Vijay Chavan: "त्यांच्या पार्थिवाला अग्नी देताना ढसाढसा रडलो", विजय चव्हाण यांच्या आठवणीत मुलगा वरद झाला भावूक

Vijay Chavan: नुकतीच विजय चव्हाण यांच्या कुटूंबाने सुलेखा तळवलकर यांच्या स्मृतिचित्रे या कार्यक्रमासाठी हजेरी लावली. यावेळी त्यांचा मुलगा वरद आणि पत्नी विभावरी यांनी विजय चव्हाण यांच्या भावनिक आठवणी शेअर केल्या.
विजय चव्हाण यांच्या आठवणीत मुलगा वरद झाला भावूक
Vijay Chavanesakal
Updated on

Vijay Chavan: मराठी इंडस्ट्रीतील ज्येष्ठ दिवंगत अभिनेते विजय चव्हाण (Vijay Chavan) यांचं सिनेइंडस्ट्रीतील योगदान अभूतपूर्व आहे. मराठी नाटक, सिनेमांमध्ये विजय यांनी साकारलेल्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. नुकतीच विजय चव्हाण यांच्या कुटूंबाने सुलेखा तळवलकर यांच्या स्मृतिचित्रे या कार्यक्रमासाठी हजेरी लावली. यावेळी त्यांचा मुलगा वरद आणि पत्नी विभावरी यांनी विजय चव्हाण यांच्या भावनिक आठवणी शेअर केल्या.

वरद म्हणाला, "बाबा कधीच घड्याळ आणि फोन वापरायचे नाहीत."

विजय चव्हाण यांचं 24 ऑगस्ट 2018 ला निधन झालं. त्यांच्या आठवणी सांगताना त्यांचा मुलगा आणि अभिनेता वरद आणि पत्नी विभावरी भावूक झाले. "बाबा कधीच घड्याळ आणि फोन वापरायचे नाहीत. त्यांच्याकडे कधीच मोबाईल नव्हता. त्यामुळे त्यांचे सगळे व्यवहार आई सांभाळायची. तीच निर्मात्यांशी बोलायची. तीच बाकी सगळे व्यवहार मॅनेज करायची. बाबा वेळेच्या बाबतीत काटेकोर होते पण तरीही त्यांनी कधी घड्याळ वापरलं नाही. ड्राइव्ह करताना किंवा कुठे बाहेर जाताना ते कधीच घड्याळ घालून गेले नाहीत. पण ते सगळ्या ठिकाणी वेळेच्या आधी पोचायचे." अशी आठवण वरदने सांगितली.

विजय यांच्या शेवटच्या काळातील आठवणीही विभावरी यांनी यावेळी सांगितल्या आणि त्यांची सून प्रज्ञा हिच्याविषयी सांगितलं. त्या म्हणाल्या,"विजय यांची 2010 सालापासून प्रकृती खालावत गेली पण २०१६ साली त्यांची प्रकृती खूपच गंभीर झाली. त्यावेळी आम्ही वरदसाठी मुलगी शोधायला सुरुवात केली. पण वरदकडे जेव्हा कधी काम नसायचं तेव्हा तो सांगायचा मुलगी बघू नकोस. आपल्याकडे काम नाही आणि तिला आपण लग्न करून आणणार हे चुकीचं आहे असं त्याचं म्हणणं होतं."

त्यावेळीच वरदने २०१६ साली विजय यांच्याविषयीचा एक प्रसंग शेअर केला. "२०१६मध्ये बाबांची प्रकृती खूप खालावली. त्यावेळी त्यावेळी मी 'रुंजी' नावाची मालिका करत होतो. त्याचं शूट जव्हारला सुरु होतं. ते जवळपास 30-40 दिवस आजारी होते आणि डॉक्टरांनी आईला सांगितलं कि ते फार फार आठ दिवस जगतील. मुलाला बोलवून घ्या. त्यावेळी मला केदार सर, भरत सर यांचे सतत फोन येत होते. मालिकेच्या निर्मात्यांनीही मला जा म्हणून सांगितलं. 'आपण शूटमध्ये काहीतरी बदल करू' असं ते म्हणाले. मी माझ्या आत्या, आईला फोन करत होतो तर त्या बाबा ठीक आहेत असं सांगायच्या. त्यावेळी व्हिडीओ कॉल वगैरे अशी पण सोया नव्हती त्यामुळे मला दाखवा, तुम्ही खोटं बोलताय असं सांगूही शकत नव्हतो. त्याचवेळी बाबा थोडे शुद्धीवर आले होते आणि ते माझ्याशी फोनवर बोलले कि,'चित्रीकरण संपवून ये.' त्यांनी असं सांगितल्यावर मी निर्मात्यांना सांगितलं मी जात नाहीये कारण बाबांना ते आवडणार नाही. मी शूटिंग संपवलं आणि जेव्हा फोर्टीसला पोहोचलो तेव्हा कळलं कि बाबांची तब्येत इतकी खालावली होती. त्यानंतर एक दिवस अचानक त्यांना शुद्ध आली. तेव्हा ते आईला म्हणाले कि,'मला वरदचं लग्न बघायचं आहे.' जो माणूस ३० दिवस काही प्रतिसाद देत नव्हता तो त्या दिवशी बाहेर पडला. तो दिवस होता आठ फेब्रुवारी. त्या दिवशी माझा आणि बाबांचा वाढदिवस असतो. तो आमच्यात योगायोग आहे. मग आम्ही मुलगी बघायला सुरुवात केली."

विजय चव्हाण
Vijay Chavan family esakal

याबाबत सांगताना तो आणि विभावरी पुढे म्हणाले कि, "मला प्रज्ञाचं स्थळ आलं. आम्ही तिचा फोटोही बघितला नव्हता. त्यांनाही जेव्हा माझ्याविषयी कळलं तेव्हा त्यांनी लगेच होकार दिला कारण तिची आई माझी १०० डेज ही मालिका पाहत होती. त्यांचं कुटूंब जेव्हा आमच्या घरी मुलुंडला आलं तेव्हा विजय यांनी अचानक प्रज्ञाला सुनबाई म्हणून हाक मारली. त्यांना जेव्हा कारण विचारलं तेव्हा ते मला तू होकार देणार हे माहित आहे असं म्हणाले. पण माझं म्हणणं होतं, सासू-सूनचं पण जुळलं पाहिजे."

त्यावर वरद म्हणाला,"बाबांनी सुनबाई म्हंटल्यानंतर एप्रिलमध्ये आमचा साखरपुडा झाला आणि डिसेंबरमध्ये लग्न ठरलं. त्या दरम्यान जुलैमध्ये प्रज्ञा भेटायला आली होती आणि तिने बाबांसाठी पोळ्या केल्या. बाबा ते जेवण जेवले आणि म्हणाले,'‘चला आता मी जायला मोकळा.’ आणि तसंच झालं. महिन्याभरात बाबा गेले. त्यांना अग्नी देताना मी खूप रडलो पण ते सगळं पार पडल्यावर तेव्हा खूप मोठं ओझं गेल्यासारखं वाटलं कारण त्यांची तब्येत खालवताना मी बघत होतो. आम्हाला ते आवडत नव्हतं. त्यांना यातून सुटू देत असं सतत वाटायचं." हे सगळं सांगताना ते दोघेही खूप भावूक झाले.

विजय चव्हाण यांच्या निधनानंतर मराठी इंडस्ट्रीत खूप मोठी पोकळी निर्माण झाली. आजही अनेक कलाकार त्यांच्या आठवणीत भारावून जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.