Gharat Ganpati Movie Release: गणपती सण मोठ्या उत्साहात आणि धुमधडाक्यात साजरा केला जातो. या काळात अनेक चाकरमानी आपापल्या गावी जातात. नातेवाईकांची रेलचेल याच काळात अधिक होते. दररोज गोडधोड पदार्थ बनविले जातात. सगळीकडे आनंदाचे आणि चैतन्याचे वातावरण असते. अशाच कोकणातील एका घरत कुटुंबाची कथा 'घरत गणपती' या चित्रपटामध्ये मांडण्यात आली आहे. दिग्दर्शक नवज्योत बांदिवडेकरने ही कथा मांडताना घरात गणरायांचे आगमन होणार म्हणून कुटुंबातील प्रत्येक सदस्याची चाललेली धावपळ, त्यांच्यातील हास्यविनोद, गोडवा, रुसवेफुगवे याबरोबरच माणसा-माणसांतील स्वभाववैशिष्ट्ये उत्तमरीत्या या चित्रपटामध्ये मांडलेली आहेत.
घरत कुटुंबाच्या तीन पिढ्याची ही कहाणी आहे. त्यांच्या कुटुंबामध्ये गौरी-गणपतीचा सण परंपरागत साजरा केला जातो. आता या कुटुंबाचे प्रमुख अप्पा (डॉ. शरद भुताडिया) आणि माई (सुषमा देशपांडे) आहेत. त्यांना भाऊ, शरद हे दोन मुले आणि कुसुम ही मुलगी असते. या तिघांचीही लग्ने झालेली असतात आणि ते त्यांच्या त्यांच्या संसारामध्ये मग्न असतात. शरद (अजिंक्य देव) आणि त्याची पत्नी अहिल्या (अश्विनी भावे) हे मुंबईत राहात असते. भाऊ (संजय मोने) आणि त्याची पत्नी सुनंदा (शुभांगी लाटकर) ही गावामधील शेतीवाडी सांभाळत असतात.
गणपती सणानिमित्त हे सगळे कुटुंबीय एकत्र येतात. शरद आणि अहिल्याचा मुलगा केतन (भूषण प्रधान) दिल्लीहून आपल्या गावी कोकणात गणेशोत्सवाला येतो. येताना तो त्याची मैत्रीण क्रिती आहुजा (निकीता दत्ता) हिलादेखील बरोबर आणतो. तिला कोकणात गौरी-गणपती सण कसा साजरा केला जातो हे पाहण्यासाठी तो आणतो खरा; पण त्याचा मूळ उद्देश तिने आपल्या घरातील सगळ्यांची मने जिंकावी हा असतो. कारण त्यांच्यामध्ये प्रेमाचे धागे विणलेले असतात. ही बाब घरातील कुणालाही माहीत नसते.
अशातच घरामध्ये गणरायाचे आगमन होते आणि लगोलग गौरीच्या आगमनाची तयारी केली जाते. त्यानंतर हे कुटुंबीय कसा गणेशोत्सव साजरा करतात, त्यांच्या नात्यातील गोडवा कायम राहतो की त्यामध्ये दुरावा येतो, अप्पा आणि माई हे नेमका काय निर्णय घेतात, केतन आणि क्रिती यांच्या प्रेमकहाणीचे काय होते आदी प्रश्नांसाठी हा चित्रपट पाहावा लागेल.
दिग्दर्शक नवज्योत बांदिवडेकरने या कथेला चांगली ट्रिटमेंट दिली आहे. कोकणातील गणेशोत्सावानिमित्त एकत्र येणारे कुटुंब, त्यांच्यातील भावभावना, आपुलकी आणि प्रेम त्याचबरोबर त्यांच्यातील हेवेदावे छान टिपले आहेत. खरं तर सण वा उत्सव हे आपली परंपरा आणि संस्कृती टिकविण्यासाठी खूप महत्त्वाचे असतात. त्यामुळे आपल्या मनामध्ये एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
आपल्या चालीरिती आणि संस्कृती पुढील पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी मदत होते. या वेळी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईक मंडळी एकत्र येतात... एकमेकांच्या विचारांची देवाघेवाण करतात... एकूणच आपले नातेसंबंध टिकविण्यासाठी वा वाढविण्यासाठी सण किती महत्त्वाचे असतात, हे दिग्दर्शक नवज्योत बांदिवडेकरने या चित्रपटातून अधोरेखित केले आहे. शिवाय नातेसंबंधातील प्रेम, गोडवा, आपुलकी त्याचबरोबर आपापसातील धुसपूस छान टिपली आहे. नवज्योत बांदिवडेकरचा हा पहिलाच चित्रपट आहे आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये त्याने छान कामगिरी केली आहे.
कलाकारांची मोठी फौज घेऊनही प्रत्येक कलाकाराला त्याने योग्य असे फुटेज दिले आहे आणि कलाकारांनीदेखील आपल्या दमदार अभिनयाने या चित्रपटाला चार चांद लावलेले आहेत. डॉ. शरद भुताडिया, सुषमा देशपांडे, अश्विनी भावे, अजिंक्य देव, शुंभांगी गोखले. भूषण प्रधान, निकिता दत्ता, शुभांगी लाटकर, संजय मोने, परी तेलंग, आशिष पाथोडे, राजसी भावे, समीर खांडेकर आदी कलाकारांनी आपापल्या भूमिका चोख बजावल्या आहेत. भूषण प्रधान आणि निकीता दत्ता यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री उत्तम जुळलेली आहे. निकिताने क्रितीच्या भूमिकेचे बेअरिंग छान पकडले आहे. पडद्यावर ती खूप सुंदर दिसली आहे.
तिचे सौंदर्य म्हणजे कोकणातील एखाद्या ओढ्याच्या खळखळत्या पाण्यासारखे आहे. डॉ. शरद भुताडिया आणि सुषमा देशपांडे यांनी समंजस्य आणि समजूतदार कुटुंबप्रमुखाची भूमिका छान साकारली आहे. अजिंक्य देव आणि अश्विनी भावे हे तब्बल पंचवीसेक वर्षांनी एकत्र काम करीत आहेत. त्यांनी आपापल्या भूमिकांना उत्तम वठविल्या आहेत. संजय मोने, शुभांगी गोखले, परी तेलंग तसेच शुभांगी लाटकर यांनीही आपापल्या भूमिकेत चांगलेच रंग भरलेले आहेत. विशेष बाब म्हणजे सिनेमॅटोग्राफर शेली शर्मा आणि प्रसाद भेंडे यांनी कोकणातील निसर्गसौंदर्य आपल्या कॅमेऱ्यात छान टिपलेले आहेत.
नवज्योत बांदिवडेकर आणि आलोक सुतार यांच्या कथेला त्यांनीच तसेच वैभव चिंचाळकरने पटकथेचा उत्तम साज चढविला आहे. संगीतकार संकेत मानेची कामगिरी उल्लेखनीय झाली आहे. 'घरत गणपती आले, नवसाची गौराई माझी आणि माझं कोकण भारी' या गाण्यांना त्याने उत्तम संगीत दिले आहे. ही गाणी सुमधुर झाली आहेत. मात्र चित्रपटाच्या पूर्वार्धात कथा म्हणावी तशी मनाची पकड घेत नाही. त्यावेळी चित्रपटाची गती संथ झाल्यासाऱखी वाटते. परंतु त्यानंतर चित्रपट चांगलीच गती घेतो आणि मग एकत्र कुटुंबातील गोडवा, प्रेम आणि रुसवेफुगवे, हेवेदावे दर्शवीत हसत-खेळत मनोरंजन करीत संपतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.