Medal
MedalSakal

‘ई-कचऱ्या’तून रोजगाराला वाव

टोकियो इथे नुकत्याच पार पडलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये जी जी सुवर्ण, रौप्य आणि ब्राँझ पदके दिली.
Published on

ई-कचरा हा तसा दुर्लक्षित आणि उपेक्षित. त्यातून धातू काढणे ही प्रक्रिया आहे. जपानमधल्या ऑलिम्पिकमध्ये याच कचऱ्यातून तयार केलेली सोने, चांदी, तांब्याची पदके विजेत्यांना देऊन नवा पायंडा पाडला गेला. त्याविषयी.

टोकियो इथे नुकत्याच पार पडलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये जी जी सुवर्ण, रौप्य आणि ब्राँझ पदके दिली ती सर्व ज्या सोन्या-चांदीपासून आणि तांबे, कथिल या धातूंपासून तयार केलेली होती ते सर्व धातू ई-कचरा किंवा इलेकट्रॉनिक स्क्रॅपमधून मिळवण्यात आले होते, असे त्यांनीच जाहीर केले. आपल्या सर्वांनाच ते आता माहिती झाले आहे. गेली काही वर्षे किंवा तसे तर गेली काही दशके ई-वेस्ट किंवा इलेकट्रॉनिक कचरा हा खरोखरीचा चिंतेचा विषय आहे.

दुर्दैवाने अगदी सरकारी खात्यांसह कोणालाच लक्ष द्यावेसे वाटत नाही. रोजच्या वापरातून निर्माण झालेला कचरा वायू व पाणी प्रदूषण एवढ्यापुरताच मर्यादीत आहे, असे वाटते. आपली सर्वांची प्रचंड शक्ती तिथेच खर्ची पडते की आणखी नवीन उत्साहाने इलेक्ट्रॉनिक कचऱ्यावर प्रक्रिया करणे फार अवघड होऊन बसले आहे. त्यामागे 2-3 महत्वाची कारणे आहेत.

1. इलेक्ट्रॉनिक कचऱ्यामधून जे काही मौल्यवान धातू मिळू शकतात ते अत्यंत कमी प्रमाणात असतात. त्यातून कुठलाही फायदेशीर उद्योग, व्यवसाय तयार होऊ शकत नाही. ज्याला आपण इंग्लिशमध्ये ‘सस्टेनेबल’ म्हणतो असा तो फायदेशीर नाही.

2. आजच्या जगात जागा ही बाब इतकी महाग आहे की खोलीभर इलेक्ट्रॉनिक कचरा जमा करायचा आणि त्यातून जेमतेम काही किलो कथील, तांबे, पितळ आणि थोडीफार चांदी मिळणार तर कामाला उत्साह कसा येणार. कारण इलेक्ट्रॉनिक कचऱ्यामध्ये जवळजवळ 95 टक्के पूर्ण टाकाऊ पदार्थ असतात आणि लोखंडासह इतर धातू जेमतेम 5 टक्के असतात. शिवाय कुठल्याही मशिनरीचा इथे फारसा उपयोग होत नाही, बरेचसे काम हातानेच करावे लागते.

3. प्रतिष्ठित व्यवसाय नसल्याने तुम्हाला बाहेर कसलाच आदर, मान सन्मान मिळत नाही. इतकेच नव्हे तर मी इलेक्ट्रॉनिक कचऱ्याचे काम करतो हे सांगायलाही लोकांना लाज वाटते.

Medal
पंछी नदिया पवन के झोंके

हवी स्पेशल पर्पज मशिनरी

प्रामुख्याने या तीन कारणांनी आजपर्यंत या विषयात फारशी प्रगती झालेली नाही. पण धातुशास्त्रातील एक पदवीधर अभियंता म्हणून मला या विषयाचे खूपच आकर्षण होते आणि आहे म्हणून मी आजपर्यंत कितीतरीशे किलोग्रॅम इलेक्ट्रॉनिक कचऱ्यातून ॲल्युमिनियम, चांदी, तांबे, पितळ, कथील, निकेल हे धातू आणि इतरांना माहिती नसलेले असे धातू अगदी नियमितपणे मिळवतो. मला असे आढळून आले आहे की, इथे मशिनरीचा फारसा उपयोग होऊ शकत नाही. पण स्पेशल पर्पज मशिनरी तयार केली तर त्याला मानवी प्रयत्नांची जोड देऊन या मिळणाऱ्या धातूंचे प्रमाण खूपच जास्त प्रमाणात वाढवता येईल. आपल्या नेहमीच्या रोजीरोटीच्या व्यवसायातून या गोष्टीसाठी वेळ देणे, असे स्क्रॅप मिळवणे, साठवणे आणि प्रसंगी आपल्याच खिशातून पैसे खर्च करून ते मौल्यवान धातू मिळवणे असा दिनक्रम फार काळ टिकत नाही. पण आता या धातूंच्या किंमतीत खूप वाढ झाल्याने आशादायक चित्र निर्माण झाले आहे.

Medal
काय म्हणता?, याच मारबतीने ब्रिटिशांचा केला विरोध!

आपल्याला जर एक-दोन वर्षांनी पदके हवी असतील, तर जपानच्या पावलावर पाऊल टाकून आपणही अगदी अभिमानाने अशी पदके तयार करू शकू, असा मला 100 टक्के विश्वास वाटतो. इतकेच नव्हे तर पदके झाली, वाटली तरीही सतत पुढे ही स्क्रॅप प्रोसेस प्रक्रिया लोकांच्या रोजगाराच्या दृष्टीनेही उपयुक्त ठरू शकते. अगदी ग्रामीण भागातील लोकांना थोडे प्रशिक्षण आणि हत्यारे दिली तर हे मौल्यवान धातू ते मिळवू शकतात.

सुदैवाने महाराष्ट्र सरकारने जर मनात आणले तर खूप मोठ्या प्रमाणावर पुढील कित्येक वर्षे रोजगार तयार होऊ शकतो. हे धातू मिळविण्यासाठी कुठलेही गुंतागुंतीचे तंत्रज्ञान नाही. कोणी म्हणेल की, मग आजवर असे का घडू शकले नाही. त्याचीही कारणे जरा निराळीच आहेत. कारण कोणालाच मी ई-कचऱ्यावर काम करतो, हे सांगायला आवडत नाही. अशा कामाला कुठलेच प्रोत्साहन मिळत नाही. सुरवातीला मात्र खर्च आणि उत्पन्न यांचा मेळ बसविण्यासाठी सरकारने किंवा इतरांनी थोडी मदत केली तर फार मोठे काम होईल.

पुणे, मुंबईसह महाराष्ट्रातील 30 महत्वाच्या शहरात रोज कित्येक टन ई-कचरा तयार होतो. तो जिथे आहे तिथून कुठेही लांब न हलवता स्थानिक रहिवाश्यांकडून, अगदी अशिक्षित स्त्रियासुद्धा हे अत्यंत महत्वाचे काम करून रोजगार मिळवू शकतील. राष्ट्रीय उत्पन्नात भर घालू शकतील.

Medal
आध्यात्मिक राष्ट्रवादाचे उद्‌गाते

जपानप्रमाणेच आपल्यालाही जर ताठ मानेने सर्वांना हे सांगायचे भाग्य मिळाले तर सोन्याहून पिवळे. ई-वेस्टमधून सोने काढण्याची क्रिया हा थोडा गुंतागुंतीचा विषय आहे. त्यासाठी मोठ्या रासायनिक क्रियांची आवश्यकता भासते, पण अशक्य काहीही नाही. आजच सुरवात करूया तर वर्ष-दोन वर्षात पदके तयार होतील.

- दिलीप गोडबोले

(लेखक धातुशास्त्रातील जाणकार असून, गेली दहा वर्षे ई-वेस्टवर काम करत आहेत.)

Loading content, please wait...