arvind renapurkar writes about world gold market
arvind renapurkar writes about world gold market

नव्या युगातील सोन्याची लंका पाहू या!

Published on

शीर्षक वाचून जरा आश्‍चर्य वाटेल. रामायणातील रावणाची लंका ही सोन्याची लंका म्हणून ओळखली जात होती. कारण तेथे असणारी श्रीमंती आणि ऐश्‍वर्य. पण, आता काळ बदलला आणि सोन्याचे केंद्रबिंदू श्रीलंकेतून आखाताकडे वळाले. सध्याच्या काळात दुबई आणि यूएईमधील सोन्यांची दरवर्षी होणारी अब्जावधींची उलाढाल पाहता तिला नव्या युगातील सोन्याची लंका म्हटलं तर वावगं ठरणार नाही.सोन्याच्या आकर्षणापोटी दरवर्षी लाखो नागरिक दुबईवारी करतात. दुबईमध्ये सोने बाजाराची भरभराट होण्यामागे कोणती कारणे असू शकतात, याची उत्सुकता सर्वांनाच असते. सरकारकडून दिली जाणारी कर सवलत, भौगोलिक स्थान, सुविधा या कारणांमुळे जगातील एकूण सोन्यापैकी २० टक्के सोने दुबईच्या बाजारातून खरेदी केले जाते, हे विशेष.

दुबईतील सोने हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. यासाठी बॉलिवूडचा एक संदर्भ इथे देता येईल. १९९० च्या दशकात कादरखान आणि शक्ती कपूरचा एक चित्रपट येऊन गेला. बाप नंबरी, बेटा दस नंबरी. या चित्रपटात एक दृष्य आहे. हे दोघे बापलेक दुबईला कामगार पाठवण्याची कंपनी सुरू करतात. एकदा बरेच कामगार दुबईला जाण्यासाठी दोघांना भेटण्यासाठी येतात. त्याचवेळी तथाकथित दुबई रिटर्न असरानी तेथे येतो. त्याच्या हातात एक झाडू असतो. तो सोन्याचा झाडू आहे, असे तो सांगतो. आपण दोन तीन वर्षांच्या मेहनतीने तेथे कमावल्याचे लोकांना सांगतो. हे पाहून सर्वांना दुबईला जाण्याची ओढ लागते. हे दृष्य इथे सांगायचे कारण म्हणजे दुबईचे असणारे आकर्षण आणि तेही सोन्याचे. सोन्याचा झाडू असतो, ही कल्पनाच आपल्याला आश्‍चर्यकारक आहे. म्हणूनच लाखो नागरिक दुबईला फिरायला जातात आणि सोनेही खरेदी करतात. भारतापेक्षा तोळ्यामागे साधारण तीन ते चार हजार रुपये स्वस्त असणाऱ्या सोन्याची खरेदी स्मरणिय अनुभव ठरतो.

सोने उद्योगात चार हजार कंपन्या
भारतात सध्या सोन्याच्या भाव ५० हजाराच्या आसपास आहे. मध्यंतरी एका तोळ्यामागे ५५ हजार रुपये मोजण्याची वेळ आली होती. सुमारे दोन दशकांपूर्वी एवढ्याच किंमतीत दहा तोळे सोने येत होते. असो. सोने हा सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय. लग्न, सणवार किंवा कौटुंबिक सोहळा असतो, सोन्याशिवाय एकही कार्यक्रम पुढे सरकत नाही. अगदी हुंड्यात देखील मुलींना किती तोळे सोने घालणार यावरून बैठक संपायची. सोने कितीही महागले तरी त्याच्यावरची लोकप्रियता मात्र कमी झालेली नाही. त्यातही आखातातील सोन्याचे विशेष आकर्षण. शुद्ध आणि स्वस्त असे सोने आखाती देशात विशेष यूएई, दुबईत मिळत असल्याने सोनेप्रेमी लोकांचा ओढा राहिला आहे. बहुतांश सेलिब्रिटी तर लग्नासाठी आणि अन्य कार्यक्रमांसाठी सोने खरेदी दुबईतच करतात. सोने तस्करी करण्याच्या घटना तर सतत घडत असतात. अशा सोन्याचे आगार असणाऱ्या यूएई, दुबईत सोने निर्मिती करणाऱ्या ४ हजार कंपन्या आहेत.

आखाताकडे सोने कसे आले?
भारतात सोन्याचा धूर निघत होता, असे जरी म्हटले जात असले तरी सध्या आखाती देशात सोन्याची चकाकी अधिक आहे. वास्तविक सोने हे प्राचीन मौल्यवान वस्तूमध्ये मोडते. सोन्याचा शोध ८ हजार वर्षापूर्वी लागला. इजिप्तमध्ये ख्रिस्तपूर्व ३००० मध्ये सोने धातूची ओळख पटली. किंगडम ऑफ लिडिया येथे खिस्तपूर्व ५६० मध्ये सोन्याचा वस्तूविनिमय म्हणून वापर होऊ लागला. किंगडम ऑफ लिडिया म्हणजे आताचे तुर्कस्तान. ग्रीस आणि रोममध्ये देखील सोने उत्पादित होऊ लागले होते. परंतु रोमन साम्राज्य कोसळल्यानंतर सोन्याची बाजारपेठ युरोप आणि आशियाकडे वळाली. तेथेही अनेक वर्ष उत्पादन आणि वितरण होत असे. विसाव्या शतकात मध्यपूर्व देशांत सोने आणि दागिण्याच्या उद्योगाने बाळसे धरले. १९६५ ते ७४ या काळात बैरुतमध्ये सराफा बाजार भरु लागला. परंतु लेबनानमध्ये यादवी माजल्याने हा बाजार कुवेतकडे सरकला. मात्र हॉलमार्किंग आणि मुद्रांक कर अनिवार्य केल्याने ही बाजारपेठ यूएईकडे सरकली. युएई आणि दुबई सरकारने सुरवातीपासूनच ग्राहकाभिमूख धोरण ठेवले. दुबईला 'सिटी ऑफ गोल्ड' असे म्हटले जाते. विशेषत: 'गोल्ड सूक' हा सोन्याचा मॉलच आहे. १९०० च्या प्रारंभी बोटावर मोजण्याइतपत सोन्याचे व्यापारी होते. आज मात्र हजारोच्या संख्येने सोने विक्री करणारे व्यापारी आहेत.

सोन्याची शुद्धता
दुबईतील सोने हे शुद्धतेसाठी अधिक प्रचलित आहे. द दुबई सेंट्रल लॅब डिपार्टमेंटकडून सोन्याची शुद्धता तपासली जाते. त्याचे मूल्यांकन करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित केली आहे.दुबईत मिळणाऱ्या सोन्याबद्धल असे म्हटले जाते की १ ग्रॅमच्या शुद्ध सोन्यापासून ३.५ किलोमीटपर्यंत तार तयार करता येते. ३१.०५ ग्रॅमपासून सोन्याचा पत्रा तयार करता येतो आणि तो १६ चौरस मीटर एवढा भाग व्यापू शकतो. २४ कॅरेटच्या सोन्यात चोवीस प्रकारचे शुद्ध सोने असते, २२ कॅरेटच्या सोन्यात २२ प्रकारचे शुद्ध सोने असते आणि उर्वरित दोन अन्य धातूंचा समावेश केला जातो. ही बाब २३ आणि १८ कॅरेटला लागू होते. चोवीस कॅरेटच्या सोन्याचा रंग हा मूळ स्वरुपातील असतो.

सोन्याचे उत्पादन
सोन्याचे आगार समजल्या जाणाऱ्या दुबई किंवा यूएईमध्ये मोठ्या प्रमाणात सोन्याच्या खाणी असतील, असा समज आपल्याला असेल. प्रत्यक्षात दुबई हे सोन्याच्या व्यापाराचे जागतिक केंद्र असून तेथे सोन्याच्या खाणीचा संदर्भ दिसून येत नाही.तेथे सोन्याचे फारसे उत्पादन होत नाही. प्रामुखाने उझबेकिस्तान, कझाकिस्तान, इंडोनेशिया, तुर्कस्तान, किर्गिझस्तान, इजिप्त, सौदी अरेबिया, इराण, अझरबैजान, ताजाकिस्तान, मोरोक्को, अल्जेरिया या ठिकाणी सोने धातू सापडतो. विशेष म्हणजे यापैकी कोणत्याही देशात मोठ्या प्रमाणात सोने काढले जात नाही. अपवाद उझबेकिस्तानचा. उर्वरित देशात थोड्या थोड्या प्रमाणात सोने काढण्यात येते. दुबईत सुमारे ३० देशांतून सोन्याची आयात केली जाते आणि त्यावर प्रक्रिया केली जाते.

दुबई गोल्ड सूक
दुबईच्या डेरा जिल्ह्यातील दुबई गोल्ड सूक ही सोन्याची मोठी बाजारपेठ मानली जाते. या ठिकाणी ३०० रिटेलर सोन्याची विक्री करण्यासाठी सज्ज असतात. जगभरातील एकूण सोन्यापैकी २० टक्के सोन्याची उलाढाल गोल्ड सूक येथे होते. या बाजारपेठेतील सोन्याचे वजन सुमारे १० टन एवढे असते. कर कमी आकारला जात असल्याने अन्य देशांच्या तुलनेत इथे सोने स्वस्त मिळते. वास्तविक व्हेनेझुएला येथे सर्वात स्वस्त सोने मिळते. गोल्ड सूक ३३७१ चौरस फुट परिसरात उभारलेले असून येथे पहिल्या मजल्यावर सोने, दुसऱ्या मजल्यावर हिरे दागिणे विक्री केली जाते. याशिवाय स्थानिक व्यापारी आणि चांदीसाठी वेगळे दालन आहे. दुबईत १८० राष्ट्रीयत्व असणारे नागरिक राहतात. त्यामुळे अरेबिक, आशियायी, वेस्टर्न, युरोपीय शैलीचे दागिणे पाहवयास मिळते. किंमत वाजवी असल्याने दुबईत सोने बाजाराची भरभराट झाली.

दुबईतील भारतीय व्यापाऱ्यांचे बस्तान
दुबईतील सोने उद्योगात भारतीय उद्योगपती टॉप टेनमध्ये आहेत. भारताशिवाय पाकिस्तान, ब्रिटन,सौदी अरेबिया, स्वीझर्लंड, जॉर्डन, बेल्जियम, कॅनडा, ओमान, येमेन या देशांचा टॉप टेनमध्ये समावेश होतो. दुबईत ६२,१२५ गुंतवणूकदार असून त्यापैकी ६०,१२५ गुंतवणुकदार पुरुष तर २११३ महिलांचा समावेश आहे. दुबईत १९४०,१९५० च्या दशकात मुक्त व्यापार धोरण सुरू झाल्याने जगभरातील व्यापारी दुबईकडे वळाले. विशेषत: भारत आणि इराणचे व्यापारी सराफा बाजारासाठी आखातात गेले आणि तेथेच स्थायिक झाले आहेत. गेल्या तीन चार वर्षांपासून सोन्याच्या किंमतीत चढे भाव असल्याने दुबईत व्यवसाय करण्यासाठी लागणारी जागा सध्या ३० ते ४० टक्के कमी भाड्याने मिळत आहे. भारताच्या तुलनेत दुबईत सोने मेकिंग चार्जेस कमी असल्याने सोने वाजवी किंमतीत मिळते. भारतात एका ग्रॅमसाठी ५० ते १५०० रुपये आकारले जातात तर दुबईत हाच दर १० दऱ्हॅम आकारण्यात येतो.

अर्थव्यवस्थेचा कणा
आखाती देशांची अर्थव्यवस्था तेल आणि सोन्यावर अवलंबून आहे. सोन्यामुळे यूएई, दुबईच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळते. देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकास, मजबुती आणि वाढ ही सोन्याच्या उलाढालीवर अवलंबून आहे. सोने निर्मिती करणाऱ्या सुमारे ४०८६ कंपन्या असून दरवर्षी ४०० दऱ्हाम अब्ज (८,०२४,२२८ अब्ज रुपये) उलाढाल सोने उद्योगात होतो. एवढेच नाही तर दरवर्षी सोन्याची सरासरी एइडी १४२ अब्ज किंमतीची आयात तर एईडी ७५ अब्जची निर्यात केली जाते. यूएईच्या अर्थव्यवस्थेत सोन्याचे योगदान ४० अब्ज डॉलरचे आहे. त्यापाठोपाठ दागिण्याचे २९ अब्ज डॉलर, हिऱ्याचे २६ अब्ज डॉलरचे योगदान आहे. जगाच्या तुलनेत दुबईतील सोन्याचा वाटा १४ टक्के इतका आहे. बिझनेस रजिस्ट्रेशन ॲड लायन्सिंगच्या अहवालानुसार दुबईत सोने उद्योगात गेल्या वर्षी १३,११० कामगार कार्यरत होते. देशात सोन्याच्या खाण प्रकल्पाचे प्रमाण कमी असले तरी रिफायनरी उद्योग मोठ्या प्रमाणात आहे. दरवर्षी १३० टन सोन्याची रिफायनरी केली जाते. लॉकडाउनच्या काळात दुबईतील सराफा बाजार ७० टक्क्यांनी कमी झाला. मार्च ते जून या काळात तब्बल ४२८.८ टन सोन्याची आयात झाली. एकीकडे सोन्याचे वाढलेले भाव आणि दुसरीकडे कोविडचा प्रादर्भाव यामुळे सोने बाजाराची झळाळी काही प्रमाणात उतरली. गेल्या सहा वर्षांत सोन्याच्या उलाढालीत कमालीची घसरण झाली आहे. २०१३ रोजी ६४.४ टन उलाढाल झालेली असताना २०१९ मध्ये ती ३६.२ टनवर आली.

एटीएममधून सोनेही काढा
एटीएममुळे आता पैसे काढण्यासाठी रांगेत उभे राहण्याची गरज भासत नाही. आपण जगाच्या कोणत्याही भागातून कितीही आणि केव्हाही पैसे काढू शकतात. पण, आता पैशाबरोबरच सोन्याचे देखील एटीएम आले आहे हे जर, सांगितले तर चटकन विश्‍वास बसणार नाही. सोने निघणारे एटीएम अबुधाबीच्या अमिरात पॅलेस लॉबीत बसवले आहे. या एटीएममधून ३२० प्रकारचे सोने काढता येते. जगभरातील नागरिक सोने लॉकरमध्ये ठेवतात, परंतु, अबुधाबीचे लोक सोने बँकेत जमा करतात आणि हवे तेव्हा सोने एटीएमच्या मदतीने काढू शकतात. यासाठी आपल्याला एटीएम कार्ड मशीनमध्ये टाकावे लागते. त्यानंतर सहजपणे सोने काढून घेता येते. विशेष म्हणजे त्या बँकेत खाते असणे गरजेचे आहे. अबुधाबीमध्ये सोने घरी बाळगले जात नाही. प्रत्येक जण बँकेतच सोने ठेवून चिंतामुक्त राहतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...