'कल हो न हो', 'कट्टी बट्टी', 'डी डे', 'वेदा' अशा काही चित्रपटांचे तसेच 'मुंबई डायरीज २६-११', 'राॅकेट बाॅईज' अशा काही सीरीजचे दिग्दर्शन निखिल अडवानी यांनी केले आहे. आता ते फ्रीडम अॅट मिडनाईट ही सीरीज घेऊन येत आहेत. लॅरी कॉलिन्स व डॉमिनिक लॅपियर यांच्या प्रख्यात पुस्तकावर आधारित असलेली ही सिरीज सोनी लिव्हवर प्रसारित होणार आहे.भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामधील महत्त्वपूर्ण क्षणांना प्रकाशझोतात आणणारी ही सीरीज आहे. ही सीरीज सात एपिसोडची आहे. या सिरीजमध्ये प्रतिभावान कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. अभिनेता सिद्धांत गुप्ता (पंडित जवाहरलाल नेहरू) , चिराग वोहरा (महात्मा गांधी), राजेंद्र चावला (सरदार वल्लभभाई पटेल) , आरिफ झकेरिया (मोहम्मद अली जीना) आदी कलाकारांनी काम केले आहे.
निखिल अडवानी यांनी नेहमीच वेगवेगळे विषय हाताळलेले आहेत. इतिहासावर आधारित कथा मांडण्यात ते नेहमीच उत्सुक असतात. त्याच्या या नव्या प्रोजेक्टमध्येही ते दिसून येतं. एका ऐतिहासिक पुस्तकावर आधारित असलेल्या या सिरीजच्या तयारीबाबत बोलताना ते म्हणाले, की गेली चारेक वर्ष मी या सीरीजवर काम करीत होतो. कारण इतिहास सांगायचा म्हटला तर खूप तयारी करावी लागते. आजच्या पिढीला आपला चुकीचा इतिहास सांगू नये याची काळजी घ्यावी लागते. या सीरीजमध्ये भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीच्या घटनाक्रमातले ताण-तणाव आणि त्यावेळची स्थिती आणि त्यावेळी घेतले गेलेले निर्णय या सगळ्या गोष्टी यथासांग मांडायच्या होत्या. त्यामुळे खूप अभ्यास आणि संशोधन करावे लागले.
इतिहासाचं वाचन म्हणजे फक्त पुस्तकातील माहिती नव्हे, तर त्या घटनांमागील प्रेरणा समजून घेणं आणि त्या अनुभवांवर विचार करणंही आहे.’ हा सीरीज बनविताना कलाकारांची निवड कशी करण्यात आली असा प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितले, "आम्हाला महात्मा गांधीजी, पंडित नेहरूजी, सरोजिनी नायडूजी, मोहम्मद अली जिना यांच्या व्यक्तिमत्त्वाशी साधर्म्य सांगणाऱ्या चेहऱ्यांची आवश्यकता होती. त्याकरिता आमच्या टीमने खूप संशोधन केले आणि आम्हाला गांधीजींची भूमिका साकारण्यासाठी चिराग वोहरा हा कलाकार सापडला. तो शारिरीकदृष्ट्या परफेक्ट बसत होता. तसेच आम्हाला नेहरूंची भूमिका साकारण्यासाठी सिद्धांत गुप्ता नावाचा चेहरा मिळाला. त्याची चाल आणि रुबाब अगदी नेहरुंसारखे होते. विशेषतः त्याचे टोकेरी नाक अगदी हुबेहूब होते.
सरदार पटेल यांच्या कास्टिंगविषयी सांगायचे झाल्यास, मला त्यांच्या सारखा ‘आर्यन मॅन’ हवा होता. राजेंद्र चावला यांच्या व्यक्तिमत्त्वात ती झलक दिसली." शूटिंग करताना काही अडचणींचा सामना करावा लागला, हा प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितले, "शूटिंग म्हटलं तर अडीअडचणी येणारच. जसं की दिग्दर्शकाचं व्हिजन खूप मोठं असतं पण त्याच्याकडे तेवढा बजेट नसतो, त्यावेळी खूप अडचणी येतात." यासोबत त्याने आपल्या टीमच्या एकजुटीबद्दलही भरभरून कौतुक केले.
आजकाल कमर्शिअल चित्रपट काढण्याकडे प्रत्येक दिग्दर्शकाचा कल आहे असे दिसते. या चित्रपटाने शंभर कोटी, दुसऱ्या चित्रपटाने दोनशे कोटी कमावले अशी स्पर्धा सुरू आहे. याबाबत ते म्हणाले, "मी फक्त पैशांसाठी चित्रपट वा सीरीज काढत नाही. मला या सिरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत भारताच्या इतिहासातील काही अनोख्या गोष्टी पोहोचवायच्या आहेत. चित्रपट ५००-८०० कोटी रुपये कमावतात. हे एवढे कोटी लोक करतात तरी काय? माझं घर आहे, मुलगी चांगलं शिकते, तेवढं पुरेसं आहे. आपण केवळ आकड्यांच्या मागे का लागायचं? मला असे आकडे पसंत नाहीत. आपला इतिहास आजच्या पिढीला समजावा याच हेतूने ही सीरीज काढली आहे.'
चित्रपट करणारे लोक आता ओटीटीकडे वळले आहेत. यावर त्यांनी आपले मत व्यक्त करत म्हटले की, "ही एक थिअरी आहे. जसे की भूल भुलैय्या आणि सिंघम बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतात. हा पैसा पूर्ण ओटीटीमुळेच त्यांना मिळतो. म्हणजेच सिनेमा आहे म्हणून ओटीटी आहे आणि ओटीटी आहे म्हणून सिनेमा आहे. ही एक सहजीवन प्रक्रिया आहे.'
पहिल्या काळात पॅरलल सिनेमा आणि कमर्शिअल सिनेमा वेगवेगळे असायचे, पण आता त्या गोष्टी नाही पाहायला मिळत. यावर त्यांनी आपले परखड मत व्यक्त केले, "तशा चित्रपटांना आपणच मारून टाकले. पाच वर्षांपूर्वी आयुष्मान खुराना ज्या प्रकारचे चित्रपट करत होता, तेही आता पाहायला मिळत नाही. पण एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे कला कधीच संपणार नाही. जर जगावर वाईट परिस्थिती ओढवली तरीही कला कधीच संपणार नाही. कलेला मरण नाही.'
त्यांच्या पुढील प्रोजेक्टबद्दल सांगताना ते म्हणाले की, "फ्रीडम अॅट मिडनाईट ही सीरीज दोन भागामध्ये आम्ही आणणार आहोत. आता पहिल्या भागात सात एपिसोड आहेत आणि दुसरा भाग लवकरच येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.