Sector 36 Movie Review: मनाचा थरकाप उडवणारा 'सेक्टर ३६'; विक्रांत मेस्सीचा व्हिलन हिट की फ्लॉप?

Sector 36 Movie Review: हा चित्रपट निठारी हत्याकांडावर आधारित असल्याचे बोलले जात आहे.
sector 36
sector 36 esakal
Updated on

अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर यांची प्रमुख भूमिका असलेला 'स्त्री २' हा चित्रपट चांगलाच यशस्वी ठरला. निर्माते दिनेश विजन यांच्या मॅडॉक फिल्मसच्या बॅनरखाली बनलेल्या या चित्रपटाने घवघवीत यश मिळविले. आता त्यांचेच बॅनर आणि जिओ स्टुडिओतर्फे 'सेक्टर ३६' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटामध्ये विक्रांत मेस्सी आणि दीपक डोब्रियाल यांची मुख्य भूमिका आहे. हा चित्रपट निठारी हत्याकांडावर आधारित असल्याचे बोलले जात आहे.

नोएडा येथे २००६ मध्ये ही घटना घडलेली होती. नोएडाच्या निठारी गावातील या घटनेने संपूर्ण देश हादरला होता. त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर या चित्रपटाची कथा आहे. या चित्रपटामध्ये विक्रांत मेस्सीने एका सीरीयल किलरची भूमिका साकारली आहे तर दीपक डोब्रियाल पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. प्रेम सिंग (विक्रांत मेस्सी) हा एकापाठोपाठ एक मुलांचे अपहरण करीत असतो आणि त्यांची हत्या करतो. मुले गायब होत असल्यामुळे त्यांचे पालक आणि एकूणच सगळी मंडळी चिंताग्रस्त असतात. मग पालक पोलिस ठाण्यामध्ये तक्रार करण्यासाठी जातात. पोलिस अधिकारी रामचरण पांडे (दीपक डोब्रियाल) ही बाब फारशा गांभीर्याने घेत नाही.

ही मुले गावातून पळून गेली असावीत असे त्याला वाटते आणि तो तक्रार करण्यासाठी आलेल्या पालकांना तेच सांगण्याचा प्रयत्न करतो. परंतु एके दिवशी अचानक त्याचीच मुलगी गायब होते आणि चित्रपटाच्या कथेला नवीन वळण मिळते. त्यानंतर रामचरण पांडे या घटनेकडे गांभीर्याने पाहू लागतो. एकामागोमाग एक धक्कादायक प्रकार समोर येतात. प्रेम सिंगचा बॉस बस्सी (आकाश खुराना) यांचेही नाव या प्रकरणाशी जोडले जाते. मग रामचरण पांडे या प्रकरणाचे गुढ उकलण्याचा प्रयत्न करतो. त्यामध्ये त्याला अनेक संकटे आणि अडथळे येतात. बस्सी आणि प्रेम सिंग यांची सखोल चौकशी रामचरण करतात आणि मग पुढे नेमक्या काय आणि कशा घटना घडतात, ही कथा कशा प्रकारे वळण घेते याकरिता हा चित्रपट पाहावा लागेल.

दिग्दर्शक आदित्य निंबाळकरने एक संवेदनशील आणि मन हेलावणारा विषय अत्यंत गंभीरपणे मांडला आहे. दिग्दर्शक म्हणून त्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे. आपल्या व्यवस्थेमध्ये असणाऱ्या त्रुटी तसेच गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दरी वगैरे बाबी अत्यंत प्रभावीपणे त्याने मांडल्या आहेत. विक्रांत मेस्सी, दीपक डोब्रियाल, आकाश खुराना, दर्शन जरीवाला, बहारुल इस्लाम आणि इपशिता चक्रवर्ती सिंग आदी कलाकारांनी आपापली कामगिरी चोख केली आहे. सध्या विक्रांत मेस्सीच्या चारों उगलियां घीमध्ये आहेत. त्याचा 'ट्वेल्थ फेल' हा चित्रपट चांगलाच यशस्वी झाला.

या चित्रपटातील त्याच्या भूमिकेसाठी त्याला अनेक पुरस्कार मिळाले. त्यापाठोपाठ त्याचा 'फिर आयी हसीना दिलरूबा' हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आणि त्यालाही उत्तम प्रतिसाद मिळाला. आता त्याचा हा नवीन चित्रपट प्रदर्शित झाला आहे आणि त्याने प्रथमच प्रेम सिंग ही नकारात्मक भूमिका साकारली आहे. या प्रेम सिंगची मानसिकता, त्याचा विचित्र स्वभाव, त्याचा बेडरपणा वगैरे या भूमिकेतील बारकावे त्याने पडद्यावर छान मांडलेले आहेत. दीपक डोब्रियालनेदेखील छान अभिनय केला आहे. सुरुवातीला समंजस आणि सामान्य असणारा पोलिस अधिकारी नंतर कशा प्रकारे खंबीर आणि गंभीर होतो हे त्या भूमिकेचे बेअरिंग त्याने उत्तम पकडले आहे.

चित्रपटाचे संगीत आणि पार्श्वसंगीत दमदार झाले आहे. एका क्राईम थ्रिलरला आवश्यक असणारे असे पार्श्वसंगीत झाले आहे. चित्रपटामध्ये काही त्रुटी आहेत. विशेष बाब म्हणजे चित्रपटातील काही दृश्ये अंगावर येणारी आहेत. तसेच उत्तरार्धात चित्रपटाची गती काहीशी संथ झाली आहे. तरीही एक संवेदनशील आणि गंभीर विषयावर भाष्य करणारा असा हा चित्रपट आहे. शेवटपर्यंत तो आपल्याला खिळवून ठेवतो आणि मनाचा थरकाप उडवितो.

sector 36
नाटक करताना अचानक तब्येत खालावली... अभिनेता अतुल तोडणकरला ब्रेन हॅमरेज, पोस्ट करत सांगितलं काय घडलं

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.