Rakshabandhan: नारळी भाताचा बेत ते सात भावंडांमध्ये रंगणारी चढाओढ; कलाकारांनी सांगितल्या रक्षाबंधनाच्या आठवणी

Celebrity Rakshabandhan 2024 Special: आज रक्षाबंधनाच्या निमित्ताने कलाकारांनी त्यांच्या बालपणापासूनचा सणाच्या आठवणी सांगितल्या आहेत.
rakshabandhan 2024
rakshabandhan 2024esakal
Updated on

रक्षाबंधन हा प्रत्येक बहीणभावाच्या आयुष्यातील खास सण. बहीण-भावाच्या नात्यात दरवर्षी एकापेक्षा अनेक आठवणींची भर घालणारा हा दिवस. मग यामध्ये आपले लाडके सेलिब्रिटी मागे कसे राहतील. शूटिंग आणि बिझी शेड्युलमधून वेळ काढून राखीपौर्णिमेच्या दिवशी हे सेलिब्रिटी हा सण कसा साजरा करतात, जाणून घेऊया त्यांच्या सेलिब्रेशनबद्दल...

सुरभी हांडे

रक्षाबंधन हा सण खरं तर प्रत्येक भावा-बहिणीच्या नात्याचा सण आहे. जिथे एक बहीण आपल्या भावाच्या हातावर राखी बांधून त्याने आपले सदैव रक्षण करावे, असे सांगते आणि तो भाऊदेखील त्याच्या बहिणीची कायम काळजी घेतो, पण मला वाटतं की एक बहीणदेखील आपल्या भावाचे रक्षण करू शकते. खरं सांगायचं तर मला भाऊ नाही. तरीपण म्हणून रक्षाबंधन किंवा भाऊबीज यासारख्या सणांना मला भाऊ नाहीये, अशी खंत मला कधीच नाही वाटली.

माझी धाकटी बहीण माझ्यासाठी खूप खास आहे. आम्ही दोघी एकमेकींना राखी बांधतो आणि सेलिब्रेशन करतो, तर मी त्या सगळ्या बहिणींना ज्यांना भाऊ नाहीये त्यांना सांगू इच्छिते की, भाऊ नाही म्हणून कधीच मनाला खंत करून घेऊ नका. तुमची बहीण मग ती लहान असो किंवा तुमच्यापेक्षा मोठी असो. तीदेखील वाईट प्रसंगी तुमचं संरक्षण करू शकते. तीदेखील तुम्हाला सांभाळू शकते आणि या खास नात्याचा दिवस म्हणजे रक्षाबंधन.

प्रथमेश परब

मला सख्खी बहीण नाही, पण माझ्या बालपणीच्या चाळीतील बहिणी आजही मला राखी बांधायला येतात. त्या बहिणींची आता लग्नं झाली आहेत आणि त्या मैत्रिणी अजूनही मला राखी बांधतात. नुकतेच माझे लग्न झाले असल्यामुळे त्यांची परत भेट झाली. एरवी फक्त रंक्षाबंधन आणि भाऊबीजेला भेट व्हायची.

तसेच आपल्या इंडस्ट्रीमधील परी तेलंगसुद्धा मला दरवर्षी न चुकता राखी बांधते. साधारणपणे रक्षाबंधनाला बहीण भावाकडे जाते, पण मी परीकडे जातो राखीसाठी. नुकतंच माझं लग्न झालंय. त्यामुळे यावेळी बहिणींना डबल गिफ्ट द्यावं लागणार आहे. आमची आईच आम्हाला राखी बांधायची. कधी कधी असं व्हायचं की, राखी बांधायला कुणी नसायचं, तेव्हा आम्ही चाळीतील बहिणी जमवायचो.

तन्वी मुंडले

गेल्या वर्षीच माझ्या बाबांचे निधन झाले. त्यानंतर माझ्या दादाने बाबांची जागा घेतली. असं म्हणतात की, आपल्या वडिलांनंतर जर त्या मायेने कोणी आपली काळजी घेणारा कोणी असेल, तर तो आपला भाऊच असतो आणि माझं आणि माझ्या दादाचं नातं खूप गोड आहे. मी एक किस्सा सांगेन, ज्या वेळी माझी पहिली मालिका चालू होती, त्या वेळी मी दादाच्या घरी राहायचे.

मग तेव्हा तोदेखील माझ्यासाठी सकाळी लवकर उठायचा आणि गिझर वगैरे लावून ठेवायचा. जेणेकरून मला १५ मिनिटांची एक्स्ट्रा झोप मिळावी. कारण, त्या वेळी माझे १५-१६ तास सेटवरच जायचे. मग तो असं काय काय करून माझं काम हलकं करायचा. आतासुद्धा माझी मालिका संपली आहे, तर तो स्वतःहून मला विचारतो, की तनु तुला काही लागलं तर मला सांग. तो नेहमी माझ्यासाठी आहे आणि रक्षाबंधन सण तर भावा-बहिणीच्या नात्याचे प्रतीक आहे.

गौरव घाटणेकर

मला सख्खी बहीण तर नाही, परंतु माझ्या काकांची मुलगी म्हणजे माझी चुलत बहीण मला सख्ख्या बहिणीपेक्षा कमी नाही. आमच्या सगळ्या भावंडांमध्ये आम्ही पाच भाऊ आणि ती एकटी आमची लाडकी बहीण आहे. रक्षाबंधन सण तर आमचा आवडीचा सण आहे. यामागचं मोठं कारण असं की, बाकी जे काही घरगुती कार्यक्रम असतात त्यात तर आमच्याकडे जेवणासाठी कॅटरर्स असतात, पण रक्षाबंधनासाठी मात्र घरगुती साग्रसंगीत जेवण बनवतात.

तो लहानपणापासून आमचा फिक्स मेन्यू असतो. नारळी भात, मटकीची उसळ, बटाट्याची भाजी, वरण भात, असं जेवण असतं त्या दिवशी. रक्षाबंधनाला आम्ही पाचही भाऊ आमच्या काकांच्या घरी जातो. बऱ्याचदा कामांमुळे आम्हाला मागेपुढे जावं लागतं. म्हणून मग कधी कधी रात्री उशिरादेखील मी गेलोय तिच्याकडे फक्त राखी बांधून घेण्यासाठी.

भूषण प्रधान

दरवर्षी या सणासाठी खूप उत्साह असतो. आम्ही सात भावंडं आहोत. कुणी आतेभाऊ-बहीण तर कुणी मामेभाऊ-बहीण, पण आम्ही सातही भावंडं सख्ख्या भावंडांसारखी आहोत. दोन भाऊ आणि पाच बहिणी मिळून आम्ही सात भावंडं आहोत. गेल्या दोन वर्षांत आम्ही सगळे वेगवेगळे झालोय. कुणी कॅनडाला शिफ्ट झालंय, तर कुणी पुण्यात असतं.

या वेळी मोठा विकेण्ड असल्यामुळे आम्ही पुन्हा एकदा धमाल करून हा सण साजरा करणार आहोत. आपण भाऊ या नात्याने बहिणींना सांगतो की, "मी तुमचं रक्षण करीन." पण माझ्या बहिणीसुद्धा स्ट्राँग आहेत. म्हणून कधी कधी वाटतं की, राखी मी बांधून घेतोय, मात्र त्याच माझं रक्षण करताहेत. तीच आमची ताकद आहे, असं मला वाटतं. मित्रपरिवार खूप गरजेचा असतो, पण मला ती गरज कधी भासली नाही.

अभिनय बेर्डे

मी दरवर्षी खूप उत्सुक असतो, कारण आम्हाला एकच बहीण आहे आणि आम्ही भावंडं खूप जास्त आहोत. माझ्या काकांना सर्व मुलगेच आहेत. त्यामुळे खूप मज्जा असते. रक्षाबंधन असो किंवा भाऊबीज, आम्ही ते नेहमीच मोठ्या उत्साहाने साजरे करतो. आम्ही सर्वजण एकाच ठिकाणी जमतो. गमती-जमती होतात आणि एकत्र जेवतो.

हल्ली प्रत्येक जण आपापल्या कामात व्यस्त असतो, पण हाच दिवस असतो जो प्रत्येकाला एकत्र आणतो. आम्ही सगळे मिळून स्वानंदीला खूप त्रास देतो. लहानपणी तिला रक्षाबंधन साजरे करण्यासाठी आवडत नसे, कारण इतक्या भावंडांचे एकत्र औक्षण करणे तिला जमत नसायचे. आम्ही दरवर्षी काही ना काही स्पेशल गिफ्ट तिला देतो. अशा काही आठवणी आहेत आणि मला तर हा सण खूप जास्त आवडतो.

rakshabandhan 2024
Divya Bharti: तिचा मृत्यू झाला तेव्हा... दिव्या भारतीसोबत 'ते' शेवटचं बोलणं; अभिनेत्री सोनम खानने सांगितली आठवण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.