प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांचे सहाय्यक कला दिग्दर्शक म्हणून ‘पहिला नशा’, ‘हुतूतू’, ‘लगान’, ‘देवदास’, ‘स्वदेस’ अशा असंख्य चित्रपटानंतर स्वतंत्र कला दिग्दर्शक म्हणून ‘नटसम्राट’, ‘तुकाराम’, ‘महाराष्ट्र शाहीर’सारख्या अनेक दर्जेदार कलाकृतींना सुबक-सजावणारे प्रख्यात कला दिग्दर्शक एकनाथ कदम यांनी कलात्मक प्रतिभेचे उत्तुंग शिखर गाठले आहे. चित्रपटातील काळ हा कला दिग्दर्शकाकडून घडवला जातो, हे त्यांनी त्यांच्या कामातून दाखवून दिले आहे. आता ते ‘धर्मवीर २’ तसेच अन्य काही मोठमोठे प्रोजेक्ट करीत आहेत. येत्या १४ सप्टेंबर रोजी ते वयाच्या साठीत पदार्पण करीत आहेत. त्यानिमित्त त्यांच्याशी साधलेला संवाद...
कला दिग्दर्शक म्हणून तुमच्या करिअरची सुरुवात कशी झाली?
माझ्या करिअरची सुरुवात नाटकांपासून झाली. सुरुवातीला मी नामवंत कला दिग्दर्शक प्रदीप मुळ्ये ज्यांनी आजवर दीडशेहून अधिक नाटकांचे कला दिग्दर्शन केले, यांचा सहाय्यक म्हणून काम केले. नंतर १९९० पर्यंत मी आविष्कार या नाट्यसंस्थेत कार्यरत होतो. याशिवाय एका बाजूला व्यावसायिक नाटक, नृत्य, संगीत अशी इतर कामेदेखील करत होतो. शिवाय आविष्कारच्या रंगभूमीशी जोडलेल्या प्रदीप मुळ्ये यांच्या काही नाटकांमध्ये मी अभिनयदेखील केला आहे.
यानंतर मला ‘चाणक्य’ या मालिकेत सहाय्यक वेशभूषाकाराचे काम मिळाले. तिथे काम करता करता दोन वर्षांनी कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्याशी भेट झाली. ते याच मालिकेत नितीश रॉय यांच्यानंतर जॉईन झाले होते. माझे काम पाहता त्यांनी मला त्यांच्याकडे सहाय्यक कला दिग्दर्शक म्हणून काम करण्याची संधी दिली. १९९२ पासून मी त्यांच्याकडे काम करण्यास सुरुवात केली.
नंतर ‘पहला नशा’ हा नितीन देसाई यांचा कला दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट होता, ज्यामध्ये मीदेखील पहिल्यांदा सहाय्यक कला दिग्दर्शक म्हणून काम केले. तिथूनच माझ्या कला दिग्दर्शनाच्या करिअरची सुरुवात झाली. यानंतर मी देवदास, स्वदेस, एकलव्य, लगान, आर या पार, अशा बऱ्याच हिंदी चित्रपटांसाठी काम केले. दरम्यान २००५ पासून मी माझे स्वतंत्र कला दिग्दर्शन सुरू केले. ज्यामध्ये इट्स ब्रेकिंग न्यूज, आजचा दिवस माझा, नटसम्राट, भास्कर बेचैन, तुझ्या माझ्यात आणि इतर चित्रपटांचा समावेश आहे.