Naach Ga Ghuma: दिग्दर्शक परेश मोकाशीने आतापर्यंत उत्तमोत्तम चित्रपट दिले आहेत. त्याच्या चित्रपटांना प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला असून क्लास आणि मास यांचा अनोखा संगम त्याच्या चित्रपटांमध्ये पाहायला मिळतो. आताच प्रदर्शित झालेला त्याचा ‘नाच गं घुमा’ (Naach Ga Ghuma) हा चित्रपट कौटुंबिक मनोरंजन करणारा असाच आहे.
गृहिणी आणि मोलकरीण यांच्या नात्याची गंमतीशीर गोष्ट या चित्रपटात मांडण्यात आली आहे. ती मांडताना महिलांनी स्वतःची आवड-निवड कशी जोपासली पाहिजे, कौटुंबिक जबाबदारी सांभाळताना महिलांनी स्वतःच्या आवडीकडे कसे लक्ष दिले पाहिजे, हेदेखील सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
ही कथा आहे घरमालकीण राणी (मुक्ता बर्वे) आणि तिची मोलकरीण आशाताई (नम्रता संभेराव) यांची. राणी व तिचा पती आनंद (सारंग साठ्ये) आणि मुलगी चिकू अर्थात सायली (मायरा वायकूळ) हे एक मध्यमवर्गीय कुटुंब. राणी एका बँकेत कामाला असते. तिची दररोजची धावपळ सुरू असते. तिच्या घरी आशाताई नावाची एक मोलकरीण कामाला असते. राणी कामाला गेल्यानंतर घरची संपूर्ण जबाबदारी या आशाताईंवर असते. दररोजचे जेवण-डबा, चिकूला शाळेत सोडणे वगैरे-वगैरे कामे आशाताई करीत असतात; परंतु आशाताई कामावर उशिरा येत असल्यामुळे राणीची प्रचंड चिडचिड होत असते. कामाला उशिरा येणे आणि सातत्याने फोनवर बोलणे, अशा काही कारणांमुळे राणी आणि आशाताई यांच्यामध्ये सतत तू तू मैं मैं होत असते.
अशातच एके दिवशी राणी रागाच्या भरात आशाताईंना कामावरून काढून टाकते. मग आपली योगाची आवड आणि घरची कामे करताना राणीची कसरत होत असते. त्यातच ती आता नव्या मोलकरणीचा शोध घेत असते; परंतु तिला सहजासहजी मोलकरीण मिळत नाही. मग तिचीच बँकेतील सहकारी कल्याणी (शर्मिष्ठा राऊत)च्या मदतीने ती आशाताईंना पुन्हा कामावर ठेवते. कारण राणी आणि आशाताई यांचे नाते असे असते की तुझे माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना. त्यामुळे आशाताई पुन्हा राणीच्या घरी कामाला येतात. त्यानंतर अशी एक घटना घडते की पुन्हा राणी संतापून आशाताईंना कामावरून काढून टाकते आणि मग कोणत्या व कशा घडामोडी घडतात हे प्रत्यक्ष पडद्यावर पाहिलेले बरे.
दिग्दर्शक परेश मोकाशीने एक उत्तम चित्रपट दिला आहे. एक मोलकरीणदेखील वर्किंग वुमन असते. तिच्यादेखील काही समस्या असतात आणि त्या घरमालकिणीने समजून घेतल्या पाहिजेत. त्यांचाही मानसन्मान ठेवला पाहिजे, हेदेखील लेखक व दिग्दर्शक परेश मोकाशी आणि लेखिका मधुगंधा कुलकर्णी यांनी या चित्रपटातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
आपल्या अवतीभवती घडणारी ही कथा परेश आणि त्याच्या टीमने हलक्या-फुलक्या पद्धतीने उत्तम मांडली आहे. अगदी बारीकसारीक गोष्टींचा विचार पटकथा बांधताना करण्यात आला आहे. राणीची दररोजची गडबड व धावपळ, त्यातून तिची होणारी चिडचीड, त्यामध्ये आनंदची होणारी
ससेहोलपट, चिकूचा अभ्यास व शाळेची तयारी, आशाताई आणि राणीची तू तू मैं मैं वगैरे गोष्टी छान पद्धतीने पडद्यावर टिपण्यात आल्या आहेत.
मुक्ता बर्वे, नम्रता संभेराव, सारंग साठ्ये, मायरा वायकूळ, सुकन्या कुलकर्णी-मोने, सुप्रिया पाठारे आदी कलाकारांची कामगिरी उत्तम झाली आहे. मुक्ताने काहीशी वेगळ्या धाटणीची भूमिका या चित्रपटात साकारली आहे. तिने आपल्या भूमिकेचे बेअरिंग छान पकडले आहे. मायरा वायकूळने चुणचुणीत अशा चिकूची भूमिका उत्तम निभावली आहे. तिच्या वाट्याला छान संवाद आले आहेत. मात्र, अधिक कौतुक करावे लागेल ते नम्रता संभेरावचे. आशाताईंच्या भूमिकेची देहबोली, तिची भाषा वगैरे बाबी तिने छान टिपल्या आहेत. आशाताईंच्या भूमिकेत ती कमालीची भाव खाऊन गेली आहे. सारंग साठ्येने सहजसुंदर अभिनय केला आहे. त्याची आणि मुक्ताची केमिस्ट्री पडद्यावर छान जमलेली आहे. परेश मोकाशी, स्वप्नील जोशी, कविता लाड-मेढेकर, ललित प्रभाकर यांनी पाहुण्या कलाकाराची भूमिका बजावली आहे.
प्रासंगिक आणि शाब्दिक विनोदाची पेरणी छान करण्यात आली आहे. परेश मोकाशीचे उत्तम दिग्दर्शन, कलाकारांचा सहजसुंदर अभिनय, तन्मय भिडेचे सुरेल संगीत आणि देखणी सिनेमॅटोग्राफी अशा काही बाबी या चित्रपटाच्या जमेच्या आहेत. मात्र, काही दृश्ये अतिरंजित आहेत. त्यामुळे अतिशयोक्ती जाणवते. तरीही एक कौटुंबिक विनोदी असा हा चित्रपट आहे. मालकीण आणि मोलकरीण यांच्या नात्याची गमतीशीर कथा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.