सांगली, ता. ९ : ‘‘मुस्लिमांना हक्काची अनेक राष्ट्रं आहेत. हिंदू धर्मासाठी एकच देश आहे. इथून हाकलले, तर आसरा घ्यायला आपल्याला दुसरे राष्ट्र नाही. हिंदू राष्ट्र कायम ठेवायचे असेल, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राचे नेतृत्व योगी आदित्यनाथ यांच्याकडे द्यावे,’’ असे वक्तव्य अभिनेता शरद पोंक्षे यांनी आज येथे केले. राजवाड्यातील दरबार हॉलमध्ये रात्री त्यांचे गणेशोत्सवानिमित्त व्याख्यान झाले.
श्री गणपती पंचायतन संस्थान ट्रस्टतर्फे दरबार हॉलमध्ये विजयसिंहराजे पटवर्धन यांनी सलग चौथ्या वर्षी शरद पोंक्षे यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले होते. ‘भारत ः काल आज आणि उद्या’ या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले.
‘‘भारत हे हिंदू राष्ट्र कायम ठेवायचे असेल, तर २०२७-२८ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पायउतार व्हावे, योगींना त्या खुर्चीत बसवावे. माझे भाजपमधील मित्र याठिकाणी आहेत, त्यांना वाईट वाटेल, पण ‘सब का साथ सब का विकास’ याने आता मला मळमळायला लागले आहे.’’ याचवेळी सुरवातीला, ब्रिटिशांनी आपली ज्ञानभाषा संस्कृत संपवली, त्याऐवजी इंग्रजी माथी मारली. हे मान्य नसणारा पंतप्रधान २०१४ मध्ये मिळाल्याचे गौरवोद्गारदेखील त्यांनी काढले.