अमेरिका आणि युरोपीय देशांचे प्राबल्य मोडून काढायच्या उद्देशाने ब्राझील, रशिया, इंडिया (भारत) व चीन यांनी २००९ मध्ये परस्पर सहकार्याच्या दृष्टीने एक गट तयार केला.
या गटात २०१० मध्ये दक्षिण आफ्रिकेलाही सामील करण्यात आले. ‘गोल्डमन सॅक’ या प्रसिद्ध कंपनीतील अर्थतज्ज्ञ जिम ओ’नील यांनी या पाच देशांच्या आद्याक्षरापासून ‘ब्रिक्स’ (BRICS) असे त्याचे नामकरण केले.
एक जानेवारी २०२४ पासून या समूहात इजिप्त, यूएई, इथिओपिया, इराण आणि सौदी अरेबिया हे पाच देश जोडले गेले. आता असा हा दहा देशांचा गट ‘ब्रिक्स’ या नावाने काम करतो आहे.
असाच प्रगत राष्ट्रांचाही एक गट आहे, त्याचे नाव आहे ‘जी ७’, ज्यात अमेरिका, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, जपान, इटली आणि इंग्लंड हे देश येतात. हा गट जगातील १० टक्के लोकसंख्या आणि ४२ टक्के व्यापार नियंत्रित करतो.
या तुलनेत ‘ब्रिक्स’ हा गट ४० टक्के लोकसंख्या आणि २५ टक्के व्यापार नियंत्रित करू शकतो. यावरून हे लक्षात येईल, की ‘ब्रिक्स’ देशांची सामूहिक ताकद दुर्लक्षित करता येणार नाही.