Kalki 2898 AD Review: पौराणिक कथा आणि साय फाय तंत्रज्ञानाचा उत्तम संगम; वाचा कल्की 2898 एडी रिव्ह्यू

Kalki 2898 AD: पौराणिक कथा आणि तंत्रज्ञान यांचा उत्तम संगम या चित्रपटामध्ये साधण्यात आला आहे.
kalki 2898 ad
kalki 2898 adsakal
Updated on

दाक्षिणात्य प्रसिद्ध दिग्दर्शक नाग अश्विन यांचा महत्त्वाकांक्षी आणि बिग बजेट कल्की २८९८ एडी या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगलेली होती. प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन, कमल हासन, प्रभास, दीपिका पदुकोण असे मोठे स्टार्स असल्यामुळे सगळ्यांना या चित्रपटाची उत्सुकता लागलेली होती. आता हा चित्रपट सगळीकडे प्रदर्शित झाला आहे आणि चांगलीच गर्दी खेचत आहे. ही एक पौराणिक कथा आहे आणि या कथेला विज्ञानाची सांगड घालून ती उत्तम प्रकारे गुंफण्यात आली आहे. पौराणिक कथा आणि तंत्रज्ञान यांचा उत्तम संगम या चित्रपटामध्ये साधण्यात आला आहे.

या कथेचा मूळ धागा भगवान विष्णूच्या आधुनिक अवताराभोवती फिरणारा आहे. भगवान विष्णू जगाला वाईटापासून वाचविण्यासाठी दहावा अवतार घेणार आहेत आणि तो अवतार कल्की असणार आहे यावर हे कथानक आधारलेले आहे. भगवान श्रीकृष्ण द्रोणाचार्यांचा मुलगा अश्वत्थामाला अमरत्व प्रदान करतात. पौराणिक आख्यायिकेनुसार अश्वत्थामा कलियुगाच्या अंतापर्यंत जिवंत राहणार असतो. ज्यावेळी पृथ्वीवर अमानुष अत्याचार, हिंसाचार वाढेल त्यावेळी भगवान विष्णू दहावा अवतार धारण करतील आणि कलियुगाचा अंत होईल अशी आख्यायिका मानली जाते.

हा दहावा अवतार कल्कीचा असणार आहे आणि या दहाव्या अवतारासाठी अश्वत्थामाला मदत करायची असते. तोपर्यंत हे जग खूप बदललेले असते. त्याच दरम्यान अश्वत्थामा स्वतःला काशी येथील आधुनिक शहरामध्ये पाहतो. या शहरात एक निर्दयी आणि दुष्ट सेनापती (सास्वत चॅटर्जी) एका मायावी काॅम्प्लेक्सचा राजा समजत असतो. हे काॅम्प्लेक्स अत्यंत आधुनिक आणि लक्झरीयुक्त असे असते. हा क्रूर सेनापती या काॅम्प्लेक्सचा मालक सुप्रीम (कमल हासन)साठी काम करीत असतो.

या काॅम्प्लेक्समध्ये काही तरुण महिलांना बंदिस्त केलेले असते. तेथे त्यांच्या गर्भावर एका लॅबमध्ये वेगवेगळे प्रयोग केले जातात. आपली दैवी शक्ती वाढविण्यासाठी सुप्रीम आपल्या दृष्ट सेनापतीकडून हे काम करून घेत असतो. तेथे सुमती (दीपिका पदुकोण) देखील पाच महिन्यांची गरोदर असते. तिला चमत्कारिकरीत्या गर्भधारणा झालेली असते. मुळात हा बहुप्रतिक्षित अवतार सुमतीच्या गर्भात वाढत असतो. ती तेथून कशीबशी पळून जाते. मग भैरवा (प्रभास) तिला पुन्हा सु्प्रीमच्या ताब्यात देण्याचा प्रयत्न करतो. परंतु पौराणिक काळातील अश्वत्थामा (अमिताभ बच्चन) सुमतीच्या रक्षणासाठी येतो. मग भैरवा कोण असतो...त्याची आणि अश्वत्थामाची लढाई कशी होते..सुमतीच्या पोटातील गर्भाचे रक्षण कोण आणि कसे करते...सुप्रीमचे मायावी जग कोण उद्ध्वस्त करते...वगैरे प्रश्नांच्या उत्तरासाठी हा चित्रपट पाहावा लागेल.

दिग्दर्शक नाग अश्विनच्या या कथाकथनात अनेक ट्रॅक आणि सब-ट्रॅकचे जाळे आहे. चित्रपटाच्या कथानकामध्ये गुंतागुंत आहे. त्यामुळे चित्रपट पाहताना आपल्या मनात गोंधळ निर्माण होतो. मात्र दिग्दर्शक नाग अश्विनने आधुनिक कॉम्प्लेक्स आणि शंभलाचे जग ज्या पद्धतीने उभारले आहे ते पाहताना आश्चर्यचकित व्हायला होते. व्हीएफएक्स-सीजीएस या तंत्राचा पुरेपूर वापर या चित्रपटात करण्यात आला आहे. कलाकारांची केशभूषा आणि वेशभूषा निराळी आहे. भैरवा आणि अश्वत्थामा यांच्यातील संघर्ष अर्थात उच्च ऑक्टेन ॲक्शन सीक्वेन्स डोळ्यांची पारणे फेडणारे आहेत. उच्च मूल्य..उच्च तंत्रज्ञान यांनी परिपूर्ण असा हा चित्रपट आहे.

अमिताभ बच्चन, कमल हसन, प्रभास, दीपिका पदुकोन आदी कलाकारांच्या लाजबाब अभिनयाने या चित्रपटाला चार चांद लावलेले आहेत. विशेष म्हणजे अमिताभ बच्चन यांनी कमाल केली आहे. अमिताभ बच्चन म्हणजे अभिनयाची एक इन्स्टिट्यूट आहे आणि त्यांनी पुन्हा एकदा या चित्रपटामध्ये अश्वत्थामा ही भूमिका साकारून ते सिद्ध केले आहे. संपूर्ण चित्रपटामध्ये ते भाव खाऊन गेले आहेत. प्रभासने साकारलेली भैरवा ही भूमिका त्याने उत्तमरीत्या साकारली आहेच शिवाय बुज्जी आणि त्याच्यातील ट्युनिंग छान जमले आहे. दिशा पटानीच्या वाट्याला कमी सीन्स आले असले तरी त्यातही तिने आपली चमक दाखविली आहे.

दीपिकाने सुमतीच्या भूमिकेतील विविध भाव पडद्यावर छान रेखाटले आहेत. त्याशिवाय रामगोपाल वर्मा, एस. एस राजामौली, मृणाल ठाकूर. दुलकर सलमान आदी कलाकारांची कामे उल्लेखीनीय आहेत. चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी सुंदर झाली आहे. मात्र संगीत निराशादायक झाले आहे. चित्रपटाचा पूर्वार्ध फारशी मनाची पकड घेत नाही. तो पटकथेमध्ये उडालेला गोंधळ आहे. मात्र उत्तरार्ध आणि चित्रपटाचा क्लायमॅक्स उत्तम गुंफण्यात आला आहे. एक उच्च निर्मितीमूल्य असलेला आणि उच्च तंत्रज्ञानाचा हा चित्रपट आहे. पौराणिक कथा आणि साय फाय यांची उत्तम सांगड असणारा चित्रपट आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.