Parking : वाहन पार्किंग करण्याच्या जागेवरून शेजाऱ्यांमध्ये येणारे वितुष्ट ‘पार्किंग’ या तमिळ चित्रपटातून दाखवण्यात आले आहे. सामायिक पार्किंगवरून दोन कुटुंबांमध्ये उडणारे खटके, एकमेकांवर मात करण्यासाठी केली जाणारी खटाटोप हे सारे चित्रपटात पाहायला मिळते.
तुम्ही कदाचित ‘रोड रेज’ प्रकारातील चित्रपट पाहिले असतील. ज्यात आयुष्यातील सगळा वैताग गाडीच्या ॲक्सेलरेटरवर आणि आपल्या गाडीसमोर येणाऱ्या इतर लोकांवर काढला जातो. जगभरात या प्रकारचे अनेक लघुपट आणि चित्रपट निर्माण झालेले आहेत.
स्टीव्हन स्पीलबर्गचा ‘ड्यूएल’ (१९७१), रॉजर मिचेलचा ‘चेंजिंग लेन्स’ (२००२) आणि त्यावर बेतलेला हिंदी चित्रपट ‘टॅक्सी नं. ९२११’ (२००६) असे काही चित्रपट लगेच आठवतात. ‘वाइल्ड टेल्स’ (२०१४) या अर्जेंटेनियन अँथॉलोजी चित्रपटातील पहिला लघुपट आठवतो.
गेल्या वर्षी आलेली ‘बीफ’ ही मालिका आठवते. ‘पार्किंग’ म्हटले तर याहून वेगळा आहे. म्हटलं तर, या इतर कलाकृतींसारखा आहे. रामकुमार बालकृष्णन दिग्दर्शित ‘पार्किंग’ या तमिळ चित्रपटाचे वेगळेपण म्हणजे हा रोड रेजवर नव्हे तर पार्किंगच्या जागेवरून होणाऱ्या चिडचिडीवर आणि वादावर बेतलेला आहे.
तरीही हा चित्रपट आणि वर उल्लेखलेल्या कलाकृतींमध्ये बरीच साम्यस्थळे आहेत. पुरुषी वर्चस्ववादी मानसिकता व अहंकार आणि भारतीय संस्कृती या दोन मुख्य संकल्पना इथल्या वादाला कारणीभूत आहेत.
भारतीय जगण्यात खोलवर रुतलेली संकल्पना म्हणजे वरवर शेजाऱ्याशी आपुलकीने बोलायचे, पण आतून त्याविषयी ईर्ष्या बाळगायची आणि द्वेष करायचा. ‘पार्किंग’मधील मध्यवर्ती व सहकारी व्यक्तिरेखा, विशेषतः पुरुष या गोष्टींनी ग्रासलेले आहेत.
आयटी क्षेत्रात काम करणारा ईश्वर (हरिष कल्याण) आणि त्याची गरोदर बायको एका नवीन घरात शिफ्ट होण्यापासून चित्रपटाची सुरुवात होते. या घरात खालच्या मजल्यावर एका वयस्कर सरकारी अधिकाऱ्याचे (एम. एस. भास्कर) त्रिकोणी कुटुंब राहत असते.
या दोन्ही कुटुंबांमध्ये फक्त एकच सामायिक पार्किंग व्यवस्था असते, ज्यावरूनच सगळा आटापिटा पुढे घडतो. यात जागा ही फक्त रूपकात्मक पद्धतीने कारणीभूत ठरते, असे मानता येईल.
खरी कथा ईर्ष्या, द्वेष आणि पुरुषी अहंकार दुखावला जाणे यांमध्ये दडलेली आहे. समोरच्याला कशी मात देता येईल, त्याने कार विकत घेतली म्हणून मीही कार घेऊन दाखवणार, अशा बालीश तर्कटातून मध्यवर्ती पात्रांच्या आयुष्यात सगळ्या अडचणी उभ्या राहतात.
एखाद्या छोटेखानी संकल्पनेला घेऊन पूर्ण लांबीचा चित्रपट कसा केला जाऊ शकतो, याचे एक चांगले उदाहरण म्हणजे ‘पार्किंग’.
चित्रपट, त्यातील कथाबीजाचा विचार करता काहीसा पसरट वाटत असला किंवा शेवटाकडील भाग अंमळ क्षोभनाट्य असला तरी एकूण चित्रपट रंजक आहे. शिवाय, मुख्य व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेत्यांची कामगिरी आणि तांत्रिक बाजूंचा सफाईदारपणा यासाठी ‘पार्किंग’ एकदा पाहावासा नक्कीच वाटतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.