Hoy Maharaja Review: कलाकारांचा उत्तम अभिनय अन् मजेशीर डायलॉग, ‘होय महाराजा’ ची विनोदी ढंगाने जाणारी कथा

Hoy Maharaja Marathi Movie: ‘होय महाराजा’ या चित्रपटाच्या कथेला कलाकारांच्या उत्तम अभिनयाची आणि चटपटीत तसेच मजेशीर अशा संवादांची चांगली जोड मिळाली आहे.
 ‘होय महाराजा’ ची विनोदी ढंगाने जाणारी कथा
Hoy Maharajasakal

Hoy Maharaja Review: सध्या प्रत्येक माणूस ऐहिक सुखाच्या मागे धावत आहे. त्यामुळे पैशाला प्रचंड महत्त्व आल्याने माणसा-माणसातील प्रेम, आदर आणि एकमेकांतील आनंद शोधण्याचे क्षण काहीसे कमी होत गेले आहेत. पैशासाठी माणूस कधी कधी चुकीचा मार्गदेखील अवलंबित आहे आणि त्यामध्ये त्याला कधी कधी पश्चात्तापही होतो. ‘होय महाराजा’ हा चित्रपट काहीसा याच संकल्पनेभोवती फिरणारा आहे. मनोरंजनाच्या माध्यमातून ही कथा सांगण्यात आली आहे. क्राईम-काॅमेडी जाॅनरचा हा चित्रपट असून यामध्ये कलाकारांची भक्कम फळी आहे. एलएमएस फिल्म्स प्रा. लि.च्या बॅनरखाली तयार झालेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन शैलेश एल. एस. शेट्टी यांनी केले आहे. चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद संचित बेद्रे यांनी लिहिले आहेत. ही कथा आहे रमेश अर्थात रम्या (प्रथमेश परब)आणि त्याचा मामा (अभिजित चव्हाण) यांची. मुंबईत चांगली नोकरी मिळेल, या उद्देशाने रमेश आपल्या मामाकडे येतो. आपला भाचा खूप पैसे कमावेल आणि खूप मोठा होईल, असे मामाला वाटत असते. याबाबतीत मामाचा आपल्या भाच्यावर खूप विश्वास असतो. अशातच एके दिवशी रमेशला एका कंपनीत शिपाई म्हणून नोकरी मिळते. त्याचदरम्यान त्याची अचानक भेट आयशा (अंकिता लांडे) हिच्याबरोबर होते. ते दोघे नकळतपणे एकमेकांच्या प्रेमात पडतात. मात्र, रमेश आणि त्याचा मामा यांचे स्वप्न खूप पैसा कमावण्याचे असते. मग रमेशला एक भन्नाट कल्पना सुचते. ती कल्पना तो आपल्या मामांकडे आणि त्याच विभागातील राशिद भाई (संदीप पाठक) यांना सांगतो. त्यानंतर त्यांच्याकडे चांगला पैसा येऊ लागतो; परंतु अण्णा (वैभव मांगले) नावाचा गुंड रमेशची गर्लफ्रेण्ड आयशाला किडनॅप करतो. मग पुढे कशा आणि कोणत्या घडामोडी घडतात ते प्रत्यक्ष पडद्यावर पाहिलेले बरे. दिग्दर्शक शैलेश एल. एस. शेट्टी यांनी ही कथा विनोदी ढंगामध्ये मांडली आहे. या कथेला कलाकारांच्या उत्तम अभिनयाची आणि चटपटीत तसेच मजेशीर अशा संवादांची चांगली जोड मिळाली आहे.

प्रथमेश परब, अंकिता लांडे, अभिजित चव्हाण, समीर चौघुले आणि वैभव मांगले अशी कलाकारांची तगडी फळी या चित्रपटात आहे, त्यांनी आपल्या सहजसुंदर अभिनयाने व चटपटीत संवादांनी हास्याची चांगली पेरणी केली आहे.

‘अभी नहीं मारा चौका तो बाद में नहीं मिलेगा मौका...’ असे काही मजेशीर संवाद या चित्रपटात आहेत. प्रथमेश आणि अंकिता याच्पातील केमिस्ट्रीही उत्तम जुळलेली आहे. मालवणी भाषेचा चांगला ठसका या चित्रपटात आहे. अभिनेता संदीप पाठकने काहीशी हटके भूमिका या चित्रपटामध्ये साकारली आहे. मजेशीर संवाद तसेच त्याची देहबोली गमतीशीर आहे. त्याने राशिद भाईच्या भूमिकेत कमाल केली आहे. अंकिता लांडेच्यानिमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीला एक चांगली आणि ग्लॅमरस अभिनेत्री लाभलेली आहे. ती मोठी झेप घेईल, असे एकूणच वाटते.

विनोदाच्या अंगाने जाणाऱ्या या कथानकामध्ये लव्हस्टोरी देखील आहे. संगीतकार चिनार-महेश यांचे उत्तम संगीत या चित्रपटाला लाभलेले आहे. ‘हलके हलके तू सांग ना...’ आणि ‘का मन वेडे’ ही दोन्ही गाणी सुंदर आहेत. वासुदेव राणे यांचे कॅमेरा वर्क उत्तम झाले आहे. काही बाबी या चित्रपटामध्ये अतार्किक आहेत. परंतु एकूणच मजेशीर आणि विनोदी अंगाने जाणारा हा चित्रपट असल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष केलेले बरे. पैशाच्या मोहापायी कोणतेही चुकीचे पाऊल टाकू नका, असे या चित्रपटांतून सांगण्यात आले आहे. विनोदी ढंगाचा हा चित्रपट करमणूक प्रधान असाच आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com