Rajkumar Rao And Shraddha Kapoor Movie Stree 2: जेव्हा एखाद्या चित्रपटाचा पहिला भाग यशस्वी होतो तेव्हा दुसऱ्या भागाबाबत प्रेक्षकांना मोठी अपेक्षा असते. दुसऱ्या भागामध्ये त्यापेक्षा अधिक काही तरी चांगले पाहायला मिळेल अशी त्यांची अपेक्षा असते. स्त्री २ हा चित्रपट पाहिल्यानंतर आपल्या सगळ्या अपेक्षा निश्चितच पूर्ण होतात. कथानकाची उत्तम मांडणी, त्याला हाॅरर आणि काॅमेडीचा दिलेला उत्तम डोस, कलाकारांनी आपल्या सहजसुंदर अभिनयाने त्या कथेला दिलेला वेगळा साज, दमदार पार्श्वसंगीत, गमतीशीर आणि खुसखुशीत संवाद व त्याला साजेसे सुरेल संगीत अशा बहुधा सगळ्याच बाबी या चित्रपटामध्ये उत्तम जुळून आलेल्या आहेत. त्यामुळे चित्रपट मनोरंजन करणारा, मनामध्ये अधेमधे भय निर्माण करणारा आणि मजेशीर झाला आहे.
हाॅररबरोबरच विनोदाची उत्तम सांगड घालण्यात निर्माते दिनेश विजान, दिग्दर्शक अमर कौशिक आणि लेखक निरेन भट यशस्वी ठरले आहेत. त्यांनी या कथेमध्ये मनोरंजनाचा मसाला भरताना भय व थरार यांचा सुरेख मेळ साधला आहे. विशेष बाब म्हणजे आज शहरातील महिला आधुनिक असल्या तरी गावातील महिलांची नेमकी काय स्थिती काय आहे..पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये त्या किती आधुनिक झाल्या आहेत..अशा काही बाबींवर या कथेमध्ये जाता जाता भाष्य करण्यात आले आहे. या चित्रपटाची कथा मध्य प्रदेशातील चंदेरी या गावात घडणारी आहे.
पहिला भाग जेथे संपला त्याच चंदेरी गावामध्ये दुसऱ्या भागाची सुरुवात होते. या भागाची सुरुवात रुद्र भैयाला (पंकज त्रिपाठी) एक येणाऱ्या पत्रापासून होते. ते पत्र म्हणजे चंदेरी गावावर एक मोठे संकट येणार आहे याचे संकेत देणारे असते. त्या पत्रामध्ये गुप्त संदेशाप्रमाणे इशारा दिलेला असतो. मग ते पत्र कुणी पाठविले असावे यावर रुद्र भैया आणि विकी (राजकुमार राव) विचार करीत असतात. तोच दुसरीकडे गावातील एकेक मुली गायब होत असतात. सरकटा नावाचा देहापासून मुंडके वेगळे असलेला राक्षस या गावातील मुलींना आपल्या ताब्यात हळूहळू घेत असतो. साहजिकच गावामध्ये एक प्रकारची दहशत निर्माण होते.
या संकटातून गावाला मुक्त करण्यासाठी रुद्र आणि विकी यांच्याबरोबरच त्यांचे मित्र बिट्टू (अपारशक्ती खुराना) तसेच जना (अभिषेक बॅनर्जी) प्रयत्न करीत असतात. मग त्यांच्या मदतीला ती अर्थात स्त्री (श्रद्धा कपूर) येते. मग ते सरकटाचा सामना कसा करतात...त्याच्या संकटातून चंदेरी गावाला मुक्त करतात का..या सगळ्या प्रश्नांची उत्तरे या चित्रपटात आहेत. दिग्दर्शक अमर कौशिकने या कथेची मांडणी पडद्यावर सुरेख केली आहे. त्यामुळे प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन होते. निर्माते दिनेश विजान, दिग्दर्शक अमर कौशिक आणि लेखक नीरेन भट यांनी हाॅरर व काॅमेडीचा डबल डोस देण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यांच्या प्रयत्नाला कलाकारांच्या दमदार आणि सकस अभिनयाची उत्तम साथ लाभली आहे.
राजकुमार राव, श्रद्धा कपूर, पंकज त्रिपाठी, अपारशक्ती खुराना, अभिषेक बॅनर्जी यांनी या चित्रपटामध्ये धमाल केली आहे. त्यांची पडद्यावरील केमिस्ट्री छान जमलेली आहे. त्यांच्या विनोदाचे टायमिंग अफलातून आहे. विशेष बाब म्हणजे अभिषेक बॅनर्जीने जनाच्या भूमिकेत छान कामगिरी केली आहे. आतापर्यंत त्याच्या आलेल्या चित्रपटांपैकी त्याची ही उत्तम कामगिरी आहे असे म्हणायला हरकत नाही. श्रद्धा कपूरनेदेखील भूमिकेतील बारकावे छान टिपलेले आहेत. पंकज त्रिपाठी हा कलाकार नेहमीच आपल्या भूमिका उत्तम करीत असतो. भूमिका संवेदशनशील असो की विनोदी तसेच छोटी वा मोठी. प्रत्येक भूमिकेत तो भाव खाऊन जातो. या चित्रपटातील रुद्रची भूमिका त्यांनी आपल्या शैलीत साकारली आहे.
राजकुमार रावने हिंदी चित्रपटसृष्टीत चांगलेच बस्तान बसविलेले आहे. त्यांच्या सर्वोत्तम चित्रपटापैकी एक म्हणजे स्त्री या चित्रपटाची फ्रंच्याईजी आहे. अपाऱशक्ती खुराना दिवसेंदिवस आपल्या अभिनयात सुधारणा करीत आहे. हे या चित्रपटातील भूमिकेतून सिद्ध होते. या चित्रपटात अक्षय कुमारचा एक सरप्राईज कॅमिओ आहे. त्याला अचानक पडद्यावर पाहणे हा एक अद्भुत अनुभव आहे. तसेच वरुण धवन भेडिया बनून सरकटाचा सामना करताना दिसतो. तमन्ना भाटियाची छोटीशी एन्ट्री दिलखुलास आहे. संगीतकार सचिन जिगर यांच्या संगीताचे सूर छान जमून आलेले आहेत. या चित्रपटाला उत्तम पार्श्वसंगीताची जोड लाभलेली आहे. त्यामुळे चित्रपटात वेगळाच थरार निर्माण झाल आहे. सिनेमॅटोग्राफी उत्तम झालेली आहे. चित्रपटाचा पूर्वार्ध खुसखुशीत आणि चुरचुरीत आहे. मात्र चित्रपटाचा क्लायमॅक्स नको तितका ताणण्यात आला आहे. तो खूप पसरट आणि विखुरलेला झाला आहे. त्यामुळे काहीशी पदरी निराशा येते. परंतु एकूणच हाॅरर आणि काॅमेडीची भट्टी उत्तम जुळून आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.