हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीबरोबरच ओटीटीसारख्या प्लॅटफाॅर्मवर अभिनेत्री सई ताम्हणकरने चांगलीच लोकप्रियता मिळविली आहे. आता तिची 'मानवत मर्डर्स' ही वेबसीरिज येत आहे. त्याबाबतीत तिच्याशी साधलेला संवाद...
मला चित्रपटसृष्टीत येऊन खूप वर्षे झाली आहेत आणि खूप समाधानी व आनंदी वाटतं मागे वळून पाहताना. कधी कधी असं पण वाटतं की स्वतःला वेळ न देता मी कामात पूर्णपणे स्वतःला झोकून दिलं आहे, पण याबाबतीत माझी काही तक्रार नाही. कारण, कामामुळेच मला इतकं यश आणि प्रेम मिळालं आहे आणि काम हे माझं पहिलं प्रेम आहे.
'मानवत मर्डर्स' ही सत्य घटनेवर आधारित वेबसीरिज आहे. भारताचे शेरलॉक होम्स म्हणून ओळखले जाणारे सीआयडीमधील प्रतिष्ठित डिटेक्टिव्ह ऑफिसर रमाकांत एस. कुलकर्णी यांची आत्मचरित्रात्मक कलाकृती 'फूटप्रिंट्स ऑन द सँड ऑफ क्राइम'वर आधारित ही वेबसीरिज आहे. सत्तरच्या दशकात भयानक हत्याकांडाने त्या वेळी अक्षरशः अख्ख्या देशाचे लक्ष वेधून घेतले होते आणि हीच घटना या सीरिजमध्ये दाखवण्यात आली आहे.
या भूमिकेसाठी मानसिकरीत्या खूप मेहनत घ्यावी लागली. ज्याप्रमाणे मानवी स्वभाव गुंतागुंतीचा असतो तसंच हे पात्र आहे. भाषेवर खूप मेहनत घ्यावी लागली. यामध्ये भाषेचा लहेजा अतिशय वेगळा होता. अशी भाषा या आधी मी कधीच बोलले नव्हते. त्यासोबतच लूकदेखील वेगळा होता. थोडक्यात सांगायचं तर सर्वार्थाने कस लागलेलं हे पात्र होतं.
माझ्याबाबतीत सांगायचं झालं तर मी कोणत्याही भूमिकेचे बारकावे टिपायचे म्हणून टिपत नाही. मी एकदा ते पात्र स्वीकारले की ते काम कसं होणारे हे मलाही माहीत नसतं. तो सीन करतेवेळी माझ्याकडून अगदी नॅचरल काम होतं. त्यामुळे मी कधीच कोणतेही काम करताना ते आपल्याला अमुक अमुक फॉरमॅटमध्ये करायचं आहे, असं ठरवून करत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की आपण एकदा ती भूमिका स्वीकारली की ती भूमिकाच आपला हात धरून आपल्याला तिच्या वाटेवर घेऊन जाते.
ही भूमिका साकारताना मला खूप आव्हानं आली. कारण, ही भाषा खूप वेगळी होती. त्यासाठी मला वेगवेगळे वर्कशॉप्स आणि सेशन करावे लागले. त्याचे रेकॉर्डिंग ऐकणं आणि हे सगळं करताना मला खूप वेळ लागला, पण मला असं वाटतं की एखादं आव्हान तुमच्यासमोर असतं तेव्हा तुम्ही त्यासाठी खूप प्रयत्नशील असता, पण मला हे सगळं करताना खूप मज्जा आली.
मला वेगवेगळ्या लोकांकडून प्रेरणा मिळत असते. आपल्या आजूबाजूला अशी खूप माणसे आहेत, ज्यांच्याकडून आपल्याला प्रेरणा मिळत असते. एक माणूस म्हणून मला पंकज त्रिपाठी यांच्याकडून प्रेरणा मिळते. त्यांची लाइफस्टाइल, त्यांची काम करण्याची आणि संवाद म्हणण्याची स्टाइल मला प्रचंड भावते, तसेच प्रियांका चोप्रा आणि आशुतोष गोवारीकर यांच्याकडूनही प्रेरणा मिळते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.