Juna Furniture: दिग्दर्शक व अभिनेते महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांच्या जुनं फर्निचर (Juna Furniture) या चित्रपटाच्या टीझर आणि ट्रेलरला रसिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. तेव्हापासूनच प्रेक्षक हा चित्रपट केव्हा प्रदर्शित होतोय याची वाट पाहात होते. सगळ्यांना या चित्रपटाबाबतीत उत्सुकता लागलेली होती. अखेर हा चित्रपट सगळीकडे प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या अस्तित्वाचा मुद्दा जरी उपस्थित करण्यात आला असला तरी संपूर्ण कुटुंबाने एकत्रित पाहावा असा हा चित्रपट आहे. विशेष करून आजच्या तरुण पिढीने या चित्रपटापासून बोध घ्यावा असाच आहे. आई-वडील आणि त्यांचा मुलगा यांच्या नात्याची वीण गुंफता गुंफता त्यांच्या नात्यामध्ये आलेला दुरावा..त्यांच्या नात्यामध्ये पडलेली दरी आणि त्यांच्यातील एकूणच ताणतणाव, त्यानंतर थेट न्यायालयीन लढाई वगैरे वगैरे बाबी सुंदररीत्या या चित्रपटामध्ये मांडण्यात आल्या आहेत. भावनिकदृष्ट्या खिळवून ठेवणारा आणि विचार करायला लावणारा असा हा चित्रपट आहे. महेश मांजरेकर आणि त्यांच्या टीमने कौटुंबिक व सामाजिक असा उत्तम चित्रपट दिला आहे. ही कथा आहे निवृत्तीचे आयुष्य जगणाऱ्या गोविंद राठोड (महेश मांजरेकर) या ज्येष्ठ नागरिकाची.
ते आणि त्यांची पत्नी सुहासिनी (मेधा मांजरेकर) एका छोट्याशा घरात राहात असतात. त्यांना अभय (भूषण प्रधान) नावाचा एक मुलगा असतो.
अभय हा आयएएस अधिकारी झालेला असतो. त्याने आपल्या पत्नी अवनीसह (अनुष्का दांडेकर) आपला वेगळा संसार थाटलेला असतो. मात्र आपल्या वडिलांचे सगळे आर्थिक व्यवहार तोच सांभाळीत असतो. दरम्यान त्याची नियुक्ती मुख्यमंत्र्यांचा प्रधान सचिव म्हणून होते. अशातच त्याच्या आईची तब्येत अचानक बिघडते. ताबडतोब तिला गोविंद राठोड रुग्णालयात घेऊन जातात. मात्र तेथे डिपाॅझिट भरल्याशिवाय तिला अॅडमिट करून घेतले जात नाही. त्यामुळे गोविंद राठोड लगेच आपल्या मुलाला वारंवार फोन करतात. परंतु तो फोन काही घेत नाही आणि अशातच गोविंद राठोड यांच्या पत्नीचे निधन होते. आपल्या पत्नीचे निधन आपल्याच मुलाच्या हलगर्जीपणामुळे झाले आहे अशी तक्रार ते करतात आणि मग सुरु होते न्यायालयीन लढाई. त्यानंतर या न्यायालयीन लढाईत कोणाचा जय-पराजय होतो...गोविंद राठोड कशा प्रकारचा संघर्ष करतात..त्यांना कुणाकुणाची साथ वा मदत मिळते...वगैरे बाबी पडद्यावरच पाहिलेल्या बऱ्या. महेश मांजरेकर यांची ही कथा आहे आणि त्यांनी या कथेची मांडणी उत्तम केली आहे. कथा-पटकथा आणि संवाद या तिहेरी भूमिकेबरोबरच त्यांनी दिग्दर्शन आणि अभिनय केला आहे. यातील गाणेही त्यांनीच गायले आहे. हा चित्रपट म्हणजे सबकुछ महेश मांजरेकरच आहेत असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. संपू्र्ण चित्रपटाचा डोलारा त्यांनी आपल्याच खांद्यावर घेतलेला आहे. गोविंद राठोडच्या भूमिकेमध्ये त्यांनी अभिनयाचे चांगलेच चौकार आणि षटकार लगावलेले आहेत. गोविंद राठोडच्या भूमिकेतून त्यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या व्यथा आणि त्यांच्या मनातील खदखद योग्यरीत्या मांडली आहे. त्याचबरोबर त्यांनी आजच्या तरुण पिढीला चांगलाच संदेशही देण्याचा प्रयत्न केला आहे. मेधा मांजरेकर, भूषण प्रधान, अनुष्का दांडेकर, समीर धर्माधिकारी, उपेंद्र लिमये. ओमकार भोजने, सचिन खेडेकर, शरद पोंक्षे, डाॅ. गिरीश ओक आदी कलाकारांनी आपल्या सहजसुंदर अभिनयाने या चित्रपटाला चार चांद लावलेले आहेत. विशेष बाब म्हणजे अभिनेता उपेंद्र लिमयेने साकारलेली पक्या भाईची भूमिका म्हणजे या चित्रपटातील सरप्राईज पॅकेज आहे. ही भूमिका त्याने उत्तमरीत्या वठविली आहे. शिवाय चित्रपटाचा क्लायमॅक्स धक्का देणारा असाच झाला आहे. हा एक चांगलाच रंगलेला कोर्ट ड्रामा आहे. चित्रपटातील संवाद दमदार आहेत आणि ते आपल्याला अस्वस्थ करतात अन् नकळतपणे आपल्या डोळ्यांच्या कडा पाणावतात.
चित्रपटातील संगीत आणि सिनेमॅटोग्राफी उत्तम आहे. चित्रपटामध्ये काही बाबी अतार्किक आहेत. परंतु एकूणच चित्रपटाचा विषय पाहता त्याकडे दुर्लक्ष केलेले बरे. कारण या चित्रपटाचा विषयच असा आहे की तो आपल्याला शेवटपर्यंत खिळवून ठेवतो. एक भावनाप्रधान, दमदार आणि हृदयस्पर्शी असा हा चित्रपट आहे.
साडे तीन स्टार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.