Mathura Constituency Election Result : उत्तरप्रदेश राज्यातून आतापर्यंत जवळपास ८० खासदार लोकसभेत गेले आहेत. यातीलच एक बहुचर्चित मतदार संघ म्हणजे मथुरा. यावेळी मथुरेत तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. इथे सलग दोन वेळा विजय मिळविणाऱ्या भाजप नेत्या आणि अभिनेत्री हेमा मालिनी (Hemamalini) पुन्हा एकदा विजयी ठरल्या आहे. तर काँग्रेसकडून मुकेश धनगर (Mukesh Dhangar) आणि बसपाकडून सुरेश सिंह (Suresh Singh) यांचा पराभव झाला आहे.
याशिवाय आणखी १२ उमेदवार लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. त्यापैकी कमलकांत शर्मा , क्षेत्रपाल सिंह, मोनी फलहरी बापू, डॉ. रश्मी यादव, भानू प्रताप सिंह , प्रवेशानंद पुरी, राकेश कुमार, रवी वर्मा, शिखा शर्मा आणि योगेश कुमार तालन हे अपक्ष उमेदवार आहेत.
मथुरा मतदार संघ हा कायमच लोकसभेची खेळी पलटवणारा मतदारसंघ राहिला आहे. धक्कादायक निकाल ही मथुरा मतदार संघाची ओळख आहे आणि या मतदारसंघात माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचीही अनामत रक्कम जप्त करण्यात आली होती. १९५७ मध्ये झालेल्या दुसऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये अटलबिहारी वाजपेयी यांनी जनसंघातर्फे मथुरामधून निवडणूक लढवली होती पण त्यांचा खूप वाईट पराभव या निवडणुकीत झाला. त्यांची अनामत रक्कमही जप्त करण्यात आली. त्यावेळी अपक्ष उमेदवार राजा महेंद्रप्रताप खासदार झाले होते.
यावेळी भाजपातर्फे राम मंदिराचा मुद्दा हाती घेऊन प्रचार करण्यात आला आहे तर काँग्रेस आणि बसपाने विकासाचे मुद्दे उचलून धरत भाजप सरकारला जाब विचारला आहे. मथुरा हा विभाग जाटबहुल असल्यामुळे यावेळी काँग्रेस आणि बहुजन समाज पार्टीने त्यांचे जाट उमेदवार निवडणुकीत उभे केले आहेत.
गेल्या काही काळात मथुरामध्ये विकास झाला असला तरीही भाजपाविषयी जाट समुदायात असलेली नाराजी हेमामालिनी यांना अडचणीची ठरू शकते. राममंदिराचा मुद्दा, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चेहरा आणि राष्ट्रीय लोकदलाशी झालेली मैत्री याचा राजकीय लाभ हेमामालिनींना अपेक्षित असून त्यांनी अभिनेता पती धर्मेंद्र यांच्याशी झालेल्या विवाहामुळे आपणही जाट आहोत असं म्हणत हेमामालिनी यांनी जाट समुदायाशी स्वतःला जोडण्याचा प्रयत्न केलाय आता त्यांचा हा प्रयत्न किती यशस्वी होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
यावेळी योगी आदित्यनाथ यांनी हेमामालिनी यांच्यासाठी प्रचार केला पण मोदी व शाह यांनी मथुरेकडे पाठ फिरवली.
मथुरा लोकसभा मतदारसंघात छटा, मंत, गोवर्धन, मथुरा आणि बलदेव हे पाच विधानसभा मतदार संघ येतात आणि या पाचही ठिकाणी भाजपचे आमदार असल्यामुळे हेमामालिनी यांना प्रचारात खूप मदत झाली आहे.
मागील निवडणुकीत हेमामालिनी यांना ६,१७,२९३ मतं मिळाली होती तर त्यांच्या विरोधात उभ्या असलेल्या कुंवर नरेंद्र सिंह यांना ३,७७,८२२ मतांवर समाधान मानावं लागलं होतं.
यावेळीही एक्झिट पोल हेमामालिनी यांच्या बाजूने आहे. हेमामालिनी यांची मथुरेत खासदार बनण्याची हॅटट्रिक होणार असल्याचं म्हंटलं जातंय पण बसपाचे सुरेश सिंहही जिंकू शकतात असा दावा करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.