बीडीडी चाळींचा मेकओव्हर होणार आहे. मराठी माणूस टॉवरमध्ये राहायला जाणार. महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर त्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. तथापि, काळाबरोबर त्याच्या विस्तारलेल्या अपेक्षांचे काय?... याचे उत्तर मराठी बाणा दाखवणाऱ्यांना द्यावे लागणार आहे.
कोकिळेचे कूजन सुरू झाले की वसंतऋतू आल्याचे समजते; तसे ‘मराठी माणूस’ हे शब्द मुंबईत कानी पडू लागले की, महापालिकेच्या निवडणुका जवळ आल्या असे समजावे. कोकिळेचा स्वर मधूर, तर राजकारण्यांची मिठास वाणी फसवी. वरळी कामगार वर्गाचे वसतिस्थान. मध्य मुंबईतल्या या वस्तीत रोजगारासाठी परगावाहून आलेल्या कामगारांसाठी बीडीडी चाळी ब्रिटिशांनी वसवल्या, १९२०च्या आसपास. कोकण आणि घाटमाथ्यावरून आलेली मंडळी १५० फुटांच्या या घरात पथारी टाकून राहिली, स्थिरावली आणि नंतर विस्तारली. वरळी मराठी माणसाच्या वावराचे मुख्य केंद्र झाले. आता बीडीडी चाळींचा मेकओव्हर होत आहे. महापालिकेची निवडणूक फेब्रुवारीत होण्याची शक्यता आहे.
ठाकरे घराण्याची तिसरी पिढी, आदित्य ठाकरे वरळीचे आमदार आहेत. पहिल्या निवडीतच कॅबिनेट मंत्री झालेल्या आदित्य यांच्या नेतृत्वातच शिवसेना महापालिका निवडणुकांना सामोरे जाणार अशी चर्चा आहे. नियोजन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे अन् चेहरा आदित्य यांचा अशी शिवसेनेची व्यूहरचना आहे, असे म्हणतात. उद्धव ठाकरेंचे नेतृत्वही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतून लाँच केले होते; तर आदित्य यांना मुख्य चेहरा करणारी ही निवडणूक शिवसेना मराठी भावनांना हात घालतच लढवणार हे उघड आहे. जुन्या-नव्याचा संगम करायला चाळींच्या मेकओव्हरपेक्षा चांगला मुद्दा कसा असू शकेल?
टॉवर काय कामाचा?
देवेंद्र फडणवीस सरकारच्या कार्यकाळात हाती घेतलेल्या बीडीडी चाळीच्या फेरबांधणीचे नव्याने भूमिपूजन झाले. या वेळी शिवसेनेचे मित्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असल्याने, नव्या मित्रपक्षांच्या नेत्यांना समवेत घेऊन भूमिपूजन झाले. तीन वर्षांत चाळीच्या जागी ४० मजली टॉवर उभारण्याचे आश्वासन देण्यात आले. आपण चाळसंस्कृतीत कसे वाढलो, याची उदाहरणे उद्धव ठाकरेंनी अन् गृहनिर्माण मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसच्या जितेंद्र आव्हाड यांनी दिली. नव्या जगण्याची संधी देतो, हा भाषणांचा मथितार्थ होता. मुंबईकरांना सतत स्वप्ने दाखवली जातात. कधी मुंबईचे शांघाय, तर कधी सिंगापूर होणार! मराठी माणसासाठीच सारे काही असेच सांगितले जाते. या वेळी जरा वेगळ्या भाषेत सांगितले गेले. मुंबईतील गिरणी कामगारांच्या वारसांना जी घरे दिली ती त्यांनी विकली अन् कनवटीला पैसा बांधून मुंबईच्या उपनगरात गेली.
हाती कायमस्वरूपी उत्पन्न नसलेल्या मराठी माणसाची ती अपरिहार्यता होती. ती लक्षात न घेताच वरळीतली घरे विकून बाहेर जावू नका, इथेच राहा, मराठी संस्कृती वाढवा, असा ‘प्रेमळ’ सल्ला ठाकरेंनी दिला. चांगले राहणे कुणाला आवडणार नाही? नव्या पिढीला तर त्याची आस आहे. पण चाळीत १५० फुटांत राहणारा ५०० चौरस फूट मिळाल्याचा आनंद जरूर मानेल, पण बैठ्या चाळीतून तो ५० मजली टॉवरमध्ये जाऊ शकेल का? अशी टोलेजंग टॉवर बांधण्याची कंत्राटे घेऊन अनेक नेत्यांनी आर्थिक स्थैर्य मिळवले. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत सर्वपक्षीय छोटे-मोठे नेते बिल्डर झाले. एसआरए नावाने ओळखल्या जाणाऱ्या सिमेंटच्या विद्रूप चाळी मुंबईत ठिकठिकाणी उभ्या झाल्या. पण निकृष्ट बांधकाम असलेल्या या जागात मराठी माणूस दुर्मुखलेलाच राहिला. जागतिकीकरण, टीव्ही, इंटरनेटने जगणे बदलवले आहे. ५० माळ्यांच्या इमारतीत लिफ्ट आवश्यक असते. त्यासाठी मासिक पैसे आणायचे कुठून हा प्रश्नच. तो सोडवायला उत्पन्न मिळणार नसेल, तर टॉवर काय कामाचा?
हवे नवे काहीतरी
मराठी मते एकगठ्ठा आपलीच मानत शिवसेनेने भूमिपुत्रांचे राजकारण रेटले. मराठी माणसाचे एकमेव तारणहार आपणच ही द्वाही सर्वदूर पसरवली खरी. पण मुंबईतल्या मराठी माणसाला काय मिळाले, याचा जमाखर्च निष्पक्षपणे मांडला नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जन्म ठाकरेंनीच केला असल्याने जाब विचारणे सुरू झाले. पदार्पणातला जोर ‘मनसे’ला टिकवता आला नाही तरी मराठी माणसाला दुसरा पर्याय मिळाला. राज ठाकरेंच्या भूनिका बदलत गेल्या तरी बंधूविरोधात सातत्य आहे. रोजगाराच्या शोधातले परप्रांतीय मुंबईत आल्याने स्थानिकांचा रोजगार गेला. या परप्रांतीयांना आधी काँग्रेस आणि आता भाजपने आपले मानले. मराठी जनांना काळाशी नाते राखता आले नाही. त्यांच्या हातातून रोजगार गेला. कुठल्याही महानगरात भूमिपुत्रांची कामे उपरे खेचून घेतात. मुंबईतही तसेच झाले. पन्नासवरून मराठीचा टक्का २० टक्क्यांपर्यंत घसरलाय. शिवसेनेने भावनिक बळ दिले, ते आजही पुरेसे वाटते का ते निवडणूक निकाल सांगतील. भाजपने स्वत:चे स्थान निर्माण करून संख्याबळात गेल्यावेळी जवळपास बरोबरी साधली.
२०१७ मध्ये शिवसेनेला पालिका निवडणुकीत ३७ टक्के मुंबईकरांनी, तर भाजपला ३६.२ टक्क्यांनी पसंती दिली. केवळ दोन जागांचाच फरक. प्रत्येक निवडणूक वेगळी असते. शिवसेना त्याच मराठी आधारावर मते घेणार असेल, तर त्यांनी या वर्गासाठी नक्की काय केले, हा प्रश्न स्वत:लाच विचारावा. खड्डे, साचलेले पाणी, गलिच्छ वस्त्या हे मुंबईचे चित्र आहे. चाळींचे टॉवर करण्याचा मेकओव्हर पुरेसा ठरणार नाही, मराठी माणसाला नवे आणखी काहीतरी हवे आहे, हेही लक्षात घ्यावे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.