मानवी जीवनात कधी कधी कठीण प्रसंग किंवा मोठमोठ्या समस्या निर्माण होतात. त्यावेळी माणूस काहीसा संभ्रमावस्थेत सापडतो वा हताश किंवा निराश होतो. अशा वेळी माणसाने निराश न होता त्या कठीण प्रसंगातून मार्ग काढायचा असतो. मोठ्या धैर्याने आणि हिंमतीने आलेल्या संकटावर मात करायची असते. त्याकरिता आपल्या कुटुंबाची साथ तितकीच महत्त्वाची असते. कुटुंबाच्या मदतीने आलेल्या प्रसंगावर मात करायची असते...या गोष्टीला नावच नाही या चित्रपटाचे कथाबीज अशाच एका कठीण प्रसंगात सापडलेला तरुण आणि त्याच्या कुटुंबाभोवती फिरणारी आहे. ही प्रेरणादायी कथा मांडताना दिग्दर्शक संदीप सावंत यांनी अवयवदानाचा मुद्दादेखील या चित्रपटामध्ये मांडलेला आहे.
या चित्रपटाची कथा अशी आहे की मुकुंद (जयदीप कोडोलीकर) आणि रोहित (प्रथमेश अत्रे) टेक्सटाईल इंजिनियरिंग शिकण्यासाठी शहरात आलेले असतात. ते दोघेही एकमेकांचे रूम पार्टनर असतात. मुकुंद हा ग्रामीण भागातून आलेला असतो.अभ्यासामध्ये तो खूप हुशार असतो. त्याच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असते. त्याच्या कुटुंबामध्ये त्याचा मोठा भाऊ कमावता असतो. मुकुंदने शिकूनसवरून मोठे व्हावे असे त्याला वाटत असते. मुकुंदला आपल्या परिस्थितीची जाणीव असते. इंजिनियरिंगला शिकत असताना त्याला अनेक मित्रमंडळी भेटतात. मुकुंदचा स्वभाव सरळ, साधा व लाजाळू असतो.
अशातच एके दिवशी अमृता (अनुराधा धामणे) नावाच्या तरुणीशी त्याची भेट होते. त्या दोघांमध्ये प्रेमाचा हळूवार अंकुर फुलत असतो. त्याची मित्रमंडळी त्याला अमृताच्या नावाने चिडवीत असतात. अशा वेळी एक घटना घडते आणि मुकुंद निराश होतो. मग या नैराश्यामध्ये त्याला त्याची मित्रमंडळी कसे सहकार्य करतात...त्याच्या कुटुंबीयाची त्याला कशी मदत होते...तो मोठ्या धैर्याने या नैराश्यावर कशी मात करतो..ही कथा या चित्रपटात मांडलेली आहे. दिग्दर्शक संदीप सावंत हा वेगळ्या पठडीतील दिग्दर्शक आहे आणि त्याचे चित्रपट वेगळ्या धाटणीचे असतात. त्याच्या चित्रपटाचे कथाबीजच काहीसे निराळे असते.
पारंपरिक चित्रपटाच्या चौकटीत त्याचे चित्रपट बसत नाहीत. मग तो आजोबा व नातू यांची भावस्पर्शी कथा असलेला आणि आॅस्कर वारीवर गेलेला 'श्वास' असो की सामाजिक विषयावरील 'नदी वाहते' चित्रपट असो. त्याने नेहमीच वेगळ्या धाटणीच्या कथा आपल्या चित्रपटामध्ये मांडलेल्या आहेत. हा चित्रपटडॉ. सतीशकुमार आदगोंडा पाटील यांच्या 'मृत्यूस्पर्श' या कादंबरीवर आधारित आहे. एका तरुणाच्या धैर्याची आणि त्याच्या कुटुंबीयांच्या संघर्षाची ही कथा आहे आणि दिग्दर्शक संदीप सावंत यांनी ती हळूवारपणे गुंफली आहे.
ती कथा गुंफताना प्रेम, आपुलकी, मैत्री, भावभावना, संघर्ष, धैर्य, जिद्द या गोष्टींबरोबरच अवयवदान किती महत्त्वाचे आहे हे सांगण्याचा दिग्दर्शकाने प्रयत्न केला आहे. ही एका कुटुंबाची कथा असली तरी तिला भावभावनेचे विविध पदर त्याने सुरेख मांडलेले आहेत. या चित्रपटात जयदीप कोडोलीकर, प्रथमेश अत्रे, चैतन्य जवळगेकर, अनुराधा धामणे, अवधूत पोतदार, सीमा मकोटे, प्रतीक्षा खासनीस यांसारखी नवोदित कलाकारांची फळी त्याने घेतली आहे आणि त्यांच्याकडून उत्तम कामगिरी काढून घेतली आहे. दिग्दर्शकाचा आपल्यावरील विश्वास या कलाकारांनी सार्थ ठरविला आहे. सगळ्याच कलाकारांनी उत्तम कामगिरी केली आहे.
चित्रपटातील लोकेशन्स सुंदर आहेत आणि त्याचे श्रेय सिनेमॅटोग्राफर प्रियशंकर घोष यांना द्यावे लागेल. मात्र चित्रपटाची तांत्रिक बाजू खूप कमजोर आहे. तसेच मध्यांतरापर्यंतची चित्रपटाची गती अतिशय संथ आहे. काॅलेज जीवन... तेथील धमाल-मस्ती वगैरे बाबी हसतखेळत मांडणे अपेक्षित होते. अशा काही बाबी पटकथेमध्ये समाविष्ट केल्या असत्या तर चित्रपट हलकाफुलका आणि मजेशीर झाला असता. परंतु या चित्रपटाची कथा गंभीरपणे वाटचाल करताना दिसते. चित्रपटाची कथा उत्तम असली तरी तांत्रिक बाबीमध्ये कमजोर असा हा चित्रपट आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.