विक्रम अवसरीकर
‘‘माझा अमेरिकेतला भाचा आलाय काही दिवसांसाठी इकडे,’’ छोटूने पुस्तक वाचत बसलेल्या धनंजयरावांना सांगितले.
‘‘तुझा सख्खा भाचा?’’ धनंजयरावांनी नाकावरच्या चष्म्यातून छोटूकडे बघितले. माहिती गोळा करून त्या माहितीचे विश्लेषण करून आपल्या मनात ती साठवून ठेवायची धनंजयरावांना सवयच होती.
‘‘नाही, लांबची बहीण आहे, ती तिकडचीच आहे, हा पोरगा तिसऱ्या पिढीतला मराठी. त्याचे आजोबा इतके ठेंगू होते, एकदम पेठेतले; पण हा धिप्पाड आणि वाटतच नाही की याच्यात मराठी जिन्स असतील.’’ छोटूने जास्तीची माहिती पुरवली.
‘‘अरे बाबा, साधी गोष्ट आहे, तिकडचे हवा, पाणी, वातावरण त्याच्या अंगी लागले आहे. असे बदल साधारण दुसऱ्या, तिसऱ्या पिढीत दिसायला लागतात.’’ याही बाबतीत धनंजयरावांचा अभ्यास चांगला होता.
‘‘हा ते डार्विन वगैरे म्हणता आहात ना? उत्क्रांती म्हणजे माकडाचा माणूस, तेच ना?’’ आपल्यालाही काही माहिती आहे, असे छोटूने दाखवायचा प्रयत्न केला. त्याने ते मुद्दामच केले होते कारण विनाकारण धनंजयरावांना पिडले, की ते चमत्कृतिजन्य माहिती सांगतात, असा त्याचा अनुभव होता.
धनंजयरावांनी त्याला निराश केले नाही. ‘‘हो, हो, तेच! तुला माहिती आहे का? की उत्क्रांतीच्या काही सूत्रांचा वापर हा अनेक गोष्टींत केला जातो?’’
‘‘म्हणजे?’’ छोटू सरसावून बसला.
‘‘म्हणजे मॅनेजमेंट, गुंतवणूक, शास्त्रीय प्रयोग यांच्या जडणघडणीमध्ये निसर्गात आढळणाऱ्या समान तत्त्वांचा वापर केला जातो. त्याला ‘मिमिक’ असे म्हणतात म्हणजे फुलपाखरांच्या आकाराचा अभ्यास करून तसे हेलिकॉप्टर बनवणे वगैरे गोष्टी.’’ धनंजयरावांनी स्टार्टर मारला.
‘‘ते हेलिकॉप्टर वगैरे जाऊ देत... आपल्या शेअर बाजारामध्ये काय उपयोग करता येईल?’’ छोटूने विचारले.
‘‘हो, का नाही? त्या क्षेत्रात तर याचा उपयोग होतोच. तुला माहिती नाही?’’ धनंजयरावांनी छोटूला स्लेजिंग करायला सुरुवात केली. संधी हातातून घालवायची नाही असा त्यांचा खाक्या होता.
‘‘सांगा हो, नमनाला घडाभर तेल नको’’ छोटू करवदला.
धनंजयराव गालातल्या गालात हसले. त्यांना ही प्रतिक्रिया अपेक्षितच होती. त्यांनी पुढे सांगायला सुरुवात केली. ‘‘मी तुला काळविटांपुढे पडणाऱ्या प्रश्नाचे उदाहरण देतो. एका मादीसाठी नरांमध्ये झुंज होते, जो नर ती झुंज जिंकतो त्याला त्याचा वंश पुढे चालू ठेवण्यासाठी लॉटरी लागते; पण जे नर काळवीट ती झुंज हरते, ते जायबंदी झाले तर त्याचा वंश खुंटायला पाहिजे. बरोबर?’’
‘‘बळी तो कान पिळी. जो बलिष्ठ तोच जिंकतो.’’ छोटूनेही दोन शब्द जोडले.
‘‘पण त्या जायबंदी झालेल्या नरामुळे वंशनिर्मिती पुढे न झाल्याने काळविटांच्या संख्येवर परिणाम होतो, त्याचे काय?’’ धनंजयरावांनी बिनतोड प्रश्न केला.
‘‘च्यायला, खरेच की. निम्मे नर जायबंदी झाले, परत त्यातले निम्मे नर जायबंदी झाले... असे करता करता शेवटी काहीच उरणार नाहीत. शेतकऱ्याची जमीन कशी वाटणीमुळे कमी-कमी होत जाते, तसेच आहे की.’’ छोटूने वेगळेच उदाहरण दिले.
‘‘वा, वा छोटू, तुला वेगवेगळ्या विषयांची सांगड कशी घालायची ते लक्षात आहे तर! चांगले आहे, अगदीच पालथ्या घड्यावर पाणी नाही.’’ धनंजयरावांनी चिमटा काढला.
‘‘मी घरचा अभ्यास करत असतो.’’ छोटूने कॉलर ताठ करून सांगितले.
‘‘बरं, बरं, फार शेफारून जाऊ नकोस, पुढे काय होते हे सांग,’’ त्यांनी छोटूला आव्हान दिले.
‘‘कळप कमी-कमी होत असेल दुसरे काय?’’ छोटूने अवाजवी आत्मविश्वासाने उत्तर दिले.
‘‘इथेच फसलास, वस्तुस्थिती तुला वाटते तशीच असते असे तुला जे वाटत असते ते चूक असते. या झुंजी होतच नाहीत, असे याचे उत्तर आहे.’’ धनंजयरावांनी हातची राखलेली माहिती छोटूवर फेकली.
‘‘काय? मग उत्क्रांती कशी होते? नक्की होते काय?’’ छोटू फारच चकित झाला होता.
‘‘झुंज होते; पण होत नाही.’’ आता तर ‘आ’ वासलेल्या छोटूला धनंजयराव पुढची माहिती देत म्हणाले, ‘‘हे नर फक्त झुंजीचे नाटक करतात. पहिल्यांदा पाय आपटतात, मग शिंगाने एकमेकांना ढकलतात. यात शेवटपर्यंत टिकून राहतो, तो जिंकतो आणि प्रतीकात्मक लढाई होत असल्याने, जो नर हारला आहे तो जायबंदी न होता. दुसऱ्या मैत्रिणीला शोधायला तयार असतो.’’
‘‘निसर्गाने पण काय कमाल केली आहे...’’ छोटू चकितच झाला होता.