Showtime : चित्रपटसृष्टीवर आधारित असणारे सिनेमे आणि वेबसीरिज प्रेक्षकांसाठी नवीन नाहीत. कमालीच्या अस्थिर असणाऱ्या या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचे परस्परसंबंध, वैयक्तिक हेवेदावे जितके अनिश्चित असतात तितकीच उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याची शाश्वत प्रथा इथे दिसून येते.
‘आपले आणि उपरे’ हा संघर्ष सगळीकडेच असला तरी इथे मात्र त्याची नको तितकी प्रसिद्धी होते. अर्थात त्याविषयी सामान्यांना असणारे विशेष आकर्षण त्याला कारणीभूत ठरते. याच कळीच्या मुद्द्याला केंद्रस्थानी ठेवणारी ‘शोटाईम’ ही नवीन सीरिज नुकतीच डिज्नी हॉटस्टारवर प्रदर्शित झाली आहे.
- युवराज माने
चाळीस वर्षांपासून मनोरंजनाच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्हिक्टरी स्टुडिओजचे सर्वेसर्वा व्हिक्टर खन्ना (नसिरुद्दीन शाह) आता स्टुडिओच्या कारभारातून बाहेर फेकले गेलेत. त्यांचा मुलगा रघू खन्ना (इम्रान हाश्मी) स्टुडिओला त्यांच्या ‘सिनेमा धंदा नही, धर्म है’ या विचारांपासून दूर घेऊन गेला आहे, याची त्यांना खंत आहे.
रघूसाठी कोणतीही फिल्म एक प्रोजेक्ट आहे आणि ती यशस्वी करण्यासाठी काहीही करण्यास तो कचरत नाही. अगदी आपल्या फिल्म्सना चांगले रिव्यू मिळवण्यासाठी पत्रकारांना लाच देणेही त्याला गैर वाटत नाही; परंतु माहिका नंदी (महिमा मकवाना) ही नवपत्रकार रघूचे प्रलोभन धुडकावून त्याच्या नव्या फिल्मचा यथेच्छ ‘समाचार’ घेते.
तिच्या बेधडकपणामुळे प्रभावित झालेले व्हिक्टर खन्ना तिला भेटतात आणि या भेटीनंतर एक अत्यंत महत्त्वाचा पण वादग्रस्त निर्णय घेऊन जगाचा निरोप घेतात. त्यांच्या या निर्णयामुळे रघू आणि माहिका या दोघांचे आयुष्य रातोरात कसे बदलते आणि हे दोघे अचानक उद्भवलेल्या या परिस्थितीला कसे सामोरे जातात यावर सीरिजचे कथानक बेतलेले आहे.
सुमित रॉय, मिथुन गंगोपाध्याय आणि लारा चांदनी यांनी सीरिजची पटकथा लिहिली आहे. करण जोहर यांच्या ‘धर्मैटिक’ या निर्मिती संस्थेने सीरिजची निर्मिती केली असल्याने हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कपोलकल्पित घटनांचा पटकथेत समावेश केलेला आढळून येतो. एका सामान्य वकुबाच्या आणि केवळ ‘आयटम साँग’ची कामे मिळणाऱ्या मॉडेलने आपल्याला एक अभिनेत्री म्हणून ओळख मिळावी,
यासाठी खटपट करणे, एका सुपरस्टारचे अनेक चित्रपट ओळीने अयशस्वी ठरल्याने त्याने ‘अॅक्शनपट’ करण्याची मनीषा बाळगणे, आंतरराष्ट्रीय महोत्सवात पुरस्कार जिंकणाऱ्या दिग्दर्शकाने व्यावसायिक चित्रपटांना तुच्छ लेखणे, ख्यातनाम स्टुडिओच्या निर्मात्याने फिल्मची केवळ हिट आणि फ्लॉप या दोनच गटांत विभागणी करणे, अशा अनेक वास्तववादी घटना पटकथेत घडताना दिसतात.
जहान हांडा आणि करण शर्मा यांचे संवाद चित्रपटसृष्टीतील सुप्त संघर्ष दाखवताना परिणामकारक ठरतात. तरीही पटकथा अनेक ठिकाणी उथळ वाटते. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे कोणतीच व्यक्तिरेखा सखोलपणे लिहिली गेलेली नाही. याशिवाय रघू आणि माहिका यांच्यातील संघर्षही वरवरचा वाटत राहतो.
मिहिर देसाई आणि अर्चित कुमार यांचे दिग्दर्शन अपेक्षित परिणाम साधू शकलेले नाही. रघू आणि त्याची प्रेयसी यास्मिन (मौनी रॉय) यांच्यातील भावनिक प्रसंग, अचानक मोठी जबाबदारी अंगावर पडल्याने माहिकाची उडालेली तारांबळ, सुपरस्टार अरमानला (राजीव खंडेलवाल) नवख्या अभिनेत्रीसमोर वाटणारी असुरक्षितता असे अनेक प्रसंग पुरेसे गंभीर वाटत नाहीत.
अभिनयात माहिकाच्या मुख्य भूमिकेतील महिमा मकवाना तिच्या व्यक्तिरेखेला न्याय देऊ शकलेली नाही. आत्मविश्वासाने भारलेली, सुरुवातीस भांबावलेली; परंतु नव्या आव्हानाला धीटपणे सामोरी जाणारी माहिका साकारताना महिमा अभिनयात फारच नवखी वाटते. इम्रान हाश्मी आततायी रघू समर्थपणे उभा करतो. राजीव खंडेलवाल धूर्त अरमान प्रभावीपणे सादर करतो. मौनी रॉयला मात्र यास्मिनची अगतिकता दाखवण्यात यश आलेले नाही.
पुरेशा सखोलतेने न लिहिलेल्या उथळ व्यक्तिरेखा ही ‘शोटाईम’ची मुख्य समस्या आहे. शिवाय सीरिजचे केवळ चारच भाग सध्या प्रदर्शित करण्यात आले आहेत आणि यानंतरचे भाग जूनमध्ये प्रदर्शित होणार आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘गॉसिप’मध्ये कुतुहूल असणाऱ्यांना ‘शोटाईम’ हा मनोरंजनाचा चांगला पर्याय आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.