'धर्मवीर' चित्रपटाची लोकप्रियता बघता 'धर्मवीर २' चित्रपटाची देखील प्रचंड उत्सुकता आहे.यातच या चित्रपटातील एका गाण्यामुळे विद्यार्थ्यांची गणित विषयीची भिती देखील निघून जाणार आहे. नुकताच या चित्रपटाचा संगीत अनावरण सोहळा सुप्रसिध्द ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांच्या हस्ते संपन्न झाला.या कार्यक्रमासोबतच दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना आनंद माझा या पुरस्काराने गौरवण्यात आले. शिवाय यावेळी गुरु पोर्णिमा आणि आषाढी एकादशीच्या निमित्ताने तब्बल ४५ बालकलाकारांनी मिळून धर्मवीर चित्रपटातील गुरुपौर्णिमा गाणं गाऊन उपस्थितांची मनं जिंकली.
धर्मवीर आनंद दिघे यांना लहान मुलांची प्रचंड आवड होती. त्यांच्या शिक्षणासाठी ते झटायचे. म्हणूनच त्यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी सराव परीक्षा देखील सुरू केल्या होत्या. याविषयी देखील धर्मवीर २ भागात दाखवण्यात येणार आहे. या प्रसंगावर चित्रीत खास गाणं देखील नुकतच प्रदर्शित करण्यात आलय. 'चला करुया तयारी' असे या गाण्याचे बोल असून गणित विषयाला हे गाणं सोपं करुन सांगतं. विद्यार्थ्यांसाठी गणित हा विषय सोपा करुन देण्यासाठी हे गाणं प्रेरणादायी ठरावं असा या गाण्यामागचा प्रयत्न आहे. या गाण्याच्या लाँच निमित्ताने इयत्ता दहावी परीक्षेतील उत्तम गुण मिळविलेल्या आणि गणित विषयात उत्तम गुण पटकावलेल्या विद्यार्थ्यांचा 'आनंद माझा' हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी उपस्थित ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांनी देखील आनंद दिघे यांच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणतात की, "दिघे साहेबांना मी जवळून भेटलो आहे. त्यांच्याकडे पाहिल्यावर भीती वाटायची पण मनातून एकदम निर्मळ होते. हा चित्रपट ९८ आठवडे चालावा अशा मी शुभेच्छा देतो."
'धर्मवीर २'या चित्रपटाची निर्मिती साहील मोशन आर्ट्सचे मंगेश जीवन देसाई आणि झी स्टुडिओजचे उमेश कुमार बन्सल यांनी केली आहे. लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण तरडे यांनी निभावली असून महेश लिमये यांनी छायांकन केलय. काही दिवसांपूर्वीच लाँच करण्यात आलेल्या चित्रपटाच्या टीजरला प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळाला आहे. धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाची गाणी अल्पावधीतच प्रचंड गाजली होती. त्यामुळे दुसऱ्या भागातील गाणी, कथा आणि बऱ्याच गोष्टींबद्दल प्रेक्षक उत्सुक आहेत.
'धर्मवीर २' या चित्रपटात एकूण चार गाणी आहेत. गीतकार मंगेश कांगणे, स्नेहल तरडे , डॉक्टर प्रसाद बिवरे, विश्वजीत जोशी यांनी लिहिलेल्या गीतांना अविनाश - विश्वजीत आणि चिनार-महेश यांचे सुमधुर संगीत लाभले आहे. शिवाय याचित्रपटातील विविध गाणी ही सुप्रसिद्ध गायक हरिहरन, जावेद अली, सुखविंदर सिंग,विशाल दादलानी, आदर्श शिंदे, मनीष राजगिरे,गायिका बेला शेंडे यांच्या आवाजात मराठी आणि हिंदी भाषेत स्वरबद्ध करण्यात आली आहेत. येत्या ९ ऑगस्ट रोजी हा चित्रपट हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.