मराठी-हिंदी चित्रपट, नाट्य अभिनेत्री सुहास जोशी यांना गौरवपदक घोषित; पुरस्काराचं काय आहे स्वरूप?

Marathi-Hindi film actress Suhas Joshi : अखिल महाराष्‍ट्र नाट्यविद्यामंदिर समितीतर्फे दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो.
Marathi-Hindi film actress Suhas Joshi
Marathi-Hindi film actress Suhas Joshiesakal
Updated on
Summary

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ समीक्षक डॉ. तारा भवाळकर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे समितीतर्फे अभिनंदन करण्यात आले.

सांगली : मराठी-हिंदी चित्रपट, नाट्य अभिनेत्री, श्रीमती सुहासिनी ऊर्फ सुहास जोशी (Suhas Joshi) यांना रंगभूमीवरील मानाचे विष्णुदास भावे गौरवपदक (Vishnudas Bhave Gaurav Padak) घोषित झाले. अखिल महाराष्ट्र नाट्यविद्यामंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. शरद कराळे यांनी या पुरस्काराची घोषणा केली. येत्या ५ नोव्हेंबर रोजी मराठी रंगभूमीदिनी अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे (Akhil Bharatiya Marathi Natya Sammelan) अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे. समितीतर्फे दिला जाणारा यंदाचा हा ५६ वा पुरस्कार आहे.

येथील अखिल महाराष्‍ट्र नाट्यविद्यामंदिर समितीतर्फे दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. रोख रक्कम २५ हजार रुपये, स्मृतिचिन्ह, गौरवपदक, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. डॉ. कराळे म्हणाले, ‘गेल्या ५५ वर्षांत समितीतर्फे नाट्यसृष्टीतील बालगंधर्व, आचार्य अत्रे, भालजी पेंढारकर, पु. ल. देशपांडे, गदिमा, प्रभाकर पणशीकर, वसंत कानेटकर, मास्टर अविनाश, डॉ. श्रीराम लागू, निळू फुले, विक्रम गोखले, डॉ. जब्बार पटेल, मोहन जोशी, प्रशांत दामले यांच्यासह दिग्गजांना या मानाच्‍या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. यंदा मराठी व हिंदी चित्रपट तसेच नाट्यसृष्टीसाठी योगदान देणाऱ्या अभिनेत्री सुहास देशपांडे यांना हा पुरस्कार घोषित झाला आहे.

यावेळी समितीचे कार्यवाह विलास गुप्ते, कोषाध्यक्ष मेघा केळकर, सदस्य माजी प्राचार्य डॉ. भास्कर ताम्हणकर, जगदीश कराळे, बलदेव गवळी, विवेक देशपांडे, भालचंद्र चितळे, चंद्रकांत धामणीकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. श्रीमती देशपांडे यांची सुमारे ५० वर्षांची कारकीर्द असून दिल्लीतील ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’मधून त्यांनी नाट्याचे तंत्रशुद्ध धडे गिरवले आहेत. महाविद्यालयीन जीवनात असताना त्यांनी मराठी नाटकात अभिनयाची छाप सोडली. व्यावसायिक अभिनयाची कारकीर्द त्यांनी वयाच्या २५ व्या वर्षी १९७२ साली बॅरिस्टर नाटकाने सुरू केली.

Marathi-Hindi film actress Suhas Joshi
आपण आपल्याच भाषेला दुय्यम का मानायचं? मराठीबद्दल अस्मिता हवीच; काय म्हणाल्या ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर?

सख्खे शेजारी, गोष्ट जन्मांतरीची, आनंदी गोपाळ, अग्निपंख, एकच प्याला, नटसम्राट, कन्यादान, किरवंत, डॉक्टर तुम्हीसुद्धा.. ही त्यांची गाजलेली नाटके होत; तर ‘तू तिथे मी’, सातच्या आत घरात, बालगंधर्व, मुंबई-पुणे-मुंबई, बोगदा, झिम्‍मा, एकदा काय झालं, आघात, आनंदाचं झाड, आदी मराठी चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या आहेत. याशिवाय तेजाब, चांदणी, लव्ह, सातवा आसमान, डॅडी, आज की औरत, ताकद, ‘बाजीराव मस्तानी’, पापा कहते है, आजमाईश, पाँच, मुंज्या आदी हिंदी चित्रपटांतही भूमिका साकारल्या आहेत. तसेच सांजसावल्या, प्रपंच, आभाळमाया, जगावेगळी, अग्निहोत्र, कुंकू, तू तेव्हा तशी, ललित या मराठी आणि एक पॅकेट उम्मीद, खामोशियाँ या हिंदी दूरचित्रवाणी मालिकांतही त्यांनी लक्षवेधक भूमिका साकारल्या आहेत.

सुहास जोशी यांचा गंभीर आणि विनोदी अशा दोन्ही प्रकारच्या भूमिका साकारण्यात त्यांचा विशेष हातखंडा आहे. त्यांनी श्रीराम लागू यांच्यासोबत केलेल्या ‘अग्निपंख’, ‘नटसम्राट’, ‘एकच प्याला’ या नाटकांनी मराठी नाट्यसृष्टीत मानाचे स्थान मिळवले. बॅरिस्टरमधील ‘राधा’, सई परांजपे लिखित ‘सख्खे शेजारी’मधील मध्यमवर्गीय गृहिणी, विजय तेंडुलकरांच्या कन्यादान नाटकातील त्यांची व्यक्तिरेखा आजही रसिकांच्या स्मरणात आहेत. लक्ष्मीबाई टिळकांच्या ‘स्मृतिचित्रे’चे त्यांनी केलेले एकपात्री प्रयोग गाजले होते. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे ‘जीवनगौरव’, ‘संगीत नाटक अकदमी’, पी. सावळारामांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा ‘गंगाजमुना’, ‘फिल्मफेअर’ यासह शेकडो पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे.

Marathi-Hindi film actress Suhas Joshi
'राज्यातील महायुतीचे सरकार गुजरातधार्जिणे, महाराष्ट्राला काँग्रेसशिवाय पर्याय नाही'; नाना पटोले स्पष्टच बोलले

डॉ. भवाळकर यांचाही होणार गौरव

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ समीक्षक डॉ. तारा भवाळकर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे समितीतर्फे अभिनंदन करण्यात आले. नाट्यपंढरीत मराठी सारस्वताच्या दृष्टीने ही अभिमानाची बाब आहे. विशेष म्हणजे ज्यांच्या नावे हे मानाचे पदक दिले जाते, त्या आद्य नाटककार विष्णुदास भावे यांचे चरित्र डॉ. भवाळकर यांनी लिहिले आहे. त्यांचा समितीतर्फे याच भावे गौरवपदक वितरण समारंभात यथोचित सत्कार करण्यात येणार असल्याचे माजी प्राचार्य डॉ. भास्कर ताम्हणकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.