू शकत नसले; तरी चित्रपटाच्या माध्यमातून समाजासाठी माझ्या परीने योगदान देऊ शकते.’’
कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील अनुभवाबद्दल बोलताना कदम म्हणाल्या, ‘‘आमच्या ‘ऑल वी इमॅजिन अॅज लाइट’ या चित्रपटासाठी रसिकांनी उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली, तो क्षण भारावून टाकणारा होता.
तिथल्या रसिकांना हिंदी येत नव्हते; तरीदेखील त्यांना तो चित्रपट कळला, ही त्या चित्रपटाची ताकद आहे.प्रत्येक मराठी कलाकारांच्या वाट्याला हा अनुभव यावा, अशी माझी इच्छा आहे.’’
महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात चैत्राली माजगावकर यांचा बोलक्या बाहुल्यांच्या सादरीकरणाने झाली. त्यानंतर महिलांसाठी लावणी कार्यक्रम सादर झाला. उत्तरार्धात काही गाजलेल्या नाटकांचे नाट्यप्रवेश सादर झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.