रोहित भसीन
स्वत:च्या पैशाचे व्यवस्थापन करण्याची वेळ येते, तेव्हा आपल्यापैकी अनेक जण एकतर ज्ञानाचा अभाव असल्याची तक्रार करतात किंवा पुरेसा वेळ मिळत नसल्याचे सांगतात; काही सोप्या युक्त्या माहीत करून घेतल्या आणि थोडेसे संशोधन केले, तर त्याची आपल्याला अधिक पैसा कमावण्यात मदत तर होते.
याचे एक उदाहरण म्हणजे ‘स्वीप-इन, स्वीप-आउट’ खाते. यात खातेदाराला अतिरिक्त बचत रकमेवर जास्त दराने व्याज प्राप्त करता येते, हा दर मुदतठेवीच्या (एफडी) व्याजदराएवढा असतो आणि त्याचबरोबर बचत खात्याची लवचिकताही मिळते.
पारंपरिक ‘प्लेन व्हॅनिला’ बँक खात्यांच्या तुलनेत ‘स्वीप-इन, स्वीप-आउट’ खात्यांचे लाभ जाणून घेणे आवश्यक आहे. ‘स्वीप-इन, स्वीप-आउट’ खात्यासाठी आपल्याला कोणतीही तारीख लक्षात ठेवण्याची गरज भासत नाही किंवा नियमितपणे काही करावे लागत नाही.
साध्या ‘क्लिक अँड स्टार्ट’ पद्धतीने हे खाते उघडता येते. ‘स्वीप-इन, स्वीप-आउट’ खात्यामधील रक्कम एका विशिष्ट मर्यादेहून वाढली असता ती स्वयंचलितरित्या अधिक व्याजदर देणाऱ्या मुदत ठेवीमध्ये तिचे हस्तांतर होते आणि त्याच वेळी तुमच्या खात्यातील पैसे तुम्हाला २४/७ (अखंड) उपलब्ध असतात.
एकदा तुम्ही मूलभूत मर्यादा निश्चित केली म्हणजे त्याहून अधिक रक्कम हे खाते ‘स्वीप-आउट’ करते म्हणजेच तिचे स्वत:हून मुदत ठेवीत रूपांतर करते. तुम्हाला मुदत ठेवीचे सगळे लाभ या रकमेवर मिळतात. तुमचा पगार किंवा उत्पन्न खात्यात जमा झाल्यानंतर लगेच हे सगळे आपोआप केले जाते. वर्षभरानंतर तुम्हाला मोठा निधीसंचय झालेला दिसेल.
१) चढे व्याजदर :
‘स्वीप-इन, स्वीप-आउट’ खात्यांमध्ये बचत खात्यातील अतिरिक्त (घालून दिलेल्या मर्यादेपलीकडील) रकमेचे रूपांतर ठराविक काळाने मुदत ठेवीत केले जात असल्यामुळे रकमेवर जास्त दराने व्याज मिळते; तसेच जेव्हा व जशी गरज लागेल तसे पैसे काढण्यासाठी अधिक रोखता व लवचिकताही मिळते.
बचत खात्यातील रकमेवर तुम्हाला तीन ते चार टक्के दराने व्याज मिळते, तर या खात्यात अतिरिक्त रकमेवर सात टक्क्यांपर्यंत व्याज मिळू शकते.
सामान्य परिस्थितीत मुदत ठेवीवर एवढे व्याज मिळवायचे असेल, तर निश्चित मुदतीसाठी पैसा गुंतवून ठेवण्यास खातेदार बांधील असतो. काही कारणाने मुदत ठेव वेळेआधी मोडावी लागल्यास दंडही आकारला जाऊ शकतो.
या खात्यात अशी कोणतीच कटकट नाही. आणखी महत्त्वाचे म्हणजे पैसा जमत राहिल्यामुळे कालांतराने मोठी रक्कम जमा होते, त्यातून आपण तत्कालिक किंवा भविष्यकालीन उद्दिष्टे पूर्ण करू शकतो.
२) संपूर्ण लवचिकता :
काही वेळा आपल्या सर्वांनाच अचानक किंवा त्वरित खर्च करण्याची गरज भासते. मात्र, बचत खात्यात आवश्यक रकमेहून कमी रक्कम दिसत असते; तेव्हा तुमचे ‘स्वीप-इन, स्वीप-आउट’ खाते जादूगाराप्रमाणे काम करते.
नियमित मुदत ठेवींना जशी परिपक्वता कालावधी पूर्ण करण्याची गरज असते, तशी इथे नसते. त्यामुळे मुदत ठेवीत रूपांतरित झालेल्या रकमेपैकी आवश्यक तेवढी रक्कम बचत खात्यामध्ये आणली जाते.
तुम्हाला जेवढी हवी तेवढी रक्कम काढली जाते आणि उरलेल्या रकमेवर तुम्हाला चढ्या दराने व्याज मिळत राहते.
३) सहजपणे पैशाचे व्यवस्थापन :
‘स्वीप-इन, स्वीप-आउट’ खातेदार त्यांची खाती बँकेच्या नेटबँकिंग प्लॅटफॉर्मवरून किंवा मोबाइल अॅपद्वारेही व्यवस्थापित करू शकतात. या खात्यांचा इंटरफेस यूजर-फ्रेंडली असल्यामुळे बँकिंग विनासायास आणि सहजपणे होते. उदा. तुम्ही एकदा बचत खात्यातील रकमेची मर्यादा निश्चित केल्यावर ‘एफडी’ काढण्यासाठी जास्तीचे कष्ट घेण्याची गरज नाही, सगळे काही आपोआप होत जाते.
असे हे क्रांतिकारी ‘स्वीप-इन, स्वीप-आउट’ खाते गुंतवणुकीच्या क्षेत्रातील नव्या संकल्पना रुजवत असून, अतिरिक्त उत्पन्न कमावण्यात मदत करत आहे. खात्यातील रकमेवर जास्त दराने व्याज; तसेच भविष्यकालीन गरजांसाठी रक्कम बाजूला राहण्यासाठी हे मोठे वरदान आहे.
(लेखक कोटक महिंद्रा बँकेच्या रिटेल लायबिलिटीज प्रॉडक्ट विभागाचे प्रमुख आणि मुख्य मार्केटिंग अधिकारी आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.