"बुलीबाई ऍप' नावाच्या ऍपवर ठराविक धर्मातील प्रतिष्ठीत महिलांचे छायाचित्रे वापरुन त्या महिलांचा लिलाव करण्याचा घृणास्पद प्रकार मुंबई पोलिसांनी अक्षरशः हाणून पाडला. महिलांबाबत घडलेला हा पहिलाच प्रकार नाही, तर महिलांची सोशल मीडियावरील छायाचित्रे, व्हिडीओ चोरुन, त्यांचा परस्पर वापर करुन बदनामी किंवा अन्य गैरप्रकार करण्याच्या घटना सातत्याने घडतात. अशा घटना रोखण्यासाठी सायबर पोलिसांकडून वेळोवेळी कारवाई केली जाते, मात्र महिलांनीही समाजमाध्यमांवर स्वतःची खासगी छायाचित्रे, व्हिडीओ शेअर करताना आता खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे, महिलांबाबत समाजमाध्यमांवर नेमका कसा गैरप्रकार होतो, कोण करते आणि त्यापासुन सुरक्षित राहण्यासाठी नेमके काय करावे, यावर प्रकाश टाकणारा हा लेख.
इंटरनेटमुळे जग "ग्लोबल' झाले हे नक्की खरे आहे. मात्र या "ग्लोबल' जगामध्ये म्हणजेच आभासी (व्हर्च्युअल) जगामध्ये वावरताना आपण आपल्या जवळच्या लोकांपासून दूर जाऊन कोणी तरी आपल्याकडून सोशल मीडियावर टाकल्या जाणाऱ्या पोस्ट, फोटो, व्हिडीओचा गैरवापर तर करीत नाही ना, ना हा प्रश्न कधीतरी आपल्याला पडल्याशिवाय राहणार नाही. कारण घटनाही तशीच घडली.
अवघ्या 16 वर्षाची नयनाची (नाव बदललेले आहे) फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम अशा सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय होती. नयना धाडसी स्वभावाची असल्याने, वेगवेगळ्या पोझमधील छायाचित्रे काढण्याची तिला भारी आवड असल्याने ती अशी छायाचित्रे काढून ती फेसबुकवर तत्काळ अपलोड करीत होती. त्यातुनच एका अनोळखी व्यक्तीने तिला फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली, तिनेही ती स्विकारली. त्यानंतर दोघांमध्ये संवाद वाढला. हळूहळू त्याने तिची फेसबुकवरील छायाचित्रे घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने तिची छायाचित्रे मॉर्फींग करुन त्यांना अश्लिल छायाचित्रांशी जोडले. त्यानंतर त्याने तिला ती छायाचित्रे पाठवून, ते व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्याकडे खंडणी मागण्यास सुरुवात केली. तिनेही घाबरुन सुरुवातीला त्याला काही पैसे दिले. त्यानंतर सातत्याने हा प्रकार घडू लागल्याने तिने पोलिसांना हा प्रकार सांगितला. नंतर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.