भारतीय महिला संघाचे ट्वेन्टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२४ जिंकल्यानंतर हरमनप्रीत कौरचा महिला संघ हा पराक्रम करेल असे अनेकांना वाटले होते. BCCI व विविध प्रायोजकांकडून तशी जाहीरातबाजीही सुरू झाली होती. पण, पहिल्याच सामन्यात भारताची हार झाली आणि सर्व गणित बिघडले. जो संघ मागील १० ट्वेंटी-२० सामन्यांत मार खावून वर्ल्ड कपमध्ये दाखल झाला होता, त्या न्यूझीलंडकडून हरमनप्रीत कौरचा संघ हरला. या पराभवानंतर भारतीय संघाने डोकं वर काढले आणि पाकिस्तान व श्रीलंका या शेजाऱ्यांवर विजय मिळवून स्वतःला स्पर्धेत कायम राखले. पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवताना भारताला संघर्ष करावा लागला खरा, परंतु त्याची भरपाई त्यांनी श्रीलंकेविरुद्धच्या लढतीतून केली. १७२ धावांचा डोंगर उभा करून ८२ धावांनी दणदणीत विजय मिळवताना भारताने नेट रनरेट सुधारला...