माणूस आणि प्राण्यांमध्ये नातं विणणाऱ्या 'गाभ'ने जिंकली का प्रेक्षकांची मनं? वाचा रिव्ह्यू

Gaabh Movie Review: मानव व प्राणी यांच्या नातेसंबंधाबरोबरच हळवी लव्हस्टोरी या चित्रपटात दाखवण्यात आली आहे.
gabh movie
gabh movie sakal
Updated on

लेखक व दिग्दर्शक अनुप जत्राटकर आणि निर्माते सुमन नारायण गोटुरे व मंगेश नारायण गोटुरे यांच्या गाभ या मराठी चित्रपटाचे राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये कौतुक झाले आहे. वेगळ्या धाटणीचे कथानक आणि त्याची मांडणी म्हणून हा चित्रपट गौरविला गेला आहे. प्राणी आणि मानव यांना केंद्रस्थानी ठेवून ही कथा बांधण्यात आली असली तरी त्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची प्रेमकथा गुंफण्यात आली आहे. खरे तर प्राणी आणि माणूस यांच्या नातेसंबंधावर आधारित चित्रपट आलेले असले तरी यामध्ये गाभ हा वेगळ्या पठडीत बसणारा असाच चित्रपट आहे.

ग्रामीण भागातील अस्सल रांगड्या तरुणाच्या भोवती फिरणारी ही कथा असली तरी तिच्या केंद्रस्थानी म्हैस व रेडा आहे. कारण या म्हैशीमुळे या तरुणाच्या वागण्यात आणि जगण्यात कसा बदल होत जातो शिवाय तो तरुण आणि तरुणीमध्ये प्रेमकहाणी कशी फुलत जाते हे दर्शविणारा हा चित्रपट आहे . दादू (कैलास वाघमारे) असे त्या तरुणाचे नाव आणि फुलवा (सायली बांदकर) असे त्या तरुणीचे नाव. दादू हा आपल्या आजी सोबत राहात असतो. त्याच्या घरी फुलवा नावाची एक म्हैस असते. तिची देखभाल त्याची आजीच करीत असते.

दादू चांगला शिकलासवरलेला असतो. तो सरपंचाकडे कारकुनीचे काम करीत असतो. दादू वयात आल्यामुळे ्याची आजी त्याच्याकडे लग्न करण्याचा तगादा लावते. परंतु ही बाब गंभीरपणे घेत नाही. दरम्यान फुलवा ही दुसऱ्या गावात राहणारी तरुणी असते.तिच्याकडे राजा नावाचा रेडा असतो. एके दिवशी सरपंचाच्या म्हशीला गाभण करण्यासाठी दादू त्या गावात येतो आणि फुलवाशी बोलणी करतो. मग फुलवा आणि त्याच्यामध्ये कोणती बोलणी होतात..कोणत्या घटनेमुळे त्याच्यामध्ये प्रेमाचे बंध फुलतात..याकरिता हा चित्रपट पाहावा लागेल.

लेखक व दिग्दर्शक अनुप जत्राटकरने आतापर्यंत लघुपट, माहितीपट, प्रायोगिक नाटके, अल्बम्स असा चौफेर प्रवास केला आहे आणि आता त्याने हा चित्रपट आणलेला आहे. एका चांगल्या सामाजिक मुद्दय़ाला त्याने या चित्रपटात हात घातला आहे. पशुंवर प्रेम करा.. पशू हत्या टाळा असा संदेश त्याने या चित्रपटाद्वारे दिला आहे. चित्रपटाच्या कथेला छान ट्रिटमेंट त्याने दिली आहे. कैलास वाघमारे आणि सायली बांदकर या नव्या जोडीची पडद्यावरील केमिस्ट्री उत्तम जुळलेली आहे. दोघांनीही आपापल्या भूमिकेचे बेअरिंग छान पकडलेले आहे.

कैलास वाघमारेने आतापर्यंत हिंदी व मराठीमध्ये छोट्या-मोठ्या भूमिका केल्या असल्या तरी नायक म्हणून काम करण्याचा त्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे. त्याने दादा साहेबांची भूमिका उत्तम वटवली आहे. सायलीनेदेखील त्याला उत्तम साथ दिली आहे. धाडसी, खमक्या आणि काहीशी फटकळ स्वभावाच्या फुलवाची भूमिका सायलीने आपल्या स्टाईलने साकारली आहे. अन्य कलाकारांमध्ये विकास पाटील, उमेश बोळके, वसुंधरा पोखरणकर, श्रद्धा पवार, चंद्रशेखर जनवाडे यांच्या भूमिकाही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. त्यांनी आपापल्या भूमिका चोख साकारल्या आहेत.

विशेष बाब म्हणजे चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी उत्तम झाली आहे. त्याबद्दल वीरधवल पाटीलचे कौतुक करावे लागेल. कोल्हापूर आणि आसपासच्या परिसरातील विविध लोकेशन्स मन प्रसन्न करणारी आहेत. चित्रपटातील संगीतही छान जमून आलेले आहे. मात्र चित्रपटाचा पूर्वार्ध काहीसा संथ झाला आहे. उत्तरार्धात चित्रपट चांगली गती घेतो आणि सामाजिक संदेशही देतो. माणूस आणि प्राणी यांच्यातील नातेसंबंध, त्यांचे एकमेकांवरील प्रेम आणि जिव्हाळा सांगताना हळवी अशी प्रेमकथा अलगदपणे उलगडणारा हा चित्रपट आहे.

gabh movie
अभिनेत्याचा सेक्रेटरी हात मुरगळायचा, चुकीचा स्पर्श... अभिनेत्रीने १८ व्या वर्षी केला कास्टिंग काऊचचा सामना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.