Heeramandi : संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) दिग्दर्शित हिरामंडी द डायमंड बाजार या वेबसीरिजची चर्चा सध्या सगळीकडे आहे. उत्तम कथानक आणि कलाकारांचा तितकाच सुंदर अभिनय असलेली ही वेबसिरीज सध्या गाजतेय.
या वेबसीरिजमध्ये मल्लिकाजानकडे काम करणाऱ्या सायमा या मोलकरणीच्या व्यक्तिरेखेने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. अभिनेत्री श्रुती शर्माने ही भूमिका साकारली असून अनेकांनी तिच्या अभिनयाचं कौतुक केलं.
नुकतंच श्रुतीने पिंकविला या वेबसाईटला मुलाखत दिली. यावेळी तिने या सीरिजमध्ये आलमजेबची भूमिका साकारणाऱ्या शर्मीन सेहगलवर होणाऱ्या टीकेवर भाष्य करत ट्रोलर्सना खडेबोल सुनावले.
श्रुतीला शर्मीनवर सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगबाबत प्रतिक्रिया विचारण्यात आली. तेव्हा ती चकित झाली आणि म्हणाली,"खरं सांगायचं तर लोक तिला ट्रोल करत आहेत याविषयी मला काहीच माहित नव्हतं. मला माहित नाही प्रेक्षकांना शर्मीनबाबतची कोणती गोष्ट आवडली किंवा नाही आवडली पण सेटवर सगळ्यांसारखंच तिनेही स्वतःचा उत्तम परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न केला असल्याचं मी पाहिलं आहे. कोण ट्रोल होतंय यापेक्षा ट्रोलिंग करणंच खूप चुकीचं आहे."
पुढे याविषयी बोलताना ती म्हणाली,"टीका करणं ही एक वेगळी गोष्ट आहे आणि योग्य टीकेचं आम्ही कायमच स्वागत करतो पण ट्रोलिंग आम्ही सहन करू शकत नाही. कुणाशीही संवाद साधण्याचा हा खूप चुकीचा मार्ग आहे. हा एक मानसिक छळ आहे. हे जर तिच्याबाबत आता होतंय तर मला खरंच तिची काळजी वाटतेय."
दरम्यान तिने साकारलेल्या सायमा या भूमिकेला मिळणाऱ्या प्रतिसादाबाबत ती खूप खुश असल्याचं तिने यावेळी सांगितलं आणि ही भूमिका दिल्याबद्दल दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचे आभार मानले .
या सीरिजमध्ये शर्मीन सेहगलने आलमझेब ही प्रमुख भूमिका साकारली आहे. पण तिचा अभिनय काही जणांना पसंत पडला सोशल मीडियावर तिला नकारात्मक पद्धतीने ट्रोल केलं जातंय. शर्मीन ही संजय लीला भन्साळी यांची भाची असून याबाबत त्या दोघांकडूनही अजून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाहीये.
दरम्यान, या वेबसिरीजमध्ये सोनाक्षी सिन्हा, अदिती राव हैदरी, संजिदा शेख, शर्मिन सेहगल, रिचा चड्ढा, मनीषा कोईराला, फरदीन खान, शेखर सुमन, अध्ययन सुमन, ताहा खान आणि फरीदा जलाल यांच्या मुख्य भूमिका आहेत. तवायफांचं आयुष्य आणि स्वातंत्र्य लढ्यातील त्यांचं योगदान यावर ही वेबसीरिज आधारित आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.