जर तुम्ही गेल्या एक दोन वर्षात कोणत्याही फिल्म किंवा वेबसिरीजमध्ये दिल्ली पाहिली असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल ही जागा दिल्लीतील नसून लखनऊ किंचा मध्यप्रदेशमध्ये या सिनेमाचा सेट उभारण्यात आला आहे.
राजधानी दिल्ली आता शुटींगसाठी खूप महागलीये. राजीव चौकात शूटिंग करायचं असेल तर फिल्ममेकर्सना तासाला तब्बल 2 लाख रुपये मोजावे लागत आहेत तर आंतरराष्ट्रीय विमानतळावर शूटिंग करण्यासाठी तासाचे 12 लाख रुपये मोजावे लागतायत. एका सिनेमाच्या प्रॉडक्शन हेडने नाव न घेण्याच्या अटीवर हिंदुस्तान टाईम्सला मुलाखत दिली. त्यात त्याने खुलासा केला की, "तुम्हाला जर राजीव चौकात चार तास शूटिंग करायचंय तर आठ लाख रुपये दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशनला द्यावे लागतात. जीएसटी जरी सोडला तरी 2,36,000 रुपये महानगरपालिकेला द्यावे लागतात आणि पार्किंगसाठी 1,00,000 रुपये सदर व्यक्तींना द्यावे लागतात आणि पोलिसांना सुरक्षा पुरवण्यासाठी जवळपास दोन लाख रुपये द्यावे लागतात. "
या कारणासाठी अनेक फिल्म निर्मात्यांनी दिल्ली मध्ये शूटिंग करणं टाळल्याचं म्हंटलं जातंय. या कारणामुळेच अभिनेता आमिर खानचा आगामी सिनेमा 'सितारे जमीन पर' चं दिल्लीचं शेड्युल जवळपास 8-10 दिवसांवर ठेवण्यात आलं आहे या आधी हा कालावधी बराच मोठा होता पण वाढलेल्या किंमतीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. जुलैमध्ये या सिनेमाचं शूटिंग पार पडणार आहे.
तर अजय देवगणच्या रेड 2 बाबतही असाच निर्णय घेण्यात आला आहे. लखनऊ मध्ये दिल्लीचा सेट उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फक्त चार दिवस दिल्लीमध्ये शूटिंग करण्यात आलं असून उर्वरित सगळं शूटिंग लखनऊ मध्ये करण्यात येणार आहे. लगेच मिळणाऱ्या परवानग्या आणि अनुदान यामुळे लखनऊमध्ये शूटिंग करण्याला निर्मात्यांची पसंती आहे.
इतकंच नाही तर आता निर्मात्यांनी लेखकांना कथेमध्ये दिल्ली हे ठिकाण लिहू नकोस अशी विनंती करायला देखील सुरुवात केल्याची बातमी सूत्रांनी दिली. एकूणच दिल्लीच्या महागण्यामुळे निर्मात्यांनी आता दुसरे पर्याय शोधायला सुरुवात केली आहे.