ओसामा... माणूस एक, मृत्यू अनेक .. वाचा सविस्तर
दहशतवाद हे संपूर्ण जगासमोर असलेलं एक गंभीर संकट आहे. याचं प्रमुख कारण म्हणजे जगातील काही देश या दहशतवादाला खतपाणी घालण्याचं काम करीत आहेत. निष्पाप नागरिकांचा बळी घेण्यात कसलं आलंय सुख? आतापर्यंत अनेक दहशतवाद्यांची नावं आपल्यापैकी प्रत्येकाच्या ऐकण्यात आली असतील. मात्र, एक नाव असंही आहे जे कधीच कोणीही विसरू शकत नाही. ते नाव म्हणजे ओसामा बिन लादेन. अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर 2001 साली झालेल्या विमान हल्ल्याचा मास्टरमाइंड तो हाच. अमेरिकेच्या नेव्ही सील्सनं 1 मे 2011 साली पाकिस्तानच्या एबटाबादमध्ये ओसामाच्या घरात घुसून त्याचा खात्मा केला.
पण यावेळी ओसामाचा सातव्यांदा मृत्यू झाला होता आणि तोही खरा. कारण त्याआधी ओसामाचा खात्मा करण्यात आलाय किंवा ओसामा आता जिवंत नाही, अशा अफवा अनेकदा चर्चेचा विषय ठरल्या. 2011 च्या आधी तब्बल 6 वेळा ओसामा बिन लादेनला मारून टाकलंय अशाप्रकारच्या अफवा जगभरात पसरल्या होत्या. या अफवा नक्की कोणी आणि कशा पसरवल्या होत्या, ते जाणून घेऊया.
कोण होता ओसामा बिन लादेन
ओसामा बिन लादेन हा जगभरातील नरसंहारास जबाबदार असलेल्या अल कायदा या इस्लामी जिहादी संघटनेचा संस्थापक आणि प्रमुख होता. वांशिकतेनं येमेनी असलेला ओसामा बिन लादेन सौदी अरेबियातील प्रतिष्ठीत बिन लादेन घराण्यात जन्मला होता. त्याला पडकण्यासाठी अडीच कोटी अमेरिकन डॉलरचं बक्षीसही अमेरिकेनं जाहीर केलं होतं. पुढे 13 जुलै 2007 रोजी या बक्षिसाची रक्कम पाच कोटी डॉलर इतकी वाढवण्यात आली होती.
अमेरिका सरकारनं कुठलेही पुरावे सादर केले नाहीत
1 मे 2011 च्या मध्यरात्री अमेरिकेच्या जवानांनी ओसामा बिन लादेनचा खात्मा केला, ही बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण जगभरात पसरली. अनेक जाणकार लोकांनी यावर विश्वास ठेवला नाही. त्याचं कारणही तसंच होतं. ओसामाचा खात्मा केल्यानंतर अमेरिका सरकारनं त्याच्या मृत्यूच्या ठिकाणचे किंवा त्याच्या मृतदेहाचे कुठलेही फोटो किंवा व्हिडीओ देण्यास नकार दिला. तसंच ओसामा बिन लादेनचा मृतदेह तडकाफडकी एबटाबादमधून हेलिकॉप्टरनं आणून महासागरात दफन करण्यात आला. त्यामुळे ओसामा खरंच मृत्युमुखी पडला की नाही याबाबत अनेकांना शंका होती. या शंकांचं प्रमुख कारण म्हणजे 2011च्या आधीही अशा प्रकारच्या अफवा पसरवण्यात आल्या होत्या.
2001 सालीच ओसामाचा झाला होता मृत्यू?
जगातील मोस्ट वॉन्टेड दहशतवादी ओसामा बिन लादेन याचा मृत्यू 2001 सालीच झाला होता, असा दावा त्यावेळी करण्यात आला होता. ओसामाला एक अति भयंकर रोग मर्फान सिंड्रोमनं ग्रासलं होतं, असं डॉ. स्टीव्ह आर. पायेकझेनिक यांनी म्हटलं होतं. त्यांच्या मते, मर्फान सिंड्रोम हा असा एक रोग आहे, ज्यामुळे मानवाच्या शरीरातील टिशूंना एकत्र ठेवणाऱ्या प्रोटिन्सवर परिणाम होतो. त्यांच्या मते ओसामाची उंची, त्याचे लांब हात-पाय आणि त्याचा लांब चेहरा या रोगाची लक्षणं होती. हा आजार सुमारे 5000 लोकांपैकी एकास प्रभावित करतो आणि अचानक मृत्यूस कारणीभूत ठरतो. त्यासाठी डीएनएची कोणतीही निश्चित चाचणी नसते, असंही डॉक्टरांचं म्हणणं होतं.
म्हणूनच डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार सीआयएनं ओसामावर उपचार केले असावेत आणि ओसामाचा मृत्यू यानंतर लगेच म्हणजेच सप्टेंबर 2001 साली झाला असावा, असं म्हटलं आहे. मात्र, काहींनी ओसामाचा मृत्यू 2001 मध्येच पण मर्फान सिंड्रोमनं नव्हे तर मूत्र संबंधीच्या आजारानं झाला, असा दावा केला होता.
ओसामाचा मृत्यू म्हणजे सीआयएचा कट
सोव्हिएत युनियनला अफगाणिस्तानवर ताबा मिळवायचा होता. त्यावेळी सीआयएनं ‘ऑपरेशन सायक्लॉन’दरम्यान सौदी अरेबियाहून अफगाण मुजाहिद्दीनकडे सोव्हिएत निर्मित शस्त्रं पाठवली होती. त्यावेळी ओसामा बिन लादेन हा सीआयएकडून होता. यावेळी पाकिस्तानातून हिरोईनचा व्यापार होत होता. सीआयएनं हिरोईनच्या व्यापाराची परवानगी मिळवली आणि इस्लामिक कट्टरवाद पेरण्यास सुरुवात केली. तसेच ओसामा बिन लादेनच्या कट्टरतेच्या कथा पसरवण्यास सुरुवात केली. यामुळे अनेक दहशतवादी अफगाणिस्तानात येऊ लागले. मात्र, छापा पडला आणि ओसामा बिन लादेनचा यात मृत्यू झाला, असा दावा करण्यात आला. ओसामाला बाजूला करण्यासाठी सीआयएचा हा कट होता, असा दावाही करण्यात आला होता.
पाकिस्तानकडून 2006 मध्ये ओसामाला अटक
एका मोठ्या पत्रकाराच्या म्हणण्यानुसार, 2006 साली पाकिस्तानच्या आयएसआयनं ओसामा बिन लादेनला अटक केली आणि या दहशतवाद्याचा उपयोग अफगाणिस्तान विरोधात केला. यानंतर ओसामाला अमेरिकेला विकण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून करण्यात आला. मात्र, यासाठी त्याला छापा टाकण्यास सांगण्यात आलं, ज्यात त्याचा मृत्यू होईल. या पत्रकाराच्या म्हणण्यानुसार, जेव्हा अमेरिकेचे नेव्ही सील ओसामाच्या एबाटाबादच्या घरात घुसले तेव्हा त्यांना पाकिस्तानचे आयएसआय अधिकारी भेटले. ज्यामुळे त्यांना ओसामाच्या बेडरूममध्ये जाणं शक्यं झालं. यानंतर त्यांनी ओसामाच्या छातीवर गोळ्या घालून त्याचे शरीर फाडून टाकले. मात्र, या पत्रकारानं त्यांना माहिती देण्याऱ्यांचं नाव अज्ञात आणि निनावी आहे, असं सांगितलं.
लादेन एबटाबादमध्ये नव्हताच
लंडनच्या The Telegraph च्या वृत्तानुसार, ‘‘आम्ही आजूबाजूला कोणताही अरब कधी पाहिलेला नाही, तो इथे नव्हता’’ असं एबटाबादमध्ये राहणाऱ्या बशीर कुरेशी यांनी म्हटलं. ओसामा बिन लादेन आणि त्याचे कुटुंबीय इथे राहत नव्हते. तसंच अमेरिकेचे सैनिक आत शिरल्यावर खिडक्या तुटल्या आणि काच बाहेर फेकले गेले ही घटनासुद्धा काल्पनिक आहे, असंही बशीर म्हणाले.
पाकिस्तानच्या आयएसआयच्या एका जुन्या अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेच्या सैनिकांनी एबटाबादमध्ये छापा टाकला. मात्र, अमेरिकन सैन्यानं कोणाला ठार मारलं याबद्दल शंका आहे. तो ओसामा बिन लादेन नव्हता. ओसामा बिन लादेनचा त्या आधीच मृत्यू झाला होता आणि ही बाब अमेरिकन सैन्यालाही माहिती होती, असं ते प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले होते.
2011 आधीच लादेन होता अमेरिकेच्या ताब्यात
2011 ला अमेरिकेनं लादेनचा खात्मा केला. मात्र इराणच्या म्हणण्यानुसार, 2011 आधीच ओसामा बिन लादेन अमेरिकेच्या ताब्यात होता. 2001 साली केलेल्या हल्ल्यात तो दोषी होता. मात्र, अमेरिकेत त्याच्यावर खटला दाखल होईल आणि 2001 च्या हल्ल्यासाठी त्याला कठोर शिक्षा होईल, मात्र क्रूर शिक्षा होणार नाही म्हणून अमेरिकेनं सैन्यानं लादेनला अनेक वर्ष डांबून ठेवलं. त्यानंतर ओसामाचा खात्मा केला. यानंतर पाकिस्तानात घुसून मारण्याची कहाणी अमेरिकेनं तयार केली होती.
यापेक्षाही धक्कादायक बाब म्हणजे, ओसामा बिन लादेनला मारणं म्हणजे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यासाठी निवडणूक जिंकवून देणारं अस्त्र होतं, असा दावाही यात करण्यात आला आहे.
जतन करून ठेवला होता ओसामाचा मृतदेह
‘ओसामा बिन लादेन आधीच मरण पावला होता’, अमेरिकेने फक्त त्याची पुष्टी केली, असं सांगण्यात आलं होतं. तोरा-बोरावरील हल्ल्यानंतर अमेरिकेनं एकतर ओसामा बिन लादेनला पकडलं होतं किंवा 2011 च्या आधीच मूत्रपिंडाच्या बिघाडामुळे त्याचा मृत्यू झाला होता, असंही सांगण्यात आलं होतं. इतकंच नाही तर लादेनच्या मृत्यूनंतर अमेरिकेनं त्याचा मृतदेह बऱ्याच काळासाठी द्रव नायट्रोजनच्या सहाय्यानं जतन करून ठेवला. त्यानंतर योग्य वेळी त्याच्या मृत्यूची घोषणा केली, असंही यात सांगण्यात आलंय.
ओसामा बिन लादेनच्या संपूर्ण प्रकरणात अमेरिकेकडून योग्यवेळी घडलेली योग्य गोष्ट म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांना एक प्रकारचा विरोध होता, असंही या थेअरीमध्ये म्हटलंय.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.