सूत्रसंचालक, अभिनेते, निर्माते आदेश बांदेकर यांचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. सगळ्यांच्या मदतीसाठी धावून जाणाऱ्या आदेश यांच्या आयुष्याच्या सुरुवातीचा काळ खूप खडतर गेला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये आदेश यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक आठवणी शेअर केल्या. यावेळी त्यांनी त्यांच्या लहानपणीची एक खास आठवणी सांगितली ज्यात त्यांच्या मोठ्या भावाने त्यांची चूक त्यांच्या कशी लक्षात आणून दिली हे त्यांनी शेअर केलं.
लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीमध्ये आदेश यांनी त्यांचा मोठा भाऊ संदेश यांच्या अनेक आठवणी शेअर केल्या. त्यांना तुमच्या दादाने तुमची एखादी मोठी चूक लपवली आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी त्यांनी एक जुनी आठवण शेअर केली. 'माझ्या दादावर माझं खूप प्रेम होतं. तो कायमच मला सांभाळून घ्यायचा.
मी लहानपणी खूप मस्तीखोर होतो आणि बऱ्याचदा त्याने माझी मस्ती आई-बाबांपासून लपवली आहे. मी दहावीत असताना एक असा काळ आला होता कि मी दोन-तीन महिने शाळेत गेलोच नाही. म्हणजे मी सकाळी शाळेत जायला निघायचो पण शाळेत जायचो नाही. काहीवेळ मी शाळेच्या जवळ कुठेतरी वेळ घालवायचो.
तोपर्यंत आई, बाबा आणि दादा आपापल्या कामासाठी बाहेर गेलेले असायचे. मग मी गुपचूप घरी यायचो आणि झोपायचो. हे असं बरेच दिवस सुरु होतं आणि एक दिवस दादाला हे आमच्याच शाळेतील शिक्षकांकडून समजलं कि मी शाळेत येत नाही. दादा एक दिवस अचानक घरी आला आणि त्याला मी झोपलेलो दिसलो. त्याने मला विचारलं कि, ‘तू शाळेत गेला नाहीस का?’ तेव्हा मी रोज शाळेत जातो असं उत्तर दिलं.
तेव्हा दादा म्हणाला, ‘चल आपण शाळेत जाऊया.’ तर मी पण तयार झालो आणि त्याला म्हणालोही की, ‘बाईंना विचार मी शाळेत रोज जातो.’ आम्ही शाळेत गेलो. अगदी माझ्या वर्गापर्यंत गेलो. दादाने वर्गाबाहेर असतानाही मला म्हंटलं, ‘आदेश आताच काय ते खरं सांग.’ पण तरीही मी म्हणालो, ‘दादा मी जातो शाळेत.’ तेव्हा दादा वर्गात गेला आणि मी बाहेरच्या बाहेरच पळालो.
मी थेट आमच्या इकडे रामाचं मंदिर आहे तिथे जाऊन लपलो आणि ठरवलं आता घरी जायचं नाही. शेवटी संध्याकाळ झाली मग असं वाटलं आता घरी जाऊया. खूप उशिरा घरी आलो तेव्हा दादा अभ्यास करत होता पण त्याच लक्ष खिडकीतच होतं. मी कुठे असेन या विचाराने तो घाबरला होता. बाबाही घरी आले होते.
मला बघून बाबांनी हाक मारली आणि मला म्हणाले, ‘संदेश मला सांगत होता हल्ली तू रोज रामाच्या मंदिरात अभ्यास करायला जातोस. तुझा अभ्यास सुधारलाय म्हणून.’ ते खुश होते. दादाने यातलं काहीच घरी सांगितलं नव्हतं. मला खूप शरमल्यासारखं झालं. रात्री सगळे झोपल्यावर दादाने मला इतकंच म्हंटलं कि, पुन्हा असं वागू नकोस आणि मी दादाचा हात हातात घेऊन तसं वचन दिलं आणि कधीच पुन्हा तसं वागलो नाही.'
आदेश यांचे मोठे भाऊ आता जगात नाहीयेत पण अजूनही ते त्यांच्या आठवणीत भावूक होतात. या आधीही त्यांनी त्यांच्या मोठ्या भावाच्या बऱ्याच आठवणी अनेक मुलाखतीमध्ये शेअर केल्या आहेत. त्यांना मिळालेल्या यशाचं श्रेय ते त्यांच्या बायकोसोबत त्यांच्या मोठ्या भावालाही देतात. आदेश यांची स्वतःची निर्मिती संस्था असून ते राजकारणातही सक्रिय आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.