महाराष्ट्र ही साधू-संतांची भूमी आहे. या साधू-संतांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झालेली आहे. येथे अनेक थोर साधू-संत आणि महात्मे होऊन गेले आणि त्यांनी आपल्याला चांगली शिकवण आणि चांगलं विचार दिलेले आहेत. याच संत संप्रदायातील एक संत म्हणजे समर्थ रामदास स्वामी. त्यांच्याच जीवनावरील रघुवीर हा चित्रपट आता प्रदर्शित झाला आहे. निर्माते अभिनव विकास पाठक आणि दिग्दर्शक नीलेश कुंजीर यांनी समर्थ रामदास स्वामींचा जीवनप्रवास या चित्रपटात मांडलेला आहे. रामदास स्वामींच्या जन्मापासूनच या चित्रपटाच्या कथेला सुरुवात होते.
रामदास स्वामी यांच्या वडिलांचे नाव सूर्याजी पंत आणि आईचे नाव राणूबाई. लहान असताना त्यांचे नाव नारायण असते. त्यांच्या मोठ्या भावाचे नाव गंगाधर असते. लहान असताना नारायण चपळ, बुद्धिमान आणि खोडकर. तेव्हापासूनच ते रामभक्त. मग नारायणाचा अध्यात्माकडे असलेला ओढा.. तेव्हापासूनच ते श्रीरामाचे असलेले निस्सीम भक्त... लहान असताना त्यांचं अचानक गायब होणं... त्यांचे सवंगडी आणि आईने त्यांचा शोध घेतला असता एका बंदिस्त खोलीत ध्यानस्थ बसणं...आईने अरे नारायण हे तू काय करत आहेस..असे विचारले असता ”आई मी संपूर्ण विश्वाची चिंता करण्यात मग्न आहे. ” असं उत्तर देणं
लग्नमंडपातून शुभमंगल सावधान असे म्हणताच अचानक पलायन करणं. त्यानंतर ध्यानधारणा करणं...तरुणांना मनोपासना आणि बलोपासना यांचे धडे देणं..तरुणांना भक्तिमार्गाकडे वळविण्यासाठी... त्यांच्यामध्ये वाचनाचा व्यासंग वाढविण्यासाठी मनाचे श्लोक, दासबोध सारखा ग्रंथ लिहिणं..त्याचबरोबर सुखहर्ता दुःखहर्ता ही आरती रचणं...जय जय रघुवीर समर्थ सारखा मंत्र-नारा जपणं...छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांची भेट होणं... वगैरे एकूणच नारायण ते समर्थ रामदास स्वामी असा त्यांचा जीवनप्रवास या चित्रपटामध्ये हळूहळू उलगडण्यात आला आहे.
रामदास स्वामींनी शारीरिकदृष्टया समक्ष राहण्यासाठी बलोपासना करणं किती महत्त्वाचं आहे तसेच मनाचे सामर्थ्य वाढविण्यासाठी मनोपासना करणं किती आवश्यक आहे हे आपल्या समाजाला पटवून दिलं. दिग्दर्शक नीलेश कुंजीरने समर्थ रामदास स्वामी यांचे का्र्य आणि त्यांनी दिलेला विचार तसेच त्यांनी दिेलेला अनमोल संदेश या चित्रपटात मांडलेला आहे. या चित्रपटाची पटकथा निलेश कुंजीर आणि अभिराम भडकमकर यांनी लिहिली आहे. संवाद लेखनाची जबाबदारी अभिराम भडकमकर यांनी सांभाळली आहे.
अभिनेता विक्रम गायकवाडने समर्थाची व्यक्तिरेखा समरसून साकारली आहे. त्यांच्या देहबोलीबरोबरच अन्य बारीकसारीक गोष्टी त्याने पडद्यावर उत्तमरीत्या मांडलेल्या आहेत. अन्य कलाकारांमध्ये ऋतुजा देशमुख, नवीन प्रभाकर, शैलेश दातार, राहुल मेहेंदळे, विघ्नेश जोशी, निनाद कुलकर्णी, भूषण तेलंग, वर्षा दांदळे, मौसमी तोंडवलकर, अनुश्री फडणीस, देव निखार्गे, गणेश माने यांनीही मोलाची कामगिरी केली आहे. चित्रपटातील लोकेशन्स उत्तम आहेत आणि ती सिनेमॅटोग्राफर धनराज वाघ आणि प्रथमेश रांगोळे यांनी आपल्या कॅमेऱ्यात छान बंदिस्त केली आहेत.
चित्रपटाच्या कथेला अनुसरूनच संगीतकार अजित परबने संगीत दिले आहे. सोळाव्या शतकातील काळ या चित्रपटामध्ये मांडण्यात आला आहे. मात्र हा चित्रपट एखाद्या माहितीपटाप्रमाणे वाटतो. त्यामुळे चित्रपट पाहताना आपण केवळ एक माहिती जाणून घेत आहोत की काय असेच वाटते. तरीही एकूणच हा चित्रपट म्हणजे रामदास स्वामी यांनी समाजाला दिलेला विचार आणि त्यांचे कार्य सांगणारा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.