Capital and Loan:भांडवल आणि कर्ज

Business Balancesheet:चांगला व्यापार, धंदा करायचा असेल, तर बॅलन्सशीट समजून घेणे महत्त्वाचे आहे. त्यातील प्रत्येक घटक समजून घेऊन, त्यावर उपाय करणे गरजेचे आहे. यात भांडवल म्हणजे इक्विटी व कर्ज म्हणजे डेट यासह डेट-इक्विटी रेशो या संकल्पना समजून घेणे गरजेचे आहे. व्यवसाय, धंदा करताना किमान बँकेचे व्याज, स्वतःच्या भांडवलावरचे व्याज व दिलेल्या वेळेचा योग्य मोबदला काढल्यानंतर नफा राहिला पाहिजे व तो नफा अधिक असला पाहिजे, तरच धंदा योग्य आहे, असे समजावे.
capital and Loan
capital and LoanE sakal
Updated on

चकोर गांधी

प्रत्येक व्यावसायिकाची, व्यापाऱ्याची एकच इच्छा असते, ती म्हणजे आपल्या व्यवसायाची भरभराट व्हावी. यासाठी तो व्यवसायात मोठी गुंतवणूक करत असतो. व्यवसाय चांगला चालण्यासाठी कर्ज आणि आपले भांडवल याची योग्य सांगड घालणे आवश्‍यक असते.

धंद्यामध्ये असलेले कर्ज भागिले आपले भांडवल हा रेशो यासाठी महत्त्वाचा ठरतो. हा रेशो व्यवसायाच्या प्रकारावर अवलंबून असतो.

खूप मोठी गुंतवणूक लागणाऱ्या व्यवसायामध्ये तो अगदी ३:१ असू शकतो, तर कमी भांडवल लागणाऱ्या व्यवसायात तो १ः१ असू शकतो.

सर्वसाधारणपणे १ः१.५ हा रेशो चांगला असतो. कर्ज जास्त आणि स्वतःचे भांडवल कमी असल्यास व्याजासाठी धंदा केल्यासारखा होतो, त्यामुळे हा रेशो नेहमी पाहावा.

व्यवसायात रेशोंना महत्त्व

दुसरा महत्त्वाचा रेशो म्हणजे ‘आरओसीई’ (ROCE) रिटर्न ऑन कॅपिटल एम्लॉयी. सोप्या भाषेत व्याज व करापूर्वीचा नफा (EBIT) भागिले लागलेले सर्व भांडवल अर्थात कर्ज धरून. थोडक्यात, धंद्यात लागलेल्या सर्व पैशांवर व्याज व कराच्या आधी किती नफा होतो याचा रेशो.

हा रेशो २० टक्के व अधिक असेल, तर धंदा चांगला समजावा. हा रेशो आपण भरत असलेल्या कर्जावरच्या व्याजदरापेक्षा किती अधिक आहे, हे महत्त्वाचे आहे. जितके अधिक तितके पैसे धंद्यात निर्माण होत राहतात.

हा रेशो व्याजदरापेक्षा अधिक जास्त असेल, तर त्या धंद्याला एटीएम मशीन असे म्हणतात. थोडक्यात, ज्या धंद्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशन अधिक असते, तिथे हा रेशो जास्त असतो. असा व्यवसाय, धंदा उत्तम ठरतो. ‘आरओआय’ अर्थात रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट (ROI) म्हणजे सर्व खर्च व व्याज दिल्यानंतर राहिलेला नफा व भांडवल याचा रेशो.

थोडक्यात, यातून आपल्या भांडवलावर किती परतावा मिळाला हे कळते. हा रेशो बँकेच्या व्याजापेक्षा अधिक असला पाहिजे; अन्यथा आपण धंदा न करता बँकेत पैसे ठेवून जास्त कमवू शकतो. कोणत्याही गुंतवणुकीत या रेशोंना महत्त्व दिले जाते.

व्यवसाय करतानाही हे पाहणे महत्त्वाचे आहे. हे सर्व पाहायला बॅलन्सशीट पाहणे व समजणे गरजेचे आहे. रिटर्न ऑन टाईम इन्‍व्हेस्टेड (ROTI) चांगला आहे; पण मालकाने दिलेल्या वेळेला योग्य मोबदला मिळत नसेल, तर काय उपयोग? याकरिता नफा काढताना मालकाने स्वतःचा योग्य मोबदल्याचा विचार करणे गरजेचे आहे.

नफा अधिक असणे आवश्‍यक

व्यवसाय, धंदा करताना किमान बँकेचे व्याज, स्वतःच्या भांडवलावरचे व्याज व दिलेल्या वेळेचा योग्य मोबदला काढल्यानंतर नफा राहिला पाहिजे व तो नफा अधिक असला पाहिजे, तरच धंदा योग्य आहे, असे समजावे.

सुरुवातीला कदाचित या सर्व गोष्टी घडणार नाहीत; पण लवकरात लवकर नफा होणे महत्त्वाचे आहे. त्याकरिता बॅलन्सशीट पाहून अभ्यास करणे गरजेचे आहे, तरच कळेल आपण कोठे आहोत? क्रेडिटर म्हणजे सप्लायरचे देणे असलेले पैसे, ज्यांच्याकडून कच्चा माल घेतला आहे, त्यांना देणे असलेले पैसे.

काही लोकांचा असा समज आहे, की सप्लायरच्या पैशावर धंदा करावा. ते योग्य नाही. खूप जास्त लाँग क्रेडिटवर कच्चा माल घेऊन पैसे वापरणे योग्य नाही, त्यापेक्षा सप्लायरला लगेच पैसे देऊन कॅश डिस्काउंट घेणे जास्त फायद्याचे आहे.

डिस्काउंट बँकेच्या व्याजापेक्षा केव्हाही अधिक असतो. रोखीने माल घेतल्यास जास्त फायद्याचे ठरते व खरेदीतही नफा मिळतो. सप्लायरला वेळेवर पैसे दिल्यास तोदेखील माल व्यवस्थित व वेळेवर देतो. आपल्याला माल देण्यास प्राधान्य देतो.

भांडवलाचा योग्य वापर

कॅश क्रेडिट किंवा ओव्हर ड्राफ्ट खेळत्या भांडवलासाठी वापरले जाते. या भांडवलाचा योग्य वापर करणे खूप महत्त्वाचे असते. यावरचे व्याज प्रत्येक दिवशी काढले जाते. खेळते भांडवल जितके लवकर फिरवले जाईल, तितके व्याज कमी लागून नफा वाढतो.

त्यावर लक्ष दिले पाहिजे. स्टॉक किंवा उधारीत हे भांडवल गुंतलेले असते. खास करून ज्या धंद्यामध्ये नफा कमी असतो, तिथे खेळत्या भांडवलाच्या वापरावर खूप नजर ठेवावी लागते. त्यावर लागणारे व्याज दिवसागणिक पाहिले पाहिजे.

धंद्यामध्ये खूप मोठी वाढ नसताना खेळते भांडवल कमी पडायला लागले, की काहीतरी चुकत आहे, हे समजून जावे. यासाठी दर महिन्याला बॅलन्सशीट पाहणे गरजेचे आहे.

(लेखक प्रसिद्ध व्यवसाय सल्लागार आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.