अजिंक्य पंजशीर
तालिबानी दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानवर ताबा मिळविला असला तरी काबूलपासून जवळच असलेल्या पंजशीर खोरे मात्र अद्यापपर्यंत तालिबानमुक्त राहिलेले आहे. येथे सर्व तालिबानविरोधी गट आश्रयाला आले असून त्यांनी एकत्र येत आघाडीही स्थापन केली आहे. पर्वतरांगांमध्ये वसलेल्या या प्रदेशात गनिमी काव्याचा वापर करून तालिबानला प्रतिकार करण्याची त्यांची योजना आहे.
अफगाणिस्तानमधील युद्धाच्या इतिहासात पंजशीर खोऱ्याने नेहमीच महत्त्वाची भूमिका निभावली आहे. या खोऱ्याच्या विशिष्ट भौगोलिक स्थानामुळे उर्वरित अफगाणिस्तानपासून तो अलिप्त आहे. पंजशीर खोऱ्याला उंच पर्वतरांगांची नैसर्गिक तटबंदी आहे. हिंदू कुश पर्वतरांगाही या खोऱ्याला लागूनच आहेत. केवळ पंजशीर नदीमुळे तयार झालेल्या निमुळत्या मार्गानेच या खोऱ्यात प्रवेश करता येतो. हाच एक मार्ग उपलब्ध असल्याने आक्रमकांना निमुळत्या प्रवेशद्वारावर रोखून ठेवता येते. त्यामुळेच आक्रमकांचा बहुतेक वेळा पराभव झाला आहे. हा भागात पहारे बसविले तर सहज संरक्षण करता येते. अशी नैसर्गिक तटबंदी असल्याने हा भाग ना कधी तालिबान्यांच्या ताब्यात गेला, ना त्याआधीच्या सोव्हिएत महासंघाच्या. या खोऱ्यात सुमारे दीड लाख लोकांची वस्ती असून ते सर्व ताजिक वंशाचे आहेत. तालिबानी हे अफगाणिस्तानात बहुसंख्य असून ते सुन्नी पश्तून आहेत. तालिबान सत्तेत येण्याआधीही पंजशीर प्रांताने केंद्रातील सरकारकडे वारंवार अधिक स्वायत्ततेची मागणी केली होती.
‘पंजशीर’ नावाचा उगम
‘पंजशीर’ या शब्दाचा अर्थ पाच सिंहांचा प्रदेश असा सांगितला जातो. दहाव्या शतकात या भागात प्रचंड मोठा पूर आला असताना पाच भावांनी मिळून एक धरण बांधत पुराचे पाणी अडविले, असे सांगितले जाते. परिसरात असलेल्या पाच पर्वतशिखरांवरूनही या भागाला पंजशीर म्हणतात.
गनिमी काव्याचा वापर
१९८० ते १९८५ या कालावधीत पंजशीर खोऱ्यावर सोव्हिएत सैन्याने नऊ वेळा जोरदार आक्रमण केले. यासाठी त्यांनी हवाई दल आणि पायदळाचा वापर केला. मात्र, मर्यादित शस्त्रबळ असलेल्या तालिबानविरोधी नेते अहमद शाह मसूद यांच्या लढवय्यांनी ही सर्व आक्रमणे परतवून लावली. सोव्हिएत सैनिकांचा पराभव करण्यासाठी त्यांनी गनिमी काव्याचा वापर केला होता. ते सोव्हिएत सैन्याच्या एखाद्या तुकडीला खोऱ्यात प्रवेश करू देत असत आणि नंतर बाकीच्यांना रोखून आत शिरलेल्यांना मारत असत. उंच पर्वतांवरून हल्ले करत त्यांना बेजार करून टाकत असत. सोव्हिएतने माघार घेतल्यावर तालिबान सत्तेत आले आणि ‘नॉर्थर्न अलायन्स’ ही आघाडी स्थापन करत मसूद यांनी तालिबानला विरोध सुरु केला.
नैसर्गिक स्रोत आणि अर्थव्यवस्था
पंजशीर खोऱ्यात पाचूच्या खाणी आहेत. पूर्वीच्या सत्तेविरोधातील चळवळीला या पाचूच्या विक्रीतूनच पैसा पुरविला जात होता. मध्ययुगात हा भाग चांदीच्या खाणीसाठी प्रसिद्ध होता. १९८५ पर्यंत येथे १९० कॅरटपर्यंतचे मौल्यवान खडे सापडत होते. अनेक जलविद्युत प्रकल्पांची उभारणी केल्यास पंजशीर खोऱ्यात अफगाणिस्तानचे ऊर्जा केंद्र म्हणून उदयाला येण्याची ताकद आहे. पंजशीर खोऱ्यातून जाणारा शंभर किलोमीटर लांबीचा एक महामार्ग दोन खिंडींकडे नेतो. एक मार्ग हिंदु कुश-खवाक खिंडीतून उत्तरेकडील पठाराकडे नेतो, तर अंजुमन खिंडीतून जाणारा मार्ग बदाख्शान प्रांताच्या दिशेने जातो. सम्राट सिकंदर आणि तैमूरलंग यांनी आपले सैन्य याच मार्गावरून नेले होते.