Kiran Mane Post : अभिनेते किरण माने कायमच त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असतात. त्यांच्या राजकीय, वैचारिक आणि वैयक्तिक पोस्ट खूप गाजतात. सोशल मीडियावर कायमच त्यांच्या या पोस्टमधून एक वेगळा विचार,वेगळी माहिती सगळ्यांना वाचायला मिळते. सध्या आषाढीची वारी पुन्हा सुरु आहे. पंढरपूरच्या विठुरायाला सगळे वारकरी त्याचं गुणगान गात पायी निघाले आहेत. यावेळी किरण माने यांनी पोस्ट करत अशा संताची गोष्ट सांगितली जो कधीच पंढरपूरच्या वारीला गेला नाही तर उलट पंढरपूरचा विठ्ठलच त्याला पालखीतून भेटायला येतो.
किरण यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये ते म्हणतात, "महाराष्ट्रभरातनं सगळ्या संतांच्या दिंड्या पंढरीला जायला निघाल्यात. पण एक असा जगावेगळा संत हाय ज्याला भेटायला त्याच्या गांवात वर्षातनं एकदा साक्षात पंढरपूरच्या विठ्ठलाची पालखी येते ! काय थोर महिमा आसंल बघा या अवलीया संताचा...
हा असा संत हाय जो आयुष्यात कधीच पंढरपूरला गेला नाय ! बरं गांव पंढरपूरपास्नं लांब होतं असंबी नाय... सोलापूर जिल्ह्यातल्या माढा तालुक्यातलं अरण हे गांव. पण हा माणूस विठ्ठलाचं नांव घेत आपल्या शेतात रमलेला. 'पंढरीला जाणाऱ्या वारकऱ्यांना भाकरी देणं, तहानलेल्या वाटसरूला पाणी देणं, फळं देणं हीच माझी विठ्ठलभक्ती.' असं म्हणायचा. पांडुरंग हा कुठल्या मंदिरात किंवा मूर्तीत नाही, तर आपलं रोजचं काम हसतमुखानं आनि मनापासून करण्यात हाय अशी त्यांची शिकवण होती. या संताचं नांव होतं सावता माळी !
"कांदा मुळा भाजी । अवघी विठाई माझी ॥" असा अत्यंत रॅशनल विचार देणार्या सावता माळ्यानं विद्रोहाचं एक वेगळंच रूप जगाला दाखवलं "नामाचिया बळें न भीऊं सर्वथा । कळिकाळाच्या माथा सोटे मारूं ॥ वैकुंठीचा देव आणूं या कीर्तनीं । विठ्ठल गाऊनी नाचो रंगीं ।।" साक्षात वैकुंठीचा देव आम्ही आमच्या किर्तनात आणतो असा जबराट ॲटिट्यूड होता सावताचा.
‘साव’ म्हन्जे शुद्ध चारित्र्य, सज्जनपणा. 'सावता' हा भाववाचक शब्द हाय. सावता म्हणजे चारित्र्यसंपन्नता. अशिक्षित असूनबी अतिशय प्रगत, पुरोगामी विचार मनामेंदूत मुरलेल्या सावता माळी यांनी देवपुजा, अभिषेक, यज्ञयाग, अंधश्रद्धा, कर्मठपणा यावर जोरदार प्रहार केला. वैदिकांनी त्यांनाबी शिव्याशाप देऊन लै ट्रोल केलं पण त्यांनी कुणाची भीडभाड ठेवली नाही. "योग याग तप धर्म । सोपे वर्म घेता ।। तीर्थव्रत दान अष्टांग । यांचा पांग आम्हा नको ।।" आमच्या इठूरायाला प्रसन्न करून घ्यायचं आसंल, तर योग-याग-जप-तप, तीर्थव्रत, व्रतवैकल्यं या साधनांची आम्हाला अजिबात गरज नाही. शुद्ध अंत:करण, सदाचार, निर्भयता, नीतिमत्ता, सहिष्णूता हे गुण अंगी बाळगले तर विठूराया न मागता कृपा करतो हे ठासून सांगीतलं.
अशा या थोर संताला फक्त पंचेचाळीस वर्षांचं आयुष्य लाभलं. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आज आपल्याकडं त्यांचे फक्त ३७ अभंग उपलब्ध आहेत. सावता स्वत: अशिक्षित होते. "आमुची माळीयाची जात । शेत लावू बागाईत ।।" असं म्हणत मळ्यात काम करता-करता ते जे अभंग गात, ते त्यांचे अनुयायी काशीबा गुरव लिहून ठेवत... त्यातलेच हे निवडक अभंग शिल्लक राहिलेत.
'न लगे सायास, न पडे संकट... नामे सोपी वाट वैकुंठाची' अशी कर्मकांड झुगारून देऊन बहुजनांना भक्तीची साधीसरळ वाट दाखवणार्या सावता माळी यांना त्रिवार वंदन !"
विठ्ठलाला त्याच्या कामातच शोधणाऱ्या आणि कर्म हाच देव हा सिद्धांत मांडणाऱ्या संत सावता माळी यांच्याविषयी किरण यांनी लिहिलेली पोस्ट चर्चेत आहेत. अनेकांनी कमेंट करत त्यांच्या या पोस्टचं कौतुक केलं.
१७ जुलै २०२४ ला आषाढी एकादशी असून संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहाचं वातावरण आहे. अनेक कलाकार आणि राजकारणीही यंदा वारीत सहभागी होणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.