- रसिका आगाशे
संस्कृती सांगते, लग्न झाल्याशिवाय सेक्स करायचा नाही. लग्न हे असंख्य सामाजिक मापदंड पूर्ण केल्याखेरीज होऊ शकत नाही. अशावेळी स्त्री असो वा पुरुष स्वतःच स्वतःला तृप्त करून घेतात. यात अनेकांना ऑरगॅझमसाठी दृक्श्राव्य माध्यमाची गरज भासते. जर ही एक सामाजिक गरज आहे तर यात काम करणाऱ्या विशेषतः स्त्रियांकडे वाईट नजरेने का बघितलं जातं?
अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्राला पॉर्नोग्राफी प्रकरणात अलीकडेच अटक केल्यानंतर ‘पॉर्न’ या विषयावर वातावरण तापलेले आहे. पॉर्न बघितलेले सर्व पुरुष, हे कसं वाईट आहे, असं म्हणताहेत. पॉर्न बघितलेल्या स्त्रिया शक्यतो मत द्यायला लागू नये, अशा जागी लपत आहेत. ज्यांना पॉर्न म्हणजे काय ते माहितीच नाही अशा अनेकांसाठी ही बातमी महत्त्वाचीच नाही.
सनी लियोनीसारखी एक पॉर्नस्टार आपल्या देशात येऊन बॉलिवूडमध्ये स्थिरस्थावर होते. तिने मूल दत्तक घ्यावं किंवा नाही यावर इंटरनेटवर मत प्रकट करणारे, तिचे व्हिडीओ शोधत असतातच ना? पॉर्न फिल्ममध्ये काम करणं हा एक व्यवसाय आहे आणि या व्यतिरिक्त त्यांचं जग आहे, हे मान्यच होत नाही. कारण स्त्री म्हणजे फक्त तिचे शरीर ना? त्याचा व्यापार मांडला की तिच्यात व्यक्ती म्हणून काही उरत नाही. यामुळे पॉर्न व्यवसाय करणारे स्त्री-पुरुष, त्यात काम करणारे कलाकार (यांना कशाला कलाकार म्हणायचं, हा पहिला सूर असेल; पण त्यांना बघून मनोरंजन होतं ना?) यांचे प्रश्न समजून घेता येतील का, असा एक प्रयत्न आहे. भारतात पॉर्न बघणाऱ्यांची वाढती संख्या हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे.
मध्यंतरी काही मुलाखती करताना लक्षात आलं, की सध्याच्या काळात पॉर्न बघण्याचा वयोगट साधारण १२ ते १३ वर्षांपासून सुरू होतो. यात हातात स्मार्ट फोन आलेत, हे कारण आहेच. त्याआधी चावट माहिती देणारी, कथा सांगणारी मासिकं, नियतकालिकं होतीच. म्हणजे लैंगिक गोष्टी, वाचून, बघून, ऐकून, स्वतःला (वैयक्तिकरीत्या) लैंगिक सुख प्राप्त करण्याचे मार्ग कायमच मोकळे होते. आता यात गैर काय आहे? एका वयात मुलांना आणि मुलींना लैंगिक कुतुहूल असणार आहे आणि त्यांना समजावून सांगण्याची पद्धत साधारणतः कुटुंब व्यवस्थेमध्ये नसणार, त्यामुळे येनकेन मार्गे सेक्स कसा करायचा, हेही तरुण मंडळी शोधून काढणारच.
मूळात सेक्स का करायचा, याबाबत आजही आपला समाज तसा निरक्षरच आहे. लैंगिक सुख फक्त मुलं जन्माला घालण्यासाठी नसतं तर अन्नाच्या भुकेसारखी ही शरीराची भूक असते, याबद्दल आपल्याकडे कायम मौन पाळण्यात येतं. सतत कंन्ट्रोल ठेवण्याचा बाऊ केला जातो. जितकं जोरात सत्य दाबणार तितक्या जोरात विविध मार्गातून ते बाहेर येणारच. त्यात पुरुषसत्ता. यामुळे लैंगिक संबंधांमध्ये स्त्री ही बरोबरीची पार्टनर नसून पुरुषांना सुख मिळावं म्हणून अस्तित्वात असलेलं ते एक उपभोगासाठीचं शरीर आहे, असं काहीसं एक चित्र आहे. मग देहाचा फक्त बाजार मांडला जातो.
स्त्री देहाचा बाजार हा सनातन काळापासूनच मांडण्यात आला आहे. सुरुवातीला त्याचं स्वरूप वेश्याव्यसायाइतकंच मर्यादित होतं. बदलत्या काळात ते सर्वच पातळ्यांवर बदलत गेलं. पोर्न ही त्याचीच एक पायरी. मला पोर्न आणि वेश्या व्यवसाय या दोन्हीबद्दल कोणीही काही विचारलं की पहिली गोष्ट मनात येते ती म्हणजे, याला व्यवसाय म्हणून कायदेशीर मान्यता द्या. अनेकांना हे विधान फक्त प्रसिद्धीसाठी केलेला स्टंट वाटेल, म्हणूनच त्याची उकल करणं गरजेचं आहे. व्यवसाय म्हणून बेकायदेशीररीत्या हे शतकानुशतके चालू आहे आणि त्यामुळेच पिळवणूकही चालू आहे. कायदेशीर पाठबळ मिळालं तर या व्यवसायात काम करणाऱ्या विशेषतः स्त्रियांना आणि पुरुषांनाही नियमित पगार, वैद्यकीय सुविधा, पेन्शन आणि हक्काचे पैसे मिळतील आणि समाजामध्ये मान वर करून त्यांना जगता येईल.
मूळात देहाचा व्यापार व्हावा का? आता प्रश्न अजून सोपा करूयात. देहाचा व्यापार फक्त लैंगिक संबंध ठेवताना, ते दाखवताना होतो का? की कार्यालयात फ्रंट डेस्कवर मुलगीच पाहिजे, असं म्हणतानाही झालेला असतो? किंवा लग्नासाठी गोरी/ सुंदर / आकर्षक मुलगी हवी आहे, कारण मुलगा कमावता आहे, असं म्हणताना त्या स्त्री देहाकडे एक वस्तू म्हणूनच पाहिलं गेलेलं असतं. जसा बाईकचा आकार, बाटलीचा आकार ठरवताना झालेला असतो.
हे सगळं खूप गुंतागुंतीचं आहे. संभोगाकडे एक शारीरिक गरज म्हणून बघितलं जात नाही, त्याबद्दलचं मौन तोडायचं नाही, ही क्रिया फक्त लैंगिक सुखाची नसून अधिकार गाजवण्याची आहे, असा आपल्या समाजाचा समाजमान्य समज आहे. स्त्री, काही पुरुष आणि इतर सर्व जेण्डरचे लोक हे पुरुषप्रधान संस्कृतीतल्या मालकासमोर हात बांधून उभे आहे, असं एक आदिम चित्र आहे. यात संस्कृती सांगते, लग्न झाल्याशिवाय सेक्स करायचा नाही. लग्न हे असंख्य सामाजिक मापदंड पूर्ण केल्याखेरीज होऊ शकत नाही. शरीर आता थांबू शकत नाहीये. स्त्री आणि पुरुष अशावेळी स्वतः स्वतःच तृप्त करून घेऊ शकतात, हे कोणी स्पष्ट सांगितलेलं नसतं. यात अनेक पुरुषांना आणि स्त्रियांना ऑरगॅझम (समागमाच्या वेळची चरम उत्कटता!) या साठी दृकश्राव्य माध्यमाची गरज भासते. इरॉटिका किंवा शृंगार रसप्रधान गोष्टी, फिल्म्स यांचा अशासाठी वापर केला जातो. जर ही एक सामाजिक गरज आहे तर मग यात काम करणाऱ्या विशेषतः स्त्रियांना फक्त वाईट नजरेने का बघितलं जात? कुणावरही अन्याय न होता, त्याचा लैंगिक वापर न करता, त्यांना कामाचा योग्य मोबदलाही दिला जाऊ शकतो, अर्थात हे जर कायदेशीर केलं तरच शक्य आहे. यात स्त्रियांनी, बनवलेले पॉर्न फिल्म, स्त्रियांसाठी असलेली श्रृंगार रसप्रधान पुस्तके हा एक सविस्तर विषय आहे. (स्त्रियांनाही ही गरज असते. यावर नंतर कधीतरी.)
स्त्री-पुरुष (पुरुष-पुरुष, स्त्रिया-स्त्रिया आणि इतर सर्व कॉम्बिनेशनमध्येही) संबंध ही एक सुंदर नैसर्गिक क्रिया आहे. इथून सुरुवात केली तर कदाचित या सर्व गोष्टींकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलेल.
(लेखिका प्रसिद्ध दिग्दर्शक आणि कलावंत असून, त्यांचे शिक्षण राष्ट्रीय नाट्य विद्यालयातून झाले आहे.)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.